देण्याचा वसा (पहाटपावलं) 

आनंद अंतरकर 
सोमवार, 13 मार्च 2017

आंजर्ल्यातली गोष्ट. मी मंत्रमुग्ध नजरेनं पाहत होतो. दत्तू गडी रहाटावर बसून पाणी शेंदत होता. त्याच्या साऱ्या हालचाली एका लयीत चालल्या होत्या. दोन्ही हात आणि पाय यांचा सुंदर मेळ जमलेला. पायांनी दोरशिडी खाली दाबायची. हातांनी दोर वर-वर पकडत जायचा. विहिरीवरची एक अखंड क्रिया. निरंतर चाललेली. थांबून चालणार नाही. गाडगी भरतायत... रिकामी होतायत... पुन्हा भरतायत... दोन्ही बाजूंच्या नारळखोडांच्या पन्हळींतून झुळझुळ पाणी वाहतंय... मार्गावरच्या नारळ-पोफळींना पाणी पाजलं जातंय... झाडं आनंदित होताहेत... उत्साहानं तरारताहेत... जीवनाची एक लांबलचक मालिका. 

आमच्या शाळेत एक रागीट, कडक शिस्तीचे मास्तर होते. ते अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांला गाडग्याची उपमा द्यायचे. बाकांच्या मधल्या जागेतून हिंडताना या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांची सतत निशाणी चालायची ः ""हे गाडगं जरा कच्चंच आहे.'' ""हे गाडगं कमी भाजलेलं आहे'' किंवा ""कितीही शिकवा, हे गाडगं रिकामं ते रिकामंच!''...माझ्या वाट्याला बऱ्याचदा हे "सन्मान' यायचे. 
कोकणातल्या माझ्या मुक्कामात मी रोज दत्तूचं रहाट चालवणं निरखत होतो. मोठी मौज वाटत होती. एके दिवशी सहज त्याला म्हटलं, ""मला शिकव की रे रहाट चालवायला.'' 
दत्तूनं माझी शिकवणी पत्करली. मर्मांसकट हातपाय चालवायला शिकवलं. एकदा रहाटावर बसलो असताना अचानक विहिरीत खोलवर नजर गेली. काही चतुरांची टोळी बागडत होती. माझं अवधान सुटलं. लय बिघडली. चित्त विचलित झालं. हातातली आडवी फळी सुटली आणि तोल सुटल्यासारखं झालं. आता कोसळतोय धडपडत खाली, अशी भीती वाटली. छाती धपापत राहिली. मन धास्तावलं. धडा मिळाला. रहाट चालवताना मन एकाग्र हवं. द्विधा मनःस्थितीत मनावरचा ताबा सुटून हातापायांचा समन्वय ढळला, की जीव गोत्यात. कुठल्याही अर्धवट विद्येनं कुणाचाही घातच होणार. ज्ञानाचं गाडगं कसं पूर्ण भरलेलं हवं. फाजील आत्मविश्‍वास याचंच दुसरं नाव म्हणजे अवसानघात. 
लहानपणीचा अनुभव निव्वळ गमतीचा. रहाटाची भरलेली गाडगी पाहून आता ज्ञानाच्या कुंभांची आठवण येते. गाडगं कसं कायम भरलेलं पाहिजे- ज्ञानानं किंवा विचारांनी. मन (किंवा अंतःकरण) आणि मस्तक हा मानवी शरीरातला एक निर्मितीक्षम असा अन्योन्यसंबंध. जसा तो मातीचा बीजाशी असतो. दोन्ही ठिकाणं सदोदित कार्यमग्न. माणसाचं मनही सतत कशात ना कशात गुंतून राहायला हवं. रिकामं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. पावसाळ्याच्या दिवसांतलं आकाश जसं गाईच्या कासेसारखं जलदांनी ओथंबून येतं, तसं मनही सदैव विचारांनी ओथंबलेलं असावं. 
भरणं आणि रिकामं होणं ही क्रिया निसर्गात अविरत चाललेली असते. सतत वाढणं, परिवर्तन घडवणं, स्वतःबरोबर सहवासातल्या घटकांनाही विकसित करत राहणं, हा निसर्गाचा धर्म. रिकामं होणं म्हणजे देऊन टाकणं. आपल्या जवळचं जे जे दुसऱ्याला देण्यासारखं असेल ते सारं देऊन टाकणं. देण्यातूनच माणसाची स्वतःविषयीची जाण वाढते. त्याच्या जीवनाचं आत्मिक पातळीवर उन्नयन होत राहतं. एखादा महान आत्मा असेल तर तो सावली हरवून बसलेल्या पांथस्थाला स्वतः उन्हात उभा राहून आपली सावलीदेखील देऊ करील. 
देणाऱ्यानं स्नेहशील नि सहृदय समुद्राचा एखादा थेंब होण्याचा प्रयत्न करावा आणि अखेर लाटांच्या भुजा पसरून वाहणाऱ्या विशालकार समुद्राच्या गाडग्यात एकेदिवशी अलगदपणे विलीन होऊन जावं. 
 
Web Title: pahatpawal editorial