पाकपुढील मुख्य आव्हान जिहादींचे

विजय नाईक
बुधवार, 1 मार्च 2017

पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आणि दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटनेचे महासरचिटणीस इम्तियाज आलम यांनी नुकतीच दिल्लीला भेट दिली. भारत- पाकिस्तान संबंध सुधारावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे निकटवर्ती व पत्रकार इम्तियाझ आलम यांची गेल्या आठवड्यात दिल्लीत भेट झाली. भारतात येऊन त्यांनी वाराणसीला भेट दिली व तेथील जनतेशी संवाद साधला. आलम यांना भारत नवा नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक वेळा दिल्लीला भेटी दिल्या आहेत. निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर भारत-पाकिस्तान संबंधांबाबत त्यांनी चर्चा केली. उपखंडातील पत्रकारांना एका व्यासपीठावर आणण्यास त्यांचे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाले. ते दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटनेचे (सॅफ्मा) महासरचिटणीस आहेत. भूतान, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ व भारतात झालेल्या ‘सॅफ्मा’च्या परिषदांमध्ये भाग घेण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून आलम यांच्याशी ओळख झाली. संघटनेचे मुख्य कार्यालय लाहोरमध्ये असून, दहशतवाद्यांकडून सातत्याने धमक्‍या मिळत असल्याने प्रसिद्ध पत्रकार नजम सेठी यांच्याप्रमाणेच आलम यांना पाकिस्तानात सतत कमांडोंच्या गराड्यात वावरावे लागते. 

‘सॅफ्मा’चे लाहोरमधील कार्यालय उडवून देण्याची धमकीही दहशतवादी अधूनमधून देत असतात. या संघटनेला दहा- बारा वर्षांपूर्वी नॉर्वे, डेन्मार्क आदी देशांकडून देणग्या मिळायच्या. भारतीय उपखंडात शांतता नांदावी, या उद्देशाने या देशांतून देणग्या येत. त्यातून संघर्ष सोडवणुकीचे कार्य काही प्रमाणात हाती घेऊन ‘सॅफ्मा’ने पंतप्रधान, अध्यक्ष व परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर संपर्क साधला होता. ‘सार्क’च्या आठ सदस्य देशांत या संघटनेच्या शाखा आहेत. परंतु, युरोपातील मंदीमुळे आर्थिक मदतीचा ओघ आटला व संघटनेचे कार्य बऱ्याच प्रमाणात घटले.  

गेल्या काही महिन्यांत भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंध कमालीचे तणावग्रस्त झाले आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे पठाणकोट, उरी व नगरोटा येथे दहशतवाद्यांनी केलेले हल्ले, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक व परस्परांच्या दूतावासांतील अधिकाऱ्यांची हकालपट्टी ही आहेत. पाकिस्तानात होणाऱ्या ‘सार्क’ च्या शिखर परिषदेला उपस्थित न राहण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे ही परिषद तर बारगळलीच, पण खुद्द ‘सार्क’च्या भवितव्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

‘‘उत्तर प्रदेशाच्या निकालांचा कानोसा तुम्हाला का घ्यायचाय,’’ असे विचारता आलम म्हणाले, ‘‘भारताबरोबर पाकिस्तानला संवाद साधायचा आहे. उत्तर प्रदेशात भाजपची सरशी झाली, तर दोन्ही देशांदरम्यानच्या संवादाला चालना मिळेल काय, हे मला जाणून घ्यायचे आहे.’’ बिहारमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे व काश्‍मीरमधील हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना भेटीचे आमंत्रण दिल्यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यानंतर, एका अनौपचारिक भेटीत बासित म्हणाले होते, ‘‘मला वाटते की भारत सरकार आता माझी मान्यता काढून घेईल.’’ अर्थात, तसे झाले नाही. उलट, बासित यांची पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी नेमणूक होईल, असे वृत्त आले. ते भारतातील अनेक वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केले. 

पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्ताच्या वृत्तपत्रीय संपर्क विभागाने सुरू केलेल्या ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप’वर अभिनंदन करणारे अनेक निरोप बासित यांना आले. त्याच दिवशी (१९ जानेवारी) ‘जैश-ए- महंमद’चा म्होरक्‍या मसूद अजहरला अटक करण्यात आली. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होऊन त्यांनी सत्तासूत्रे हाती घेताच मसूद अजहरबाबत पाकिस्तानने एकाएकी नांगी टाकली व त्याला अटक केली. दुसरीकडे, शरीफ यांनी बासित यांच्याऐवजी तेहमीना जान्जुआ यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली. जान्जुआ या जीनिव्हातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयातील पाकिस्तानच्या कायमच्या प्रतिनिधी. अचानक हा बदल कसा झाला? आलम यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘बासित यांनी वारंवार केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे उभय देशांदरम्यानचे संबंध बिघडले. ते लष्कराच्या इशाऱ्यानुसार वागायचे. आम्ही त्यांना ‘हॉक’ म्हणतो. जान्जुआ यांची निवड शरीफ यांनी केली, ती त्यामुळेच.’’

ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याची बव्हंश सूत्रे हाती असलेले सल्लागार सरताज अझीज हेही ‘हॉक’ (मैत्रीस प्रतिकूल) आहेत. त्याआधी परराष्ट्र सचिवपदी असताना सलमान बशीर हेही ‘हॉक’ होते. परंतु, पाकिस्तानने २०१२ मध्ये त्यांची भारतात उच्चायुक्तपदी नेमणूक केल्यानंतर मवाळ भूमिका घेत संबंध सुधारण्याचे प्रयत्न त्यांनी केले.’’ 

‘‘मसूद अजहरची कैद हे नाटक आहे काय,’’ या प्रश्‍नावर आलम म्हणाले, ‘‘या वेळी सरकार गंभीर आहे. अमेरिकेचा दबाव म्हणा, की आणखी काही. परंतु, शरीफ यांच्यापुढे प्रश्‍न आहे, तो मसूद अजहरने तयार केलेल्या पंधरा हजार जिहादींचा. त्यांचे काय करायचे? जिहादींना मोकाट सोडल्यास ते काश्‍मीरकडे वळणार नाहीत काय? त्यांना रोखणे शक्‍य आहे काय? अर्थातच, ते काम लष्कराला करावे लागेल. दहशतवादाचे पीक आम्हीच काढतो आहोत. त्यांना आवरणे मुश्‍किल होऊन बसले आहे.’’

पंजाबमधील सिंध प्रांतातील सेहवान सुफी संत लाल शाहबाज कलंदर यांच्या प्रार्थनास्थळावर ‘इसिस’ने १६ फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्ल्यांत शंभर लोक ठार व असंख्य जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने शंभर दहशतवाद्यांना ठार केले. या घटनांमुळे पाकिस्तानातील परिस्थिती बरीच चिघळली आहे. याबाबत, तसेच नवाज शरीफ यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात ‘पनामा पेपर्स’ने केलेल्या गौप्यस्फोटामुळे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याबाबत आलम यांनी चिंता व्यक्त केली.