मुश्‍किली! (ढिंग टांग)

Mushkili
Mushkili

मुश्‍किलातली मुश्‍किल समस्याही लीलया सोडविण्याच्या कामात राजमान्य राजेश्री चुलतराज ह्यांचा हात कोणीही धरणे केवळ अशक्‍य आहे. देशासमोरील असंख्य अक्राळविक्राळ समस्या त्यांनी बसल्या बैठकीला यूं सोडवून दिल्या आहेत. राजियांचे मोठेपण हे की कधीही त्याबद्दल चकार शब्द मुखातून निघत नाही. ‘कसे काय बोआ तुम्हाला हे जमते?’ असे आपण त्यांस अचंब्याने विचारावे, तर मंद स्मित करून येवढेच म्हणतात की, ‘‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!’’

राजे आहेत, म्हणून आपण आहोत. पोशिंदा आहे, म्हणून लाख आहेत.

आता हेच पाहा ना, देशासमोर केवढी प्रचंड समस्या उभी ठाकली होती. एकीकडे शत्रू युद्धमान झालेला. दुसरीकडे सर्जिकल स्ट्राइक नेमके कसे करावेत, ह्याचे डावपेच आखण्यात सैन्यातील तालेवार मंडळी गुंतलेली. अशा क्रिटिकल परिस्थितीत सुभेदार करणाजी जोहराची मुश्‍किल मसलत उभी ठाकली. करणाजी जोहरास हाताशी धरोन फवाद खान नावाच्या कुण्या गनीमाने आगळीक केल्याचे ध्यानी आल्याने वातारण ढवळोन निघाले. करणाजी जोहराने पदरचे होन खर्ची करोन फवाद खानास आश्रयो दिलेला. हे म्हंजे अस्तनीत किंगकोब्रा पाळण्यासारिखेच. कोण कोठला फवाद खान? फवाद नाव धारण करणाऱ्या इसमाने फार तर भायखळ्याच्या मार्केटात पलाष्टिकची फुले विकावीत! त्याच्यासाठी लाल गालिचा? राजे चिडले. संतापले. भडकले. ‘सला काय निमित्त्यें गेला?’ असा जाब विचारणारा खलिता करणाजीस टाकोटाक रवाना झाला. बरे तर बरे, करणाजीने अदा केलेली पेशगी घेवोन फवाद खान पुन्हा गनीमगोटात सुरक्षित परतला होता. भलताच पेचप्रसंग उद्‌भवला. पण राजे मोठ्या मनाचे आहेती. ते होते, म्हणोन निभावले.

‘‘त्याचं काय्ये की, दोन दिवसांपूर्वी आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता...,’’ मेजावरचा पेपरवेट गोल फिरवत स्वत:शीच बोलल्याप्रमाणे राजे म्हणाले. आम्ही नेहमीप्रमाणे मान डोलावली.

‘‘त्या करणाजीच्या मसलतीत काहीतरी तोडगा काढा बुवा, आणि मला वाचवा, असं मुख्यमंत्री म्हणत होते,’’ राजियांनी सांगितले. आम्ही पुन्हा मान डोलावली. आम्हाला ह्यात काही नवल वाटले नाही. कित्येक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांबाबत राजे तोडगे काढत असतात. सर्जिकल स्ट्राइक करू की नको, हेसुद्धा मनोहरबाब पर्रिकारांनी राजियांना विचारले होते म्हणे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीला उभी राहू की नको, हे विचारण्यास डोनाल्ड ट्रम्प ह्यांनीही फोन केला होता, असेही आम्ही ऐकले आहे. असो.

‘‘मग काय...गेलो आणि पंधरा मिनिटात तोडगा काढून परत आलो. आहे काय नि नाही काय!,’’ राजे म्हणाले. आ. पु. मा. डो.

‘‘...पण काय उपयोग?,’’ एक हताश सुस्कारा टाकून राजियांनी कपाळावर तीनदा मूठ हापटली. म्हणाले, ‘‘ज्याचे करावयास जावे बरे, तो म्हणे, माझेच खरे!’’
‘‘असा दिल टाकू नका, राजे! आपण आहात, म्हणोन ही दौलत बर्करार आहे. आपण आहात, म्हणून ह्या मुश्‍किल समस्येत-’’ आमचे वाक्‍य पुरे होऊ शकले नाही. तेवढ्यात राजे कडाडले.

‘‘खामोश!! तो कवण कुठला करणाजी? प्रायश्‍चित्त म्हणोन पाच खोकी दान कर, असे सांगितले, कोठे बिघडले? त्याची ही परतफेड?,’’ राजे संतापलेले होते. आ. पु. मा. डो.

‘‘आम्ही काय आमच्या घरी दिवाळी आहे, म्हणोन पाच खोकी मागत होतो? देशासाठीच मागत होतो नं? पण ते बिहारी लालू काय म्हणतात पाहा : सेना के नाम पर कोई व्होट मांगता है, तो कोई नोट मांगता है!’’...राजियांचे पुढील उद्‌गार पुटपुटल्यासारखे होते, पण ओठांच्या हालचालीवरोन ते भलतेच भेदक असावेत, असा कयास बांधून आ. पु. मा. डो.

‘‘त्या फवाद खानाचे मुंडकेच मारावयास हवे होते...सोडले, ते चुकलेच!,’’ राजे अंतर्मुख होवोन बोलोन गेले. त्यावर घुसमटलेला जीव सावरत आम्ही कसेबसे म्हणालो ते असे :

‘‘इतिहास साक्षी आहे, राजे! फवाद खानाचे मुंडके जायचे, ते तीन बोटांवर निभावले!’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com