आत्मधन! (परिमळ)

आत्मधन! (परिमळ)

प्रेषित येशू ख्रिस्तांनी एका प्रवचनात सांगितलेली एक गोष्ट. एक श्रीमंत मनुष्य असतो. काही कामानिमित्त तो परगावी जाणार होता. निघताना त्याने आपल्या तीन नोकरांना सोन्याची प्रत्येकी एक मोहोर दिली. "तुम्ही याचे काय करायचे ते ठरवा व त्याप्रमाणे करा,‘ असे सांगून तो गेला. तिघेही सोन्याची मोहोर मिळाल्याने आनंदात होते. त्यातल्या एकाने ती मोहोर व्यापाराच्या उद्देशाने गुंतवली. त्या बदल्यात त्याला काही दिवसांतच दहा मोहोरा मिळाल्या. दुसऱ्यानेही अशीच गुंतवणूक केली. त्यालाही पाच मोहोरा मिळाल्या. तिसऱ्याने मात्र काहीच केले नाही. ती मोहोर जपून ठेवली. त्यामुळे त्यात वाढ झाली नाही. काही दिवसांनी तो श्रीमंत मनुष्य परत आला आणि त्याने तिघांची चौकशी केली. पहिल्या दोघांचे कौतुक करून त्याने तिसऱ्याला हाकलून दिले.
या गोष्टीचा मथितार्थ काय? येशू ख्रिस्तांनी हे व्यावहारिक उदाहरण दिले, पण त्याचा आशय आध्यात्मिक आहे. तो श्रीमंत म्हणजे परमेश्‍वर, तर तिन्ही नोकर म्हणजे सामान्य माणसे. तीन मोहोरा म्हणजे "सद्‌गुण‘ होत. हा सद्‌गुण "विवेका‘चा असेल असे समजू. पहिल्याने आपल्याला लाभलेला "माणूस‘ जन्म विवेकाने जगण्यासाठी वापरला, कारण विवेक हा देवाने दिलेला सद्‌गुण होता. एका सद्‌गुणातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे वास्तव जीवनात घडतेच आणि त्यांची मालिका होते. सबंध जीवन सद्‌गुणांनी मंडीत होते. अशा सद्‌गुणसंपन्न माणसाला संत म्हटले जाते. तो संत झाला. दुसऱ्याने तीच वाट धरली, तोही बऱ्यापैकी "धनवान‘ झाला. तो संत झाला नाही, पण संतत्वाच्या साधनापथावरून चालू लागला. आणि तिसरा- तो मात्र कफल्लक झाला. त्याची मोहोर काढून घेतली आणि त्याला हाकलून दिले. तो बाहेरच्या गोष्टीत रमल्याने त्याचा आत्मसंकोच झाला. आत्मधनाच्या-सद्‌गुणांच्या बाबतीत दरिद्री झाला, असा त्याचा आशय आहे.
आज माणसाची अवस्था त्या तिसऱ्या आत्मवंचित माणसासारखी झाली आहे. माणसे बाह्य-भौतिक गोष्टींच्या मागे लागतात, भौतिकदृष्ट्या संपन्न होतात; पण खऱ्या धनाला मुकतात. खरे तर भाग्याने मिळालेला मानवी जन्म त्यांनी सत्कारणी लावला पाहिजे. माणूस म्हणून उन्नत झाले तरी पुरेसे आहे. वस्तुतः माणूस हा पशू आणि देव या दोन्ही कोटींचा समन्वय आहे. त्याच्यात पशू आहे हे वास्तव आहे. कारण तो मुळात "प्राणी‘च आहे. त्याच्यात देवत्व आहे; पण त्याबाबतीत तो अनभिज्ञ आहे, म्हणजेच त्याच्या ठिकाणी देवाविषयीची कल्पना आहे. ही कल्पना साकार झाली, की तो देवत्वाला पोचतो म्हणजे "संत‘ होतो. याचा अर्थ त्याच्यात देवत्व असते; पण विवेक-विचार रूपात असते. त्याच्या साह्याने चांगले-वाईट ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे यातच सद्‌गुण दडला आहे. त्या तिघांपैकी दोघांनी विवेकाची वाट चोखाळली आणि ते खऱ्या धनाचे मालक झाले. तिसरा मात्र माणूस म्हणून जन्मला; पण तसे जगला नाही. आपला विवेक न वापरताच जगला. म्हणून तो या धनाला पारखा झाला. आपली गत तशी होऊ नये, हेच यातून लक्षात घ्यायचे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com