पुरस्कारांमुळे चैतन्य

संतोष भिंगार्डे
सोमवार, 10 एप्रिल 2017

चित्रपटांना पुरस्कार मिळतात...त्याचे सगळीकडून भरभरून कौतुक होते. परंतु ते योग्य वेळी प्रदर्शित होत नाहीत. पुरस्कारांच्या माहौलातच ते आले तर लोकांपर्यंत पोचतील. आशयघन चित्रपट लोकांपर्यंत पोचायला हवेत

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आणि मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचे आणि चैतन्याचे वारे वाहू लागले. कासव, सायकल, दशक्रिया, व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटांनी बाजी मारली. "कासव'ने तर सुवर्णकमळ पटकाविले. आचार्य अत्रे यांच्या "श्‍यामची आई' या चित्रपटाला पहिल्यांदा सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षांनी श्वास; व पाठोपाठ देऊळ व कोर्ट या चित्रपटांनी सुवर्णकमळ पटकाविल्यानंतर मराठी चित्रपट वर्तुळात नव्याने एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यातील कलात्मकता, प्रयोगशील वृत्ती आणि तांत्रिक सफाई या सर्वच बाबतीत दर्जा विषयांतील वैविध्य हे त्याचे एक बलस्थान. अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मराठी चित्रपट उद्योगाची दखल घेतली जाऊ लागली आहे.

सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी चांगले आणि वेगळ्या विषयावरील चित्रपट दिलेले आहेत. त्यांच्या बहुतेक चित्रपटांनी विविध महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावलेली आहे. विषयाची अचूक निवड आणि त्याची यथायोग्य मांडणी अशी काही त्यांची खासियत. विशेष म्हणजे सामाजिक विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडाच. कासव हादेखील सध्याच्या वास्तववादी परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट आहे. सध्या नैराश्‍याच्या गर्तेत सापडणाऱ्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. अशा तरुणांना समाजाने कसे स्वीकारले पाहिजे... त्यांना त्यातून कसे बाहेर काढले पाहिजे हे "कासव'मध्ये मांडलेले आहे. "दशक्रिया'मध्ये एका शाळकरी मुलाची कथा रेखाटण्यात आली आहे.

समाजव्यवस्थेचे भान ठेवून तो आपले बुद्धिचातुर्य आणि साहस पणाला लावून पोटाची खळगी कशी भरतो अशी ही कथा. बाबा भांड यांच्या कादंबरीवर बेतलेला आणि संदीप पाटीलने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. संदीपने दिग्दर्शक म्हणून यात चांगलीच चमक दाखविली आहे. जोगवा, पंगिरा, मैल...एक प्रवास याही त्याच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभलेले आहेत.

सायकल हा दिग्दर्शक प्रकाश कुंटेचा हा तिसरा चित्रपट. एक ज्योतिषी आणि दोन चोरांची कथा यामध्ये मांडण्यात आली आहे. व्हेंटिलेटर या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. राजेश मापुसकरचा हा पहिलाच मराठी चित्रपट. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची आई डॉ. मधू चोप्रा यांची ही पहिली मराठी चित्रपट निर्मिती. शंभरहून अधिक कलाकारांना घेऊन राजेशने हा चित्रपट बनविला. तो मागील वर्षी प्रदर्शितही झाला. असो.

एकूणच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा पुन्हा फडकला आहे. मात्र कासव, सायकल आणि दशक्रिया हे तीन चित्रपट कधी प्रदर्शित होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण होते काय की चित्रपटांना पुरस्कार मिळतात...त्याचे सगळीकडून भरभरून कौतुक होते. परंतु ते योग्य वेळी प्रदर्शित होत नाहीत. पुरस्कारांच्या माहौलातच ते आले तर लोकांपर्यंत पोचतील. आशयघन चित्रपट लोकांपर्यंत पोचायला हवेत.
 

Web Title: National Awards to Marathi Movies