nisha-shivurkar.
nisha-shivurkar.

उषःकाल होण्यापूर्वीची काळरात्र

स्त्रिया आता अत्याचार सहन करत नाहीत, त्या प्रतिकार करतात, नकार देतात, याचा विकृत मानसिकतेच्या पुरुषांना राग आहे. संधी मिळताच अशा प्रवृत्ती घृणास्पद कृत्य करून स्त्रियांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात.

अक्कमहादेवी या कर्नाटकातील बाराव्या शतकातील वीरशैव पंथाच्या संत कवयित्री होत्या. ध्येयप्राप्तीसाठी स्त्रीदेखील वैराग्याची परिसीमा गाठू शकते, असे म्हणत वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वस्त्रांचा त्याग केला. ज्ञान व ईश्‍वराच्या शोधासाठी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातून आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यला त्या पोचल्या. सातशे किलोमीटरच्या या पायी प्रवासात वीरशैव धर्माचे संस्थापक, महान क्रांतिकारक बसवेश्‍वर यांना भेटण्यासाठी ‘अनुभवमंटपा’त आल्या. ‘अनुभवमंटप’ म्हणजे बसवेश्‍वरांनी सर्व जाती-धर्मांच्या स्त्री-पुरुषांसाठी अध्यात्म व ज्ञानाच्या चर्चेसाठी स्थापन केलेले मुक्तपीठ. अल्लमप्रभू या पीठाचे प्रमुख होते. महादेवींची नग्नता ‘अनुभवमंटपा’त येण्यात अडचण नाही, असे बसवेश्‍वरांनीच जाहीर केले. अल्लमप्रभूंशी ज्ञान व अध्यात्मावर झालेल्या चर्चेनंतर त्यांना सन्मानाने या ज्ञानयज्ञात प्रवेश दिला गेला.ही प्रगल्भता त्यावेळी होती. आपले अनुभव महादेवीअक्कांनी वचन स्वरूपात काव्यात्मकतेने लिहिले आहेत. त्यांचे काव्य कन्नड साहित्यात मोठा ठेवा मानला जातो. महादेवींचे आयुष्य स्त्रीमुक्तीला प्रेरणा देणारे आहे.

क्रांतिकारक बसवेश्‍वर व अक्कमहादेवींच्या कर्नाटकात, राजधानी बंगळूरमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री एम. जी. रोड व ब्रिगेड रोडवर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या तरुणींनी तोकडे कपडे घातल्याचे ओरडत काही विकृत नीतीरक्षकांनी कर्नाटकाच्या परिवर्तनवादी परंपरेला छेद देणारे वर्तन केले. नववर्षाच्या सूर्योदयापूर्वीच घडलेल्या या घटनेने आपल्यासमोर अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. ज्या प्रदेशात बाराव्या शतकात अठरा वर्षांची तरुणी संपूर्ण व्यवस्थेला प्रश्‍न विचारत होती, त्याच भूमीत एकविसाव्या शतकात अश्‍लील शेरेबाजी करत तरुण मुलींना अपमानास्पद वागवले जाते, तेव्हा विचारी माणसांची मन संतापाने पेटून उठतात.

गेल्या काही वर्षांत आपल्या देशात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. खैरलांजी, कोपर्डीसारखे खेडे असो किंवा बंगळूरची हायटेक सिटी वा राजधानी दिल्ली, सगळीकडेच स्त्रियांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. घर व घराबाहेर कुठेच स्त्रीला भयमुक्त जगता येत नाही. ‘भयापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य’ असे गांधीजी म्हणत. स्त्रीच्या भयमुक्तीच्या प्रवासात अशा घटना अडथळा ठरत आहेत. शिक्षण, रोजगार, कुटुंबातील वातावरण, घटनात्मक अधिकार व परिवर्तनवादी चळवळींमुळे स्त्रिया बदलल्या आहेत. इज्जतीच्या भयाचे भूत त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मानगुटीवरून उतरविले आहे. स्त्रियांचा समाजातील वावर वाढला आहे. अनेक मुलींचे पालक मुलींच्या मुक्त जगण्याला प्रोत्साहन देतात. मुली मर्जीप्रमाणे शिक्षण, रोजगार, मनोरंजनाचा आपला अधिकार बजावत आहेत. समाज मात्र ही वस्तुस्थिती स्वीकारायला अद्याप तयार नाही. स्त्री बदलली त्या प्रमाणात पुरुष बदलला नाही. पुरुषांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पुरुषप्रधान मानसिकता सतत डोके वर काढत असते. ही मानसिकता संघटित होते, तेव्हा विकृतीची परिसीमा गाठते. स्त्रियांचे जगणे मुश्‍कील करते. खासदार आदित्यनाथ, शंकराचार्य हे हिंदू स्त्रियांना दहा मुले जन्माला घालण्याचे आवाहन करतात. श्रीराम सेनेसारख्या संघटना मुलींनी पबमध्ये जाण्यावरून  कथित नैतिकतेचा तमाशा उभा करतात, तर ‘तालिबानी’ गट स्त्रियांनी बुरखा वापरावा, शिक्षण घेऊ नये असे फतवे काढतात. कळत-नकळत ही अनिष्ट विचारसरणी समाजात झिरपते. बंगळुरातल्या घटनेतील तरुण याच मानसिकतेचे वाहक व बळीही आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ दहा जानेवारीला परिवर्तनवादी संघटनांनी एम. जी. रोडवर निदर्शने केली. या निदर्शनात सहभागी असलेल्या समाजवादी जनपरिषदेच्या कार्यकर्त्या अखिला विद्यासदरा सांगत होत्या, ‘गेली अनेक वर्षे या रस्त्यांवर न्यू इअर पार्टी पोलिसांची परवानगी काढून जोशात साजरी होते. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन यंदा १५०० पोलिस तैनात केले होते. नृत्य सुरू असताना अचानक काही तरुण घुसले. त्यांनी मुलींना आपल्यासोबत नृत्याचा आग्रह धरला. मुलींनी नकार देताच त्यांच्या कपड्यांवर शेरेबाजी करत त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. मुलींपैकी एकीने फोन करून पोलिसांकडे तक्रार केली; पण पोलिसांनी कारवाई केली नाही. त्या रात्री स्त्रियांच्या अपमानाच्या घटनांचा सिलसिला सुरूच राहिला. शहरातील काम्मनाहळ्ळी परिसरात एका युवतीच्या विनयभंगाची, तर टेनिस असोसिएशनच्या अधिकाऱ्याच्या पत्नीशी गैरवर्तनाची घटनाही घडली.’ सरकार व पोलिसांची निष्क्रियता व बेपर्वाईमुळे बंगळूरमधील नागरिक संतप्त झाले आहेत. दहा जानेवारीच्या निदर्शनात तरुण-तरुणींनी हातात ‘I Dont Report Because No One Believes’ लिहिलेले फलक घेतले होते. ‘आमचा सरकार व पोलिसांवर विश्‍वास नाही,’ असे निदर्शक सांगत होते. विशेष म्हणजे कर्नाटकाचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी बेलगाम वर्तन करणाऱ्या तरुणांना दोष देण्याऐवजी ‘पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणातून’ हा प्रकार घडला, असे म्हणत आपली जबाबदारी झटकली. खरेतर असे सोपे निष्कर्ष काढण्यापेक्षा अशा मनोवृत्तीची पाळेमुळे खोदून ती नष्ट करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपल्या समाजातील विकृतींवर पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या दोषाचे पांघरूण घालता येणार नाही, याचे भान गृहमंत्र्यांनी ठेवायला हवे होते.

स्त्रिया आता अत्याचार सहन करायला तयार नाहीत, त्या प्रतिकार करतात, नकार देतात, मर्जीप्रमाणे जगू इच्छितात याचा विकृत मानसिकतेच्या पुरुषांना राग आहे. संधी मिळताच अशा प्रवृत्ती छेडछाड, शेरेबाजी, बलात्कारासारखी घृणास्पद कृत्ये करून स्त्रियांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या व्यवस्थेत असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. बंगळूरच्या एक हजार युवक-युवतींनी ११ जानेवारीला पुन्हा एम. जी. रोडवर जमून स्त्रियांच्या आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याच्या व घटनात्मक हक्कांचा उद्‌घोष केला. सहिष्णू भारतीय समाजात सध्या असहिष्णू प्रवृत्ती वाढत आहेत. भगवान गौतम बुद्ध, बसवेश्‍वर, गुरुनानक, कबीर, सुफी व भक्ती परंपरा; तसेच समाजसुधारकांचे कार्य आणि स्वातंत्र्य आंदोलनातील उदारमतवादी प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न या प्रवृत्ती करत आहेत. दिवस अन्‌ रात्रही वैऱ्याचीच आहे. उषःकाल होता होता काळरात्र येण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा अधिक जागृत व संघटितपणे या प्रवृत्तींचा मुकाबला आपल्याला करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com