...मग अपश्रेय कुणाचे? (अग्रलेख)

narendra modi
narendra modi

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे श्रेय त्यांनी घेतले असेल तर ते योग्यच मानले पाहिजे. पण, संपूर्ण भाषण हे जाहीर सभेच्या थाटाचे असणे कितपत सयुक्तिक? स्वातंत्र्य दिनाचे भाषण हे पक्षातीत असायला हवे, त्यात वास्तवाचे आकलन आणि भविष्याचे प्राक्कथन असावे, अशी अपेक्षा असते. आजवर बहुतेकांनी या अपेक्षा आतापर्यंत पूर्ण केल्या. मोदींनी मात्र त्यांच्या पंतप्रधानांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील लाल किल्ल्यावरील शेवटच्या भाषणाच्या प्रसंगी ही परंपरा थेट प्रचारकी थाटात परिवर्तित केली; त्याचवेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्‍नांना जन्म देणारे दावेही त्यांनी केले. त्यांनी दावे केलेल्या मुद्यांसंबंधीचे वास्तव काही मातब्बर माध्यमसंस्थांनी लगेचच समोर आणले. त्यानुसार, देशात ट्रॅक्‍टरची विक्री विक्रमी झाली हे खरे. भारत ही जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरली हे खरे, मत्स्योत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर गेला हे खरे, खादीची विक्री दुप्पट झाली हेही खरे. पण, ९९ टक्के प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण झाले, हे पूर्णतः खरे नाही. भारताचा पासपोर्ट हा जगात सर्वाधिक आदरयुक्त असलेल्या पासपोर्टसपैकी एक आहे हे विधान अतिशयोक्त आहे. भारतातून होणारी मधाची निर्यात दुप्पट झाली, या दाव्यालाही आधार नाही. तेरा कोटी लोकांना मुद्रा कर्जाचे वाटप झाले, हेही पूर्णतः खरे नाही. ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे तीन लाख मुलांचे जीव वाचले हा व असे काही दावे तर निखालच चुकीचे आहेत. पंतप्रधानांनी अनेक मुद्यांवर बोलणे टाळले, तशा याही गोष्टी त्यांना टाळता आल्या असत्या. चार वर्षांत देश एकदम युरोप- अमेरिकेच्या बरोबरीने जाऊन बसावा, अशी अपेक्षा कुणाचीच नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी काही दाव्यांच्या संदर्भात संयम पाळायला हवा होता.

आयुषमान भारत, अवकाश मोहीम आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांना स्थायी कमिशन देणे अशा तीन घोषणा त्यांनी या भाषणात केल्या. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी जवळीक सांगेल, असे काहीही ते बोलले नाहीत, हे चांगलेच झाले; पण, तब्बल ऐंशी मिनिटांच्या भाषणात देशात विविध ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटना, जमावाकडून सातत्याने होणाऱ्या हत्या, गोरक्षकांचा हैदोस याबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही. मोदी सत्तेत आल्यानंतर जे काही चांगले घडले, त्याचे श्रेय त्यांनी घेतले असेल तर त्यांच्याच कार्यकाळात जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या ज्या दीडशेवर घटना घडल्या, त्याचे अपश्रेय कुणाच्या पदरात टाकायचे? त्यांनी या घटनांचा उल्लेखही केला नाही आणि साधा निषेधही नोंदवला नाही. २०१३ नंतर म्हणजे आपण सत्तेत आल्यानंतर काय-काय चांगले झाले, याचाच पाढा त्यांनी वाचला. जो राज्यकर्ता श्रेयासाठी एवढा झपाटलेला असेल, त्याने अपश्रेयही तेवढ्याच दिलदारीने स्वीकारले पाहिजे. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात चार वर्षांत फार मोठा क्रांतिकारी बदल होईल, अशी अपेक्षा नाही. मात्र, तसा तो झाला आहे आणि तोसुद्धा माझ्याच कार्यकाळात, हा दावा टिकणारा नाही. सारा देश स्वच्छ व हागणदारीमुक्त झाला, सर्व गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले या व अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष उल्लेखिलेल्या दाव्यातील फोलपण उघड आहे.सर्वांसाठी घर, कौशल्य, स्वच्छ पाणी, आरोग्य सोयी, विमा आणि कनेक्‍टिव्हिटी यासाठी आपण काय केले आणि करीत आहोत, हे मोदींनी सांगितले. ‘देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी आतुर आहे आणि अस्वस्थही आहे,’ असे काव्यात्मक भाषेत मोदी म्हणाले; परंतु, नोटाबंदी अपयशी ठरल्यानंतर आता रुपयाचे सतत विक्रमी अवमूल्यन झाले व होत आहे, याचे अपश्रेय त्यांनाच घ्यावे लागणार आहे. काश्‍मीर प्रश्‍नाच्या हाताळणीतील चुकीची भूमिका आता अंगलट येते आहे, याचे अपश्रेयही त्यांनाच घ्यावे लागणार आहे. परिवर्तन ही सतत चालणारी प्रक्रिया असते. सरकार हीसुद्धा तशीच व्यवस्था असते. तरीही पासष्ट- सत्तर वर्षांच्या तुलनेत फक्त चार वर्षांच्या काळात देशाने कात टाकली असल्याचा दावा करणे याला मुत्सद्दीपणा म्हणता येत नाही. लाल किल्ल्यावरील भाषण हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार आहे. तो त्यांनी संयमाने आणि प्रचारकी थाट टाळून वापरला असता, देशाच्या इतिहासाकडे पक्षीय चष्म्यातून न पाहता सम्यक नजरेने पाहिले असते आणि वर्तमानातील यशासोबत अपयशाबद्दलही चर्चा केली असती तर ते त्यांना अधिक शोभून दिसले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com