पोर्तु 'गोल' (मर्म)

पोर्तु 'गोल' (मर्म)

फुटबॉलमधील नव्वद मिनिटांच्या पदन्यासाने अवघ्या विश्‍वाला नेहमीच भुरळ घातली आहे. मग ती स्पर्धा विश्‍वकरंडक असो, ‘युरो‘ वा ‘कोपा अमेरिकन‘ असो वा व्यावसायिक लीगमधील सामना असो. युरो करंडक स्पर्धाही त्याला अपवाद नाही. साखळी सामन्यापासून वाढलेली उत्कंठा अंतिम सामन्यापर्यंत शिगेला पोचली होती. फ्रान्सला तिसऱ्या, तर पोर्तुगालला पहिल्या विजेतेपदाची आस होती. निकाल काहीही लागला, तरी ती युरो स्पर्धेतील क्रांतीच ठरणार होती. ती घडवण्याचा मान पोर्तुगालने मिळविला. अंतिम सामना तसा कंटाळवाणाच झाला. गोल करण्याच्या एखाद- दुसऱ्या संधी निर्माण झाल्या. पण, निर्धारित वेळेत त्या फोल ठरल्या. यातही फ्रान्स आघाडीवर होते. पण, पोर्तुगालने अतिरिक्त वेळेत तुफान खेळ करून मिळालेल्या संधीपैकी एक साधत ‘जो जिता वही सिकंदर‘ ही उक्ती खरी करून दाखवली. 

आणखी एका ‘युरो‘ स्पर्धेने फ्रान्स, स्पेन, इटली, पोर्तुगाल, जर्मनी या देशांतही ‘स्टार‘ आहेत हे पुन्हा दाखवून दिले. काही नव्या ‘स्टार‘समोर इंग्लंड, स्पेन या मातब्बर देशांचे आव्हान संपुष्टात आले. प्रथमच पदार्पण करणाऱ्या नॉर्दन आयर्लंड, आईसलॅंड या संघांनी आपणही भविष्यात ताकद बनू शकतो याचा साक्षात्कार घडवला. व्यावसायिक फुटबॉलमध्ये महागड्या ठरलेल्या गॅरेथ बेलच्या जोरावर वेल्सनेही मुसंडी मारली. शेवटी लक्षात राहिले फ्रान्स आणि पोर्तुगाल हे दोनच संघ. अंतिम सामन्याला सुरवात होईपर्यंत फ्रान्सच विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मैदानावर जणू अवघे फ्रान्स एकवटल्याचा भास होत होता. ग्रिझ्मन, गिरौड, पाएट, पोग्बा हे खेळाडू भरात होते. पोर्तुगाल एकट्या रोनाल्डोच्या क्षमतेवर अवलंबून होता. पण, तो जायबंदी होऊन परतला. सेनापतीच मैदान सोडून गेल्यावर शिलेदारांचे काय होणार? पण, ते लढले. बचावाला त्यांनी ढाल बनवले. फ्रान्सची आक्रमणे त्यांनी थोपवून धरली. निर्धारित वेळेत फ्रान्सचा जिनॅक दुर्दैवी ठरला. त्याचा फटका गोलपोस्टच्या कडेला लागून बाहेर गेला. पोर्तुगालचे नशीब बलवत्तर होते. बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या एडरच्या जबरदस्त किकने त्याला ‘स्टार‘ आणि पोर्तुगालला विजेते बनवले. त्याचबरोबर व्यावसायिक पातळीवरील हिरो देशासाठी काही करू शकत नाही, असे देखील आता किमान रोनाल्डोच्या बाबतीत कुणी म्हणणार नाही. रोनाल्डो या स्पर्धेत फार काही करू शकला नाही, पण त्याने सहकाऱ्यांना निश्‍चितच प्रेरित केले, हे नाकारता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com