मधुजालाचे अस्त्र (अग्रलेख)

nishant agarwal
nishant agarwal

संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे.

नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या आरोपाखाली झालेली अटक केवळ धक्कादायक नव्हे, तर चिंताजनकही आहे. अलीकडेच निशांतला तरुण शास्त्रज्ञ म्हणून पुरस्कार मिळाला होता. भारतीय लष्करातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना देखण्या तरुणींच्या माध्यमातून भुरळ घालणे आणि त्यांच्याकडून संवेदनशील व गोपनीय माहिती मिळवणे ही ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या कामाची पद्धत आता लपून राहिलेली नाही. अशाच प्रकरणांत यापूर्वी भारतीय लष्करातील काहींना अटक झाली आहे. प्रथमदर्शनी ‘शासकीय गोपनीयता कायदा’च अशांवर लागू होतो. तसा तो निशांतवरही झाला आहे. अधिक तपासानंतर त्याच्यावर आणखी कलमे लावली जातील. नागपूरसारख्या शांत शहरात वास्तव्याला असलेला निशांत मूळचा रुरकीचा. देशाचा मानबिंदू असलेल्या ‘ब्राह्मोस’सारख्या क्षेपणास्त्र संशोधन केंद्रात तो शास्त्रज्ञ होता. तंत्रज्ञान विभागात त्याच्या हाताखाली ४० कर्मचारी होते. याशिवाय, पिलानीतील प्रकल्पाचा प्रभारही त्याच्याकडे होता. एवढ्या महत्त्वाच्या पदावरील माणूस बुद्धिमान असतोच; पण ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून देखण्या तरुणी ‘फेसबुक’सारख्या माध्यमांतून संपर्कात येतात, तेव्हा त्यांची बुद्धी बहुधा काम करेनाशी होत असावी. यापूर्वीही काहींच्या बाबतीत हे घडले आहे. पण अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून आवश्‍यक ती कृती झाल्याचे ऐकिवात नाही. ‘ब्राह्मोस’सारख्या भारताचे ब्रह्मास्त्र म्हणविल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तान किंवा अमेरिकेला पोचविली गेली असेल, तर केवढे मोठे आक्रित घडेल, याची कल्पनाही करता येत नाही.
भारत- रशिया यांच्या ‘ब्राह्मोस’च्या संयुक्त प्रकल्पाचे नागपुरात संशोधन केंद्र आहे. एरवी कुणाच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने त्याचे काम चालते. जेथे भारतीय माणसे सहजासहजी पोचू शकत नाहीत, तेथे निशांतसारख्या संवेदनशील पदावर काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत शत्रूराष्ट्राचा ‘हनी ट्रॅप’ पोचू शकतो, हे लक्षात घेतले तर त्यामागचा उद्देशही स्पष्ट होतो. ‘ब्राह्मोस’ किंवा त्यासारखी इतर संरक्षणविषयक बाबींची माहिती इतर देशांना हवीच असते. पाकिस्तान म्हणा किंवा अमेरिका, त्यांना तर भारताच्या संरक्षणसिद्धतेची अधिकाधिक माहिती हवी असते. या घटनेला केवळ व्यक्तींच्या संपर्काचा आयाम नाही. त्याला प्रादेशिक शक्तिसंतुलनाचाही पैलू आहे.
‘ब्राह्मोस’ हे रडारला चकवू शकणारे क्षेपणास्त्र आहे. ‘सुपरसॉनिक क्रूज मिसाईल’ म्हणजे आवाजापेक्षा अधिक वेगाने हल्ला करू शकणारे दिग्दर्शित क्षेपणास्त्र म्हणजे ‘ब्राह्मोस’ आणि ते जगातील सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्र होय. पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमीन अशा कोणत्याही ठिकाणावरून हे क्षेपणास्त्र सोडता येते. चीनकडेही अशा प्रकारची यंत्रणा आहे. शत्रूंच्या जहाजापासून हिंद महासागराचे रक्षण करण्यात ‘ब्राह्मोस’ सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावते. भारतासाठी त्याची ताकद केवळ प्रतीकात्मक नाही, तर सामरिकदृष्ट्याही ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘ब्राह्मोस’ची पहिली चाचणी झाली, तेव्हापासूनच ते अमेरिकेच्या ‘हार्पून’च्या तुलनेत शक्तिशाली मानले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तान यांच्या जहाजांचा वावर वाढत आहे. ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे भारताचे ब्रह्मास्त्र आहे. कारण ‘ब्राह्मोस’चा वापर करून जमिनीखाली असलेले आण्विक केंद्र, कमांड आणि कंट्रोल सेंटर किंवा समुद्रावर उडत असलेल्या विमानांचासुद्धा लक्ष्यभेद करता येतो. चीनने अलीकडेच ‘सुपरसॉनिक मिसाईल’ विकसित केले. त्यात पाकिस्तानला स्वारस्य आहे. त्यामुळे भारताने ‘ब्राह्मोस’चे अद्ययावतीकरणही सुरू केले आहे. त्याचे नाव ‘ब्राह्मोस-टू’. त्याला ‘मॅक-७’ चा वेग असेल. अर्थात, ते आवाजापेक्षा सातपट अधिक वेगाने मारा करू शकेल. एकुणात ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र हा भारताच्या संरक्षण सिद्धतेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती निशांत अग्रवालसारख्या तरुण शास्त्रज्ञाने शत्रुराष्ट्रांना दिली असेल तर तो चिंतेचाच विषय म्हटला पाहिजे. २०१५ मध्ये लष्करातील एक आणि हवाई दलातील एक अशा दोन अधिकाऱ्यांना अशाच प्रकरणांत अटक झाली होती. २०१७ मध्ये आणखी दोघांना पकडण्यात आले होते. २०१८ मध्येही हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला हेरगिरीच्या प्रकरणी अटक झाली होती. काही महिन्यांपूर्वी अटक झालेला ए. एन. मिश्रा हा ‘बीएसएफ’चा जवान आणि निशांत अग्रवाल या दोघांनाही सारख्याच पद्धतीने हेरगिरीच्या जाळ्यात अडकविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. पण असे प्रकार आता प्रयत्नपूर्वक थांबविण्याची गरज आहे. इतक्‍या संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल तर या संदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे, हाच या घटनेचा धडा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com