कुणाला काय दाखवायचं? (पहाटपावलं)

डॉ. सपना शर्मा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

तुम्ही बरेच वेळा हे वाक्‍य ऐकलं असेल किंवा उच्चारलंही असेल- "त्यानं माझ्याबद्दल असं म्हटलंच कसं? मी असा नाही हे त्याला सिद्ध करून दाखवीन.' अशाच अर्थाचं बरंच काही आपण कितीदा तरी बोलून जातो किंवा तसं आपल्या मनात तरी घुटमळत राहतं.

तुम्ही बरेच वेळा हे वाक्‍य ऐकलं असेल किंवा उच्चारलंही असेल- "त्यानं माझ्याबद्दल असं म्हटलंच कसं? मी असा नाही हे त्याला सिद्ध करून दाखवीन.' अशाच अर्थाचं बरंच काही आपण कितीदा तरी बोलून जातो किंवा तसं आपल्या मनात तरी घुटमळत राहतं.

कुणी तरी काही तरी म्हटलं आणि ते म्हणणारच; पण त्याला चूक अगर स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची गरज इतकी जबर असते, की कित्येकांना तसं केल्याशिवाय नीट झोपही लागत नाही. जेव्हा आपण काही करायचं ठरवतो, अगदी नवे कपडे घालण्यासारखी क्षुल्लक बाब का असेना, त्याला चारचौघांकडून पसंती मिळत नाही, तोपर्यंत आपण अस्वस्थ असतो. त्यातच कुणी आपल्या निवडीवर किंवा आपल्या कार्यपद्धतीवर उघडपणे टीका केली, तर आपण आपल्या आवडीचं काही करतोय, या आनंदातून आपलं लक्ष पूर्णपणे उडून जातं. आनंद मावळतो आणि त्या ठिकाणी राग किंवा द्वेष घर करतं.

खरं पाहिलं तर गमतीदारच आहे हा प्रकार. मला जे आवडतं, जे मला बरोबर वाटतं, ज्या गोष्टींवर माझा विश्वास आहे, ते सगळं दुसऱ्यालाही आवडायलाच हवं असाच काहीसा आपला अट्टहास नाही काय? याचाच दुसरा अर्थ असा की, दुसऱ्याचं सगळं आपल्यालाही आवडायला हवं. पण तसं आवडतं काय? आणि नाही तर मग दुसऱ्यांवर ही बंधनं का? आणि तरीही त्याला नाहीच आवडलं, तर माझा माझ्या आवडीनिवडींवरचा आणि विचारशक्तीवरचा विश्वास का डळमळतो?
तुम्ही म्हणाल हे खरे नाही; पण विचार करून पाहा. बहुतांश लोक त्यांना चार गोष्टी ऐकवणाऱ्या व्यक्तीला आपलं मत पटवून द्यायला जिवाचा आटापिटा करतात. महत्त्वाच्या आणि वैयक्तिक गोष्टी तर सोडाच, पण देशाच्या राजकारणावर होणाऱ्या गप्पांच्या वेळीसुद्धा एक-दोघे आपले विचार समोरच्याच्या घशाखाली उतरवण्यासाठी अगदी लढवय्याचा पवित्रा घेताना दिसतात.

मी तुम्हाला एक प्रश्‍न विचारते- तुमच्यासाठी तुमचं सत्य, तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे की, दुसऱ्यांना ते सत्य पटवून देणं? थोडं थांबून विचार करा. आपली मौल्यवान ऊर्जा, आपला विश्वास, आपला वेळ आपल्या सत्याच्या मार्गावर पुढे पाऊल उचलण्यासाठी न वापरता आपण नकारात्मक, निंदकांच्या खोट्या अहंकाराला खतपाणी घालण्यात तर गमावत नाही आहोत ना? आणि असे करत असाल तर त्याच्या मागचे कारण एकच- आत्मविश्वासाचा अभाव. दुसऱ्यांचा राग करण्याऐवजी आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास जागवा. कारण माझ्या निर्णयांवर आणि विचारांवर पूर्ण विश्वास असेल तर कुणालाही काहीही पटवून देण्याच्या भानगडीत न पडता मी माझ्या निर्णयावर अढळ राहीन. जाणकारांशी चर्चा करीन, पण निराशावादी, निंदकांसाठी माझ्याकडे असेल- केवळ एक स्मित.

Web Title: pahat pavale by sapna sharma