पाकिस्तान दुसऱ्यांदा फुटीच्या उंबरठ्यावर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

गेल्या दीड महिन्यापासून काश्‍मीर खोऱ्यातील पंचस्तंभींना चिथावणी देणारा पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून मारलेल्या एकाच फटक्‍यात ताळ्यावर आला. ज्याची कल्पनाही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी केली नसेल असा पवित्रा मोदी यांनी घेतल्याने शेजाऱ्याच्या गोटात गोंधळ माजला.

गेल्या दीड महिन्यापासून काश्‍मीर खोऱ्यातील पंचस्तंभींना चिथावणी देणारा पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून मारलेल्या एकाच फटक्‍यात ताळ्यावर आला. ज्याची कल्पनाही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी केली नसेल असा पवित्रा मोदी यांनी घेतल्याने शेजाऱ्याच्या गोटात गोंधळ माजला.

ज्या देशाची निर्मितीच भारतविरोध आणि धर्माच्या नावावर झाली त्या देशाचे भवितव्य तरी काय असणार? गेली 70 वर्षे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आहे. कधी अमेरिका तर कधी चीनच्या भिकेवर जगणारे मध्ययुगीन मानसिकतेत वावरणारे पाकिस्तानी राज्यकर्ते दिल्ली जिंकण्याच्या गमजा मारत असतात. तीन युद्धे आणि कारगीलच्या लढाईत सपाटून मार खाऊनही "रूहानियत‘च्या हिंदोळ्यावर झुलणारे नापाक पाकिस्तानी लष्करी अधिकारी व राज्यकर्ते भूतकाळापासून धडा घ्यायला तयार नसतील तर पाकिस्तानचा आणखी एक तुकडा बलुचिस्तानच्या रूपाने पडायला वेळ लागणार नाही.
काश्‍मीर खोऱ्यात सरपंच आणि सुरक्षा सैनिकांवर हल्ले करणाऱ्या बुऱ्हान वाणीला लष्कराने 8 जुलै 2016 रोजी अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग भागात चकमकीत ठार केले. वाणी ठार होणे हा हिजबूल मुजाहिदीनला मोठा धक्‍का होता. काश्‍मिरात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानने अतिरेक्‍यांना चिथावणी देणे सुरू केले. एवढेच नव्हे तर बुऱ्हानला शहिदाचा दर्जा दिला. पाकचे हे कृत्य म्हणजे भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप होता. भारत हे सहन करणे शक्‍यच नव्हते. इच्छा नसतानाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी "सार्क‘ परिषदेच्या निमित्ताने 5 ऑगस्ट 2016 रोजी इस्लामाबाद गाठून पाकिस्तानचा दहशतवाद चव्हाट्यावर आणला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सामजस्याची भूमिका घेण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचे काम केले. शरीफ यांनी पाकव्याप्त काश्‍मीरची राजधानी मुजफ्फराबाद येथे 22 जुलै 2016 ला सभा घेऊन काश्‍मीर पाकिस्तानात येण्याची वाट पाहत असल्याचे चिथावणीखोर वक्‍तव्य केले. एवढेच नव्हे तर त्यांनी युनोला पत्र लिहून काश्‍मीरमध्ये होत असलेल्या तथाकथित मानवी हक्‍कांच्या उल्लंघनावरून हस्तक्षेप करण्याची मागणीही केली. शरीफ यांचा हा पवित्रा भारताच्या संयमाचा अंत होता. आपलेच घर जळत असताना दुसऱ्यांच्या घराला आग लावण्याचा हा प्रकार होता. गेली 39 दिवस काश्‍मीर खोरे अशांत आहे ते पाकच्या कुरापतींमुळेच. या सर्वांचा एकत्र परिणाम म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरूनच पाकिस्तानला उघडेनागडे केले. काश्‍मीरवर वाकडी नजर टाकली तर बलुचिस्तान तुमच्यापासून तोडून टाकू, असा थेट इशाराच दिला. हा घाव पाकिस्तानच्या एवढा वर्मी बसला की त्याच दिवशी शरीफ सरकारने बलुच नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर वांशिक संघर्ष गेल्या 70 वर्षांपासून धुमसत आहे. बलुचिस्तान, वजिरिस्तान, पख्तूनखोवा या भागातील स्वतंत्र वृत्तीचे टोळीवाले भारतातून फुटून आलेल्या बाटग्यांना आपले मानायला तयार नाहीत. मात्र, बलुची नागरिकांवर गेल्या सात दशकांपासून पंजाबी राज्यकर्ते आणि लष्करी अधिकारी अनन्वित अत्याचार करीत आहेत. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला भिडून असलेला बलुचिस्तान हा कधीच पाकिस्तानचा भाग नव्हता. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे असलेला बलुचिस्तान पाकिस्तानच्या समृद्धीचा स्त्रोत आहे. परंतु पाक राज्यकर्त्यांनी गेल्या 70 वर्षांत या प्रांताची लूट केली. सर्वांत समृद्ध असलेला प्रांत आज अत्यंत मागासलेल्या अवस्थेत आहे. भारताला शह देण्यासाठी चीनच्या मदतीने उभारण्यात येणारे  ग्वादार बंदरही याच प्रांतात आहे.

फाळणी जाहीर झाल्यानंतर बलुचिस्तानने 11 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. बलुच जमातीचे नागरिक स्वतंत्र बाण्याचे, धाडसी, शूर आणि स्वाभिमानी आहेत. हिंदूंसोबत आम्ही नांदू शकत नाही, असे सांगत पाकिस्तानची निर्मिती करणारे मोहम्मद अली जीना यांच्यासाठी मुस्लिम असलेल्या बलुचिस्तानने स्वतंत्र झाल्याची घोषणा करणे मोठा धक्‍का होता. परिणामी पाक सैन्याने एप्रिल 1948 मध्ये कारवाई करीत या प्रदेशावर बळजबरीने ताबा मिळविला. तेव्हापासून बलुच नागरिक स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानविरुद्ध लढत आहेत. गेल्या सात दशकांत पाक सैन्याने बलुची नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. दहशतवादविरोधी युद्धाच्या नावाखाली मातीच्या घरांवर विमानातून बॉम्बहल्ले केले. 26 ऑगस्ट 2006 मध्ये वरिष्ठ बलुची नेते नवाब अकबर खान बुगती यांना ठार केले. अनेक नेते परांगदा झाले. मायभूमीपासून दूर असलेल्या या बलुची नेत्यांना नरेंद्र मोदींच्या रूपाने आधार मिळाला. लाल किल्ल्यावरून मोदी यांनी बलुची जनतेच दु:ख जगासमोर मांडल्याने त्यांना दिलासा मिळाला तर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश जन्माला घातला. यापासून जर शेजाऱ्याने धडा घेतला नाही तर बलुचिस्तानच्या रूपाने आणखी एक तुकडा पाडण्यास वेळ लागणार नाही.

बलुचिस्तानशी महाराष्ट्राचे नाते
बलुचिस्तानशी महाराष्ट्राशी नाते आहे. तिसऱ्या पानिपतच्या युद्धात अहमदशहा अब्दालीने काही मराठ्यांना गुलाम म्हणून आपल्यासोबत नेले. पण बलुचिस्तानात पोहोचल्यानंतर मराठ्यांना उष्णतेमुळे पुढील प्रवास करणे अशक्‍य झाले. त्यामुळे काही मराठे बलुचिस्तानातच थांबले. काळाच्या ओघात हे मराठे मुस्लिम झाले. अनेक तरुण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतात.

Web Title: Pakistan's feet on the threshold of a second?