दोन अधिक दोन, म्हणजे किती?

प्रकाश अकोलकर
गुरुवार, 19 जानेवारी 2017

समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल यांची आघाडी झाली असली, तरी निवडणूक ही निवडणूक असते अंकगणित नाही, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अंकगणितात दोन अधिक दोन याचं उत्तर ‘चार’ असंच असतं. निवडणुकीच्या मैदानात मात्र ते ‘तीन’ असं तिरपागडं येऊ शकतं, हे अखिलेश यांनी लक्षात घेतलं असणारच!

सारीपाटावरचे फासे उलटे पडले की नेमकं काय होतं, ते आता भारतीय जनता पक्षाच्या ध्यानात आलं असेल! उत्तर प्रदेशात ‘नेताजी’ मुलायमसिंह आणि ‘बेटाजी’ अखिलेश यांच्यात ‘दंगल’ सुरू झाली, तेव्हा समस्त भाजप छावणीत ऐन गणेशोत्सवात दिवाळीचे सुखाचे दिवस आले होते. आता समाजवादी पक्षात फूट पडणार... ‘सायकल’ ही त्या पक्षाची बहुचर्चित निशाणी गोठवली जाणार... आणि मग कुरुक्षेत्राचं मैदान आपल्याला मोकळं होणार, असे मांडे देशभरातल्या तमाम भक्‍तमंडळींनी खायला सुरवातही केली होती. खरं तर कहाणी भाजपला हव्या त्या पद्धतीनंच पुढे सरकत होती. नवं वर्षही भाजपसाठी आशा प्रज्वलित करणारंच होतं; कारण वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी ‘सपा’मध्ये फूट पडली होती आणि त्यामुळे केवळ भाजपच नव्हे, तर २०१२ मध्ये सत्ता गमवावी लागल्यानं काहीसं नैराश्‍य आलेल्या बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावतींनाही उत्साहाचं भरतं आलं होतं! आता एकदा का ‘सपा’चे दोन तुकडे झाले, की मग मुस्लिम मतदारांना आपल्याकडंच यावं लागणार, असा मायावतींचा होरा होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या एका फटकाऱ्यानं अनेकांचे डाव फिसकटले आहेत. अर्थात, यास अखिलेश यांना लाभलेलं अभूतपूर्व समर्थनही तितकंच कारणीभूत आहे, हे विसरून चालणार नाही. हे समर्थनच आता भाजप व मायावती यांच्या पोटात गोळा आणू पाहत आहे.

अखिलेश यांना लाभलेलं हे समर्थन आणि निवडणूक आयोगानं त्यांना बहाल केलेली ‘सायकल’ ही निशाणी यामुळेच काँग्रेस व अजितसिंह यांचा राष्ट्रीय लोकदल आता बिनबोभाट त्याच सायकलवर डबलसीट आणि तिबलसीटही बसून पुढे जायला तयार झाले आहेत. मात्र, निवडणूक ही निवडणूक असते अंकगणित नाही, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अंकगणितात दोन अधिक दोन याचं उत्तर ‘चार’ असंच असतं. निवडणुकीच्या मैदानात मात्र ते ‘तीन’ असं तिरपागडं येऊ शकतं, हे अर्थातच अखिलेश यांनी लक्षात घेतलं असणारच! त्याचं कारण म्हणजे भाजपनं अवघ्या अडीच वर्षांपूर्वीच आपली जहागीर कशी पादाक्रांत केली होती, त्याचा सल मुलायम- अखिलेश; तसंच मायावती यांच्याही मनातून अद्याप गेलेला नसणार! देशातील सत्तेचा केवळ सारीपाटच नव्हे, तर विचारधाराही बदलू पाहणाऱ्या त्या निवडणुकीत भाजपनं उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागांवर कब्जा करताना थोडीथोडकी नव्हे; तर घसघशीत ४२ टक्‍के मतंही घेतली होती. ‘सपा’च्या वाट्याला त्या निवडणुकीत अवघ्या पाच जागा आल्या होत्या, तर मायावतींच्या हाती चक्‍क भोपळा आला होता. मात्र, अखिलेश यांच्यासाठी समाधान देणाऱ्या अनेक बाबी होत्या. २००९ च्या लोकसभेत ‘सपा’नं २३ जागा जिंकताना २३.२६ टक्‍के मतं घेतली होती, तर पुढच्या तीनच वर्षांत म्हणजे २०१२ मध्ये विधानसभेत २२४ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवताना त्यात जवळपास सहा टक्‍क्‍यांची भर पडून ती मतं २९ टक्‍क्‍यांवर जाऊन पोचली होती. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी आलेल्या अभूतपूर्व अशा मोदी लाटेत ‘सपा’च्या वाट्याला जागा केवळ पाचच आल्या खऱ्या; पण त्यांची मतांची टक्‍केवारी ही फार खाली न येता २२ टक्‍क्‍यांवर स्थिर राहिली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे. कोणतीही लाट असो, ‘सपा’ची उत्तर प्रदेशातील मतं ही २२ टक्‍क्‍यांपेक्षा कमी करून दाखवणं विरोधात कोणीही असलं, तरी कठीणच आहे.

‘सपा’ आता आपल्या या २२ टक्‍क्‍यांमध्ये काँग्रेसनं मोदी लाटेत मिळवलेली ७.५ टक्‍के, तसंच अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाला मिळालेलं जेमतेम एक टक्‍का मत यांची भर घालू पाहत आहे. ही बेरीज ३० टक्‍के इतकी होते. अर्थात, निवडणुकीच्या मैदानात अंकगणित बासनात बांधून ठेवायला लागतं, हे तर खरंच; शिवाय भाजपही आपली ४२ टक्‍के मतं आता कायम राखू शकणार आहे काय, याच प्रश्‍नाच्या उत्तरात उत्तर प्रदेशाचे निकाल दडलेले आहेत. भाजपला २००९च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा आणि जेमतेम १७ टक्‍के मतं मिळाली होती. २०१२ मधील विधानसभा निवडणुकीतही भाजपला ४७ टक्‍के जागा आणि १५ टक्‍केच मतं मिळाली होती. मात्र, त्या वेळी मोदी नावाचं खणखणीत नाणं हे भाजपला गवसलेलं नव्हतं! आता स्वतः मोदी जातीनं प्रचारात उतरणार, आश्‍वासनांची खैरात करणार (आठवा... बिहारच्या निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेलं काही लाख कोटींचं पॅकेज!)... शिवाय देशभरातून भक्‍तमंडळीही या कुरुक्षेत्राच्या मैदानात दिमतीला येणार... शिवाय, पाच वर्षांच्या सत्तेनंतरच्या ‘ॲण्टी इनकम्बन्सी’चाही फटका बसणार... या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश नेमका कोणता कौल देणार?

एक गोष्ट स्पष्ट आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या अगदीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवल्या जातात. आठवा, पुन्हा एकदा बिहारचीच निवडणूक, तेथे सत्तेची स्वप्नं बघणारा भाजप कसा चारीमुंड्या चित झाला होता, ते! अर्थात, भाजपच्या टीव्हीवरच्या बोलक्‍या पोपटांकडे या प्रश्‍नाचं उत्तरही आहेच की! ‘बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद असे दोन दिग्गज एकत्र आले होते. उत्तर प्रदेशात अखिलेश आणि मायावती काही एकत्र आलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या,’ अशी पोपटपंची आता सुरू झाली आहे. त्यामुळेच मायावती यांच्या हाती लोकसभेत भोपळा आलेला असला, तरी त्यांनी तेव्हाही १९.६० टक्‍के मतं घेतली होती, ही बाबही विसरून चालणार नाही. तरीही मोदी यांनी हजार- पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी कसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेव्हा उत्तर प्रदेशात काही ठिकाणी तर दंगलसदृश वातावरण उभं राहिलं होतं. महाराष्ट्रात शहरी आणि निमशहरी भागांत झालेल्या नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांत या नोटाबंदीनंतरही भाजपनं प्रथम क्रमांक मिळवला खरा; पण महाराष्ट्र तसंच उत्तर प्रदेश यांत जमीनअस्मानाचं अंतर आहे, हेही लक्षात घ्यावं लागतंच. शिवाय, मुख्य मुद्दा हा प्रतिमांवर प्रेम करणाऱ्या भारतीय जनमानसाचा आहे. अखिलेश यांची प्रतिमा ही यादव कुळातील ‘दंगली’नंतर एक लढाऊ योद्धा अशी उभी राहिली आहे. त्याचा निश्‍चितच फायदा ‘सपा’, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या ‘गटबंधना’स होण्याची दाट शक्‍यता आहे. भले, भाजपचे पोपट हे ‘महागटबंधन’च नाही, असा दावा करत असले तरी. या ‘गटबंधना’त मायावती आल्या असत्या, तरच ते ‘महा’ ठरू शकलं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे.  

निवडणूक आता महिनाभरावर येऊन ठेपली आहे. तोपावेतो आता दावे आणि प्रतिदावे सुरूच राहतील! खरी कळ तर उत्तर प्रदेशाच्या जनतेच्याच हाती आहे!

Web Title: prakash akolkar articles