याला बुद्धिमत्ता ऐसे नाव

प्रदीपकुमार माने
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कुठल्याही क्षेत्रात असामान्यत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज असते, याचा अभ्यास जगभरातील संशोधक करीत आहेत. एका अनोख्या मॉडेलचा वापर करून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची कौशल्ये जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

चार्ल्स डार्विन, अल्बर्ट आईनस्टाईन, पाब्लो पिकासो, रवींद्रनाथ टागोर, महंमद अली यांची नावं वाचल्यावर प्रथमदर्शनी मनात काय येतं? जगाचा इतिहास बदलणारी ही माणसं. होय ना? आपापल्या क्षेत्रात विराट पराक्रम गाजवणारी ही माणसं. आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून आपापल्या क्षेत्रांची क्षितिजं विस्तारणारी माणसं. यांनाच आपण त्या त्या क्षेत्रातील बुद्धिमान किंवा तज्ज्ञ म्हणतो. जीवनाच्या विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना अशा महान माणसांपासून प्रेरणा मिळते. पण ही कर्तृत्ववान माणसं कशी बरे निर्माण होत असतील, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञ या कर्तृत्वशाली लोकांच्या यशाचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करताहेत. एखाद्या व्यक्तीचा त्याच्या क्षेत्रातील असामान्य पातळीवरचा प्रवास कशामुळं शक्‍य होतो हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा कोणत्या गोष्टी या असामान्य माणसांकडे असतात की ज्यामुळं ते आपापल्या क्षेत्रात दबदबा निर्माण करतात? एकंदरीत कुठल्याही क्षेत्रात असामान्यत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज असते, याचा अभ्यास जगभरातील संशोधक करताहेत. आता अशा पद्धतीचं संशोधन करणं वरकरणी सोपं वाटत असलं, तरी तसं नाही. विविध क्षेत्रांतील महान माणसांना एकत्र आणून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून, त्यातून सर्वांना लागू पडणारे काही निष्कर्ष काढणं सोपं काम नाही. तरीही अशा पद्धतीचा प्रयत्न होतोय. अशा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी पद्धतीशास्त्र विकसित करणे गरजेचं असतं. एखाद्या क्षेत्रात प्रवीण असणं ही गोष्ट समजून घेण्यासाठी विविध पैलूंचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं आणि यासाठी विज्ञानात लागतात नवनवीन मॉडेल्स. मॉडेल्स म्हणजे पद्धती. या पद्धतींच्या साह्याने विज्ञानातील अज्ञात गोष्टींचा उलगडा करणं शक्‍य होतं. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची सर्वसाधारण कौशल्यं जाणून घेण्यासाठी संशोधक एका अनोख्या मॉडेलचा वापर करताहेत. ते म्हणजे विविध क्षेत्रांतील महान माणसांची महान बुद्धिपटूंबरोबर तुलना करणं आणि या दोन्ही क्षेत्रांतील लोकांमध्ये काम करण्याचे काही नियम आहेत का ते पाहणं. सुरवातीला हे थोडं अतार्किक वाटतं, पण या क्षेत्रातील संशोधन पाहिल्यावर ही गोष्ट पटायला वेळ लागणार नाही. फिलिप रॉस यांनी "सायंटिफिक अमेरिकन' मासिकात लिहिलेल्या "द एक्‍स्पर्ट माइंड' या लेखात या गोष्टींचा विस्तारपूर्वक उल्लेख केला आहे. जर्मनीतील ट्युबिन्जेन विद्यापीठातील शास्त्रज्ञ बिलालेक यांचे या विषयाच्या संदर्भातील कामही महत्त्वपूर्ण आहे.

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची बुद्धिबळासारख्या खेळाशी तुलना करण्याचे फायदे खूप आहेत. सर्वात पहिले म्हणजे बुद्धिबळाचे नियम सोपे असतात, पण नंतरनंतर हा खेळ गुंतागुंतीचा होत जातो. त्यामुळे तर गटेसारख्या महान कवीलासुद्धा हा खेळ "मानवी बुद्धिमत्तेची परमोच्च सीमा' वाटते. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचेही असेच असते. त्यांनी शोधलेली किंवा ते वापर करीत असलेली मूलभूत तत्त्वे सोपी असली, तरी त्यांच्याच साह्याने ते अद्‌भुत असे गुंतागुंतीचे विश्व निर्माण करतात. प्रथितयश बुद्धिबळपटूंप्रमाणे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनाही काय करावं हे ठरविण्यासाठी खूप वेळ लागत नाही. आजचं या विषयावरचं संशोधन असं सांगतं, की कुठल्याही क्षेत्रात असामान्य कार्य करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला आपल्या जीवनातील कमीत कमी दहा वर्षांचा कालावधी घालवावा लागतो आणि हा कालावधी जीवनाच्या कालावधीत जितक्‍या लवकर वापरता येईल तितका लवकर वापरल्याने फायदा होतो. या प्रदीर्घ अभ्यासानेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मग ते डॉक्‍टर असोत वा खेळाडू, शास्त्रज्ञ असोत वा कलाकार, त्यांच्यासमोरील अशक्‍य वाटणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकतात. ज्याप्रमाणे निष्णात बुद्धिबळपटू किती चाली करणं शक्‍य आहे, त्यापेक्षा कोणती चाल करणं महत्त्वपूर्ण आहे ते जाणतो, त्याप्रमाणे निष्णात डॉक्‍टर गुंतागुंतीच्या वेळीसुद्धा योग्य निदान करतो, तत्त्वज्ञ सूक्ष्म पातळीचा विचार करू शकतो आणि शास्त्रज्ञ अकल्पनीय असे सिद्धांत मांडतो.

बिलालीक यांनी याविषयी केलेलं संशोधन महत्त्वपूर्ण आहे. त्यांना "आयन्स्टेलुंग इफेक्‍ट' या विषयाच्या संशोधनासाठी "ब्रिटिश सायकॉलॉजीकल सोसायटी'चा पुरस्कार मिळाला आहे. हा इफेक्‍ट सर्वसामान्य लोक हे असामान्य लोकांपासून कसे वेगळे असतात हे सांगतो. बिलालीक आणि पीटर मॅक्‍लीड यांनी केलेलं संशोधन असं सांगतं, की सामान्य माणूस आपल्या मताचं एक जाळं बनवितो आणि त्याच्या समोर येणाऱ्या गोष्टीला तो या निश्‍चित झालेल्या मतांनुसारच प्रतिसाद देतो. फ्रान्सिस बेकन या तत्त्वज्ञानं 1620 मध्ये "नोव्हम ऑर्गनम' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे तो "आपल्यासमोर येणाऱ्या आपल्या मतांतूनच निष्पादित करतो.' पण महान संशोधक, तत्त्वज्ञ, कलाकार, खेळाडू स्वतः बनविलेल्या नियमांत, सिद्धांतात, कृतीत अडकून राहत नाहीत, तर गरजेनुसार ते आपल्या नियमांपलीकडे जाऊन विचार करतात आणि वेळ आली तर ते आपल्या मतांचाही अस्वीकार करायला तयार असतात. ज्याप्रमाणे कसलेला बुद्धिबळपटू आपण निष्णात असलेल्या चालीपलीकडे जाऊन विचार करतो त्याप्रमाणे. चार्ल्सस डार्विनसुद्धा असाच अपारंपरिक विचार करणारा शास्त्रज्ञ होता. त्याच्या निरीक्षण आणि चिकित्सक वृत्तीमुळे तो जीवशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण असा "उत्क्रांतीवाद' मांडू शकला, पण तरीही तो एका ठिकाणी म्हणतो, की ""माझ्या जीवनात मी एक महत्त्वपूर्ण नियम पाळला आहे. तो म्हणजे कुठलेही नवीन निरीक्षण, विचार किंवा शोध माझ्या निष्कर्षांच्या विरोधात जात असतील, तर मी ते लगेचच टिपून ठेवतो. याचं कारण म्हणजे आपल्या विरोधी जाणारे निष्कर्ष दुर्लक्ष करण्याची आपल्या मनाची सहज वृत्ती असते.'' स्वतःच्या पलीकडे जाऊन स्वतःला सतत चिकित्सक नजरेनं तपासणारेच असामान्य कृती करू शकतात अन्‌ त्यामुळेच मानवी इतिहासाला दिशा मिळत राहते.