निशान-ए-आप!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

अखेर क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवजोतसिंग सिद्धू यांनी एकाच वेळी ‘आम आदमी पार्टी’ आणि काँग्रेस या दोन पक्षांचा त्रिफळा उडवला आहे! क्रिकेटमध्ये सिद्धू यांनी कधी गोलंदाजी केली होती का नाही, त्याचा शोध आकडेवारी तज्ज्ञ घेतीलच; पण राजकीय पीचवर मात्र सिद्धू मोठ्या हुशारीने गोलंदाजी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आपल्याकडे डोळे लावून बसलेल्या ‘आप’ आणि ‘काँग्रेस’ या दोन्ही पक्षांची विकेट एकाच चेंडूत उडवून सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाने नवे निशाण फडकवले आहे! पंजाबमधील या पीचवर त्यांना साथ आहे ती कोण्या क्रिकेटपटूची नव्हे, तर परगटसिंग या सुप्रसिद्ध हॉकीपटूची!

अखेर क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवजोतसिंग सिद्धू यांनी एकाच वेळी ‘आम आदमी पार्टी’ आणि काँग्रेस या दोन पक्षांचा त्रिफळा उडवला आहे! क्रिकेटमध्ये सिद्धू यांनी कधी गोलंदाजी केली होती का नाही, त्याचा शोध आकडेवारी तज्ज्ञ घेतीलच; पण राजकीय पीचवर मात्र सिद्धू मोठ्या हुशारीने गोलंदाजी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आपल्याकडे डोळे लावून बसलेल्या ‘आप’ आणि ‘काँग्रेस’ या दोन्ही पक्षांची विकेट एकाच चेंडूत उडवून सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाने नवे निशाण फडकवले आहे! पंजाबमधील या पीचवर त्यांना साथ आहे ती कोण्या क्रिकेटपटूची नव्हे, तर परगटसिंग या सुप्रसिद्ध हॉकीपटूची! त्यामुळे क्रिकेटचा सतत बोलबाला होत असल्याबद्दल चिंता आणि नाराजी व्यक्‍त करणाऱ्या अन्य क्रीडाप्रेमींनाही हायसे वाटायला हरकत नाही. खरे तर भाजपवर नाराज होऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे सिद्धू हे आता ‘आप’मध्ये सामील झालेच, असे वातावरण मध्यंतरी निर्माण झाले होते आणि स्वत: सिद्धू यांची अरविंद केजरीवाल यांच्याशी प्रदीर्घ चर्चाही झाली होती. मग नेमके बिनसले कोठे? तर त्यामागे अर्थातच पंजाबचे मुख्यमंत्रिपद हे कारण असणारच! केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून ‘प्रोजेक्‍ट’ करण्यास नकार दिला काय, ही बाब सध्या तरी गुलदस्तातच आहे. मात्र, ‘आम आदमी पार्टी’ची गेल्या काही दिवसांत विविध कारणांनी घसरत चाललेली पत, हेही ‘आवाज-ए-पंजाब’च्या स्थापनेमागील प्रमुख कारण असू शकते. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी संदीप कुमार यांना बलात्काराच्या आरोपावरून झालेली अटक; तसेच पक्षांतर्गत मतभेदांमुळे ‘आप’चे पंजाबमधील प्रमुख सच्चासिंग छोटेलाल यांची झालेली हकालपट्टी यामुळे गेल्या काही दिवसांत ‘आप’ची पत चांगलीच घसरली असून या पक्षात उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सिद्धू आणि परगट यांच्या या नव्या ‘खेळी’त सच्चासिंगही तातडीने दाखल झाले आहेत! शिवाय, विद्यमान दोन आमदार बेन्स बंधूही सिद्धू यांना येऊन मिळाले आहेत. त्यामुळे पंजाबात विधानसभा निवडणूक अकाली दल-भारतीय जनता पक्ष, विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप विरुद्ध ‘आवाज-ए-पंजाब’ अशी चौरंगी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रचारात भरपूर रंगत येणार असली, तरी पंजाबचे भवितव्य मात्र अधांतरीच टांगले जाणार, यात शंका नसावी!

Web Title: Nishan A Aap