नाते- तो आणि ती (परिमळ)

नाते- तो आणि ती (परिमळ)

तो आणि ती, अर्थात स्त्री आणि पुरुष, यांच्यामधील नाते हे आई आणि मूल किंवा पिता आणि मूल यांच्या इतकेच आदिम आहे. पण असे जरी असले, तरी आम्हा सामान्य माणसांना हे नाते नेहमीच गोंधळवून टाकते. इथे स्त्री-पुरुष नाते याचा अर्थ केवळ पती-पत्नी किंवा मित्र-मैत्रीण इतका मर्यादित नव्हे, तर अन्य कोठल्याही प्रकारचे नाते असा व्यापक आहे. उदाहरणार्थ, न्यायाधीश- आरोपी, सेनापती-सैनिक इ. यातील न्यायाधीश किंवा सेनापती स्त्री आहे आणि आरोपी किंवा सैनिक पुरुष आहे अशी कल्पना करा म्हणजे हे नाते कसे अवघडून टाकणारे होते हे तत्काळ लक्षात येईल. 

स्त्री आणि पुरुष या मानवजातीतील मूलभूत कोटी किंवा वर्ग. त्यांच्यातील नाते सौहार्दपूर्ण आहे असे दिसून येत नाही. स्त्रीची गेल्या काही सहस्र वर्षांत जबरदस्त कोंडी झाली आहे आणि याला जबाबदार अर्थात पुरुष आहे. 

या कोंडीची सुरवात तर स्त्रीच्या जन्मापूर्वीपासूनच सुरू होते. ती जन्मालाच येऊ नये अशी कारस्थाने सुरू असतात. हे टळून स्त्री जन्मली तरी तिचा पुढचा प्रवास सापत्न वागणूक, समान संधी न मिळणे, शुचितेच्या अतार्किक कल्पना माथी मारणे अशा काटेरी वाटेनेच सुरू असतो. यामुळे फक्त स्त्रीवर्गाचेच नुकसान होते असे नव्हे. पुरुषांवरही याचा किती प्रतिकूल परिणाम झाला हे आपल्या हे लक्षातच येत नाही. आपण श्रेष्ठ असल्याच्या भ्रामक कल्पनेखाली पुरुष पिढ्यान्‌पिढ्या जगत राहतात. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, तरी ‘रडतोस काय बाईसारखा?‘ असे ऐकून घ्यावे लागते. नजाकत, मार्दव, वात्सल्य, सहनशीलता ही स्त्रीवर्गाची, तर आक्रमकता, बेडरपणा, बलिष्ठता ही पुरुषवर्गाची व्यवच्छेदक लक्षणे मानली जातात. पुरुषात नजाकत आणि स्त्रीमध्ये बलिष्ठता दिसून आली, तर ते कमअस्सलपणाचे लक्षण मानले जाते. ‘बाई असूनही...‘ अशी सुरवात असणारे विधान ऐकले की काय म्हणावे कळत नाही. त्याच्यानंतर ‘सिग्नल तोडला‘ किंवा ‘एव्हरेस्ट चढली‘ असे काहीही म्हटले असले तरीही. 

कोणाला असे वाटू शकेल की या साऱ्याचा तो आणि ती यांच्यामधील नात्याशी काय संबंध आहे? याचे स्पष्टीकरण असे आहे, की वर उल्लेखिलेली उदाहरणे पूर्वग्रहाची नमुनेदार उदाहरणे आहेत. पूर्वग्रह हे भ्रामक आणि खोटे असतात. ते केवळ दिशाभूल करतात. जोवर पूर्वग्रह खोटे आहेत, हे आकलन होत नाही तोवर त्यांवर विसंबणे एकवेळ समजण्यासारखे आहे. मासिक पाळी ही घाम येण्यासारखीच एक शारीरिक क्रिया आहे, याचे निःसंदेह आकलन होऊनही त्याला पावित्र्याच्या कल्पना जोडणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच होय. जोवर पुरुष या मानसिकतेतून बाहेर येत नाहीत, तोवर तो आणि ती यांच्यामधील नाते असेच अवघडलेले राहणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com