तापमानविरोधी लढ्यात निसर्गाचीही साथ

nature
nature

कार्बन डायऑक्‍साईड वातावरणातून कमी होण्याचे प्रमाण वाढत असून, वातावरणातील बदलांमुळे हरित प्रदेशाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. म्हणजेच कार्बन डायऑक्‍साईडविरोधी लढ्यात मानवाला निसर्गाचीही साथ लाभत आहे.

वाढता वाढता वाढत चाललेल्या कार्बन डायऑक्‍साईडचे वातावरणातील प्रमाण चक्क कमी होत चालल्याचे सिद्ध करणारी दोन संशोधने नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. या संशोधनाद्वारे असेही सिद्ध झाले आहे, की वातावरणातील बदलांमुळे हरित प्रदेशाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, म्हणजेच जगातील भूभागावर वनस्पतींचे प्रमाण वाढत आहे.

यातील एका संशोधनानुसार 1982 ते 2009 या 27 वर्षांच्या काळात अमेरिकेच्या क्षेत्रफळाच्या सुमारे दुप्पट क्षेत्रफळात म्हणजे 1.8 कोटी चौरस कि.मी. नवीन जागेत वनस्पती उगवल्या आहेत. नवीन जागा म्हणजे आजपर्यंत जेथे काही उगवू शकत नव्हते अशी. या नवहिरवाईच्या प्रमाणात वाढ होत आहे, ती वातावरणातील बदलांच्या परिणामांमुळे! वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्‍साईड व अन्य घटकांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील अतिशित प्रदेशात हिरवाईची शक्‍यता नसते. असे प्रदेश आता उघडे पडत आहेत व वनस्पतींना वाढण्यासाठी उपलब्ध होत आहेत. तापमानवाढ व जमिनीची उपलब्धता यामुळे वनस्पती उगवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. कॅलिफोर्नियातील लॉरेन्स बर्कले नॅशनल युनिव्हर्सिटीतील शास्रज्ञ ट्रेव्हर किनान व त्यांच्या सहकाऱ्यांचा शोधनिबंध "नेचर कम्युनिकेशन्स'च्या आठ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या नवहिरवाईमुळे निदान सध्यातरी वातावरणबदल काहीशा मंदगतीने होत आहे.

या शास्रज्ञांनी जागतिक कार्बनचे अंदाजीत प्रमाण, जमिनीलगत कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण, वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण, उपग्रहांच्या साह्याने केलेली निरीक्षणे व नव्याने निर्माण होत असलेल्या हिरवाई अशा अनेक गोष्टींचा संशोधनात अंतर्भाव केला आहे. या संशोधनानुसार 2014 या एका वर्षात सुमारे 36 अब्ज टन कार्बन डायऑक्‍साईड वातावरणात मानवी प्रक्रियांमुळे मिसळला व हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हेच प्रमाण गेल्या शतकाच्या मध्यात केवळ सहा अब्ज टन होते. 1950 मध्ये दर दशलक्ष हवेच्या रेणूमध्ये 311 कार्बन डायऑक्‍साईडचे रेणू (पीपीएम पार्टस पर मिलियन) असायचे. हेच आता 400 रेणूपेक्षाही जास्त आहे. परंतु, या शतकाच्या प्रारंभापासून या वाढीचे प्रमाण कमी झाल्याचे या शास्रज्ञांचे म्हणणे आहे.

किनान यांच्या म्हणण्यानुसार 1959 ते 1989 या काळात कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण पाऊण पीपीएम ते जवळजवळ दोन पीपीएम या प्रमाणात वाढत आहे. 2002 पासून ते किंचित कमी झाले. याचा अर्थ असा, की मानवामुळे वातावरणात वाढत्या प्रमाणात कार्बन डायऑक्‍साईड सोडला जात असला, तरी तो त्या प्रमाणात वातावरणात राहात नाही. म्हणजेच वातावरणात अशा काही प्रक्रिया घडतात, की त्यामुळे कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण कमी होते किंवा तो वातावरणातून काढून टाकला जातो. अशा प्रक्रियांना पर्यावरणशास्रज्ञ "एअरसिंक' (हवा शोषपात्र) असे म्हणतात. (खरे तर "कार्बन डायऑक्‍साईड शोषपात्र' असे म्हणावयास हवे.) महासागरांना यापैकी एक शोषपात्र समजले जाते. प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्‍साईड वायू शोषला जातो. पाणी व सूर्यप्रकाशाच्या साह्याने कार्बन डायऑक्‍साईडचे वनस्पतीमध्ये शर्करेमध्ये रूपांतर केले जाते. या शर्करा वनस्पतींच्या वाढीसाठी, खोड, पानांच्या वाढीसाठी वापरल्या जातात व अखेरीस काष्ठाच्या स्वरूपात कार्बन डायऑक्‍साईड बंदिस्त होतो. म्हणून प्रकाश संश्‍लेषण क्रियासुद्धा कार्बन डायऑक्‍साईडचे शोषपात्र समजले जाते. किनान यांच्या संशोधनानुसार विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होऊन वातावरणात मिसळणारा पन्नास टक्के कार्बन डायऑक्‍साईड या मार्गाने वातावरणातून काढून टाकला जाई. आता हे प्रमाण साठ टक्‍क्‍यांच्या जवळ पोचले आहे. यास साह्यभूत ठरल्या आहेत, त्या नव्या भूपृष्ठावर वाढणाऱ्या वनस्पती व अन्य शोषपात्रे. म्हणजेच कार्बन डायऑक्‍साईडविरोधी लढ्यात निसर्गाचीही साथ लाभत आहे.

अर्थात कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढले तर प्रकाश संश्‍लेषण वेगात व अधिक प्रमाणात होते. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हरितगृहात संशोधन केले व त्यांना आढळून आले की, कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण 475 पीपीएम ते 600 पीपीएमच्या दरम्यान असते, तेव्हा प्रकाश संश्‍लेषण 40 टक्‍क्‍यांनी वाढते. परंतु, प्रकाश संश्‍लेषणाचे वाढते प्रमाण ही चांगली गोष्ट असली व वातावरणातील अनिष्ट बदलांचे प्रमाण त्यामुळे कमी होत असले, तरी तेवढे पुरेसे नाही व किनान म्हणतात, तेही कायमस्वरुपी नाही.


दुसरे संशोधन प्रसिद्ध झाले आहे ते "अर्थ सिस्टीम सायन्स डाटा' या रिसर्च जर्नलच्या 14 नोव्हेंबरच्या अंकात. यातील संशोधनानुसार गेल्या तीन वर्षांत कार्बन डायऑक्‍साईडचे वातावरणातील प्रमाण जवळजवळ स्थिर आहे. हे जागतिक तापमानवाढीविरोधी लढ्यात साह्यकारी असले तरी ते पुरेसे नाही, असे या संशोधनाचे सार आहे. हा शोधनिबंध लिहिला आहे तो कॉरीन ल क्‍युरे या युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अंजेलिना येथील संशोधक व त्यांच्या सहकाऱ्यांनी. हे कार्बन डॉयऑक्‍साईडच्या जवळजवळ वाढरहीत तिसरे वर्ष आहे. या शास्रज्ञांच्या मते हे शक्‍य झाले आहे चीनने कोळशाचा वापर प्रचंड प्रमाणात कमी केल्यामुळे! परंतु, हे पुरेसे नाही.
वर्षाला नऊ दशांश टक्‍क्‍यांनी वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण कमी झाले, तर 2030 पर्यंत औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील तापमानापेक्षा जवळजवळ दोन अंशांनी अधिक तापमान होईल. यापेक्षा अधिकची तापमानवाढ जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी घातक असेल. या सर्वात दिलासा एवढाच की कार्बन डायऑक्‍साईड विरोधी लढ्यात निसर्गही मानवाला साथ देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com