परिमळ : निर्मळ आणि निकोप

Parimal Arankalle
Parimal Arankalle

स्पर्धा संपल्या होत्या. परीक्षक निकषांनुसार गुणांची मांडणी करण्यात व्यग्र होते. मुलांना निकालाची प्रतीक्षा होती. मोठ्या ईर्ष्येनं परस्परांविरुद्ध स्पर्धेत उतरलेली वेगवेगळ्या शाळांची मुलं केव्हाच एकत्र मिसळली होती. गप्पागोष्टींत रंगली होती. खेळांत दंग झाली होती. कुठं भेंड्या सुरू होत्या, तर कुठं चोर-शिपायांनी बहार उडवून दिली होती. गुणांच्या अंकांच्या नोंदी झाल्या. क्रमांक निश्‍चित झाले.

परीक्षकांनी स्पर्धा संयोजकांकडं निकाल सुपूर्द केला. बक्षीस समारंभासाठी मुलांनी सभागृहात येण्याची सूचना होताच, पूर्णविरामाची चिन्हं तिथं ठेवून रंगलेले खेळ क्षणात विरून गेले. काही वेळ सभागृहात चिवचिवाटाची आषाढधार बरसत राहिली. गटागटांना शेजारी-शेजारी जागा मिळेपर्यंत दप्तरांचं ओझं सावरणारी पाखरं पंख फडफडवीत इकडं-तिकडं भरारत राहिली. संयोजक, परीक्षक आणि पाहुणे व्यासपीठावर आले. मुलांचे आवाज शांत झाले. कुठं कुठं कोवळ्या टाळ्यांचे हलके आवाज भिरभिरले. दोन बोटांनी केलेले इंग्रजी "व्ही'चे आकार काही खुर्च्यांतून उंचावले. उजव्या हाताच्या उत्साहभरल्या अंगठ्यानं काहींनी आत्मविश्‍वास दर्शविला.


समारंभाची औपचारिकता सुरू झाली. प्रास्ताविक झालं. स्वागत झालं. पाहुण्यांचा परिचय करून दिला गेला. त्यांचे "मार्गदर्शनपर चार शब्द' तब्बल चाळीस मिनिटं सुरू राहिले. मुलांची उत्सुकता शिगेला पोचली. "तुम्ही ज्या क्षणांची आतुरतेनं वाट पाहत आहात, तो बक्षीस वितरणाचा क्षण आता...' या घोषणेनंतर खुर्च्यांतील सारेच मित्र-मैत्रिणी सावरून बसले. माना उंचावून, अवघ्या शरीराचा कान करून निकाल ऐकू लागले. आधी उत्तेजनार्थ आणि नंतर तीन, दोन, एक या क्रमानं बक्षिसं जाहीर होऊ लागली. विजेत्या संघाचं नाव घोषित केलं जाताच "हे ऽऽऽ' अशा सामूहिक हाकाऱ्यासह जिंकल्याचा आनंद साजरा होई. हात उंच केले जात; आणि उड्या मारून जल्लोषही होई. खुर्च्यांतून वाट काढीत संघ व्यासपीठावर दाखल होई. बक्षीस स्वीकारताना फोटोसाठी खास पोझ दिली जाई. उभे-आडवे, गोल-लंबवर्तुळाकार असे हास्याचे प्रकार चेहऱ्याचेहऱ्यांवर नाचत राहत. इतर मित्रांना तिथून काही खाणाखुणाही होत. व्यासपीठाच्या पायऱ्या उतरतानाही कसले कसले हावभाव आणि खाणाखुणा यांतून आनंदाची कारंजी पुनःपुन्हा उसळून येत.


बक्षिसांच्या क्रमाप्रमाणंच आनंदाची पातळीही वर वर जात होती. व्यासपीठावर आणि सभागृहात आरोळ्यांचा, टोपणनावांच्या विचित्र उच्चारांचा पाऊस बरसत होता. आनंद स्मितहास्यातून दर्शविला जातो. दंतपक्तींचं पूर्ण दर्शन घडविणाऱ्या हास्यातून तो व्यक्त केला जातो. आनंदाचे म्हणून ओळखले जाणारे आवाज काढून आनंद पसरविला जातो. मुलांच्या जगात या रूढ प्रकारांपेक्षा वेगळी, पूर्ण आनंद व्यक्त करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आनंदाचं लडिवाळ रूप चेंडूसारख्या उसळ्या घेत सामोरं यावं, तसं दृश्‍य सभागृहभर खेळत होतं. आनंदाच्या एवढ्या प्रसन्न, निर्मळ आणि निकोप उड्या निरागस मनातूनच उसळून येऊ शकतात. स्पर्धा आणि स्पर्धक दोघंही निकोप असल्याशिवाय असा निवळशंख आनंद घेताच येणार नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com