भाषेच्या विकासाबद्दल बोलू नि करू काही...

prof aanand katikar
prof aanand katikar

भाषा ही सामाजिक संस्था आहे, वगैरे वाक्‍ये आज सतत वापरून गुळगुळीत झालेली आहेत. त्याचप्रमाणे भाषेचा विषय केवळ अस्मितेसाठी किंवा मराठी माध्यमाच्या शाळांची घटती संख्या एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला दिसतो. मात्र या मुद्द्यांपलीकडे असं बरंच काही आहे, जे भाषेला विकसित करण्यासाठी, भाषा वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त आहे, याचा विसर पडू नये आणि भाषिक जागरूकता म्हणजे नेमके काय, हे सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी हा लेखप्रपंच!

आजचं युग संगणकाचं आहे; पण तेथे पुरेसे मराठीकरण झालेलं नाही. विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात मराठीचा वापर अजूनही ‘युनिकोड’मध्ये होत नाही. आज मराठी युनिकोडचे यशोमुद्रा, शोभिका इत्यादी सुमारे ५० ते ६० टंक उपलब्ध आहेत, ते सहजतेने वापरले जाऊ शकतात. पण हे टंक वापरून, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, पेजमेकर, टॅली, विंडोज इत्यादी आज्ञावलींतून किंवा कार्यकारी प्रणालींतून सर्व गोष्टी युनिकोड वापरून मराठीत करणे अवघड जाते. ही साधनं खर्चिक आहेत. मराठीच्या वापराअभावी भाषिक संकोचात भरच पडते. त्यामुळे संगणकावर व फोनवरही मराठीचा वापर जास्तीत जास्त कसा होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मुक्त आणि व्यक्त स्रोत (Free and Open Source) असणाऱ्या साधनांचा ‘लिनक्‍स/उबंटू, इंकस्केप, गिम्प्स, ग्नू-कॅश इत्यादी - वापर वाढायला हवा. आज मोबाईलवर संदेश पाठविताना भावचिन्हांचा (इमोजी) बराच वापर होतो. मात्र यात वैशिष्ट्यपूर्ण मराठी चित्रंही घालता येतील. उदा. गुढी-पाडवा, होळी, पुरणपोळी, कोजागिरी, दसऱ्याचं सोनं, मंदिर इत्यादी. त्यावरही काम सुरू करायला हवं.
आंतरजालावर मराठी वाचन-लेखन वाढावं, यासाठी प्रयत्न हवेत. जग विकिपीडियावर किंवा विविध संकेतस्थळांवर माहिती भरतं आणि वाचतं. पण येथेही मराठीचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीची; मग ती खेळांची असो, वैद्यकशास्त्रातील असो, यंत्रांबद्दल असो, वस्त्रांबद्दल असो किंवा अगदी स्वयंपाकाची असो; अशी माहिती घेऊ इच्छिणाऱ्यांना सारी माहिती आपल्या भाषेत मिळायला हवी, असे वाटत असेल, तर त्यासाठी चळवळच सुरू करायला हवी. जॉर्ज ग्रिअर्सन या इंग्रज अधिकाऱ्याने १८९८ ते १९२८ या स्वातंत्र्यपूर्व काळात एक भाषिक सर्वेक्षण केलं होतं. त्यातून तत्कालीन भाषेचं एक रूप आपल्याला आजही पाहावयास मिळतं. तसंच एक भाषिक सर्वेक्षण आजच्या महाराष्ट्रात सर्वत्र करायला हवं. त्यातून आपल्याला अंदाजे १०० वर्षांत झालेले बदल लक्षात येतील. त्यानुसार भाषेच्या परिवर्तनासंबंधी काही ठोकताळे बांधता येतील. नवनवे शैक्षणिक प्रयोग करता येतील. आपल्या भाषेचं खरं रूप आपल्यालाही नीट उमजायला मदत होईल.

शिक्षण, व्यवसाय, नोकरी या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात स्थलांतरं होत आहेत. यामुळे विविध भाषक लोक महाराष्ट्रात येतात. पण या स्थलांतरित लोकांना मराठी बोलता यावं किंवा शिकता यावं यासाठी कोणताही मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाषिक संशोधनानुसार, परभाषा म्हणून शास्त्रीय पद्धतीने अध्ययन-अध्यापन करण्याच्या दृष्टीने काही काम करायला हवे. अनुवाद हाही भाषेच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे. व्यावसायिक स्तरावर भाषांतराचं काम करणाऱ्या काही कंपन्यांशी संपर्क साधला असता, सध्या इंग्रजी ते मराठी अनुवाद करणाऱ्या मंडळींची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं अधोरेखित झालं आहे. आता एवढ्या गोष्टींची चर्चा केल्यानंतर, आजच्या घडीला महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी यातील काही काम सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होईल. तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. राज्य सरकारच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या वतीने यातील बहुतेक उपक्रमांची मालिका सुरू झाली आहे. ‘युनिकोड कन्सोर्शियम’चं सदस्यत्व घेणं, त्यांना प्रस्ताव सादर करणं हे काम सुरू आहे. मराठीत संगणकीय साधने घडविण्याचं कामही सुरू केलेलं आहे. ‘वस्त्रनिर्मिती कोशा’चे काम तर सुरू आहेच; पण यंत्रालयाचा ज्ञानकोश हा एक मोठा कोश सिद्ध केलेला आहे आणि ऑलिम्पिक माहितीकोशाचे काम हेमंत जोगदेव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. विकिपीडियावरील लेखन वाढण्यासाठी दरवर्षी २५हून अधिक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयाच्या सोबतीनं ‘महाराष्ट्रातील मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये दृक्‌-श्राव्य तसेच ध्वनिमुद्रित स्वरूपात, आधुनिकतेची जोड घेऊन हा भाषिक नकाशा अवतरणार आहे. महाराष्ट्रात मराठीची किती रूपं बोलली जातात, हे या निमित्तानं समजू शकेल. अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने सहा पातळ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागासोबत सुरू आहे. तर अनुवादाची शास्त्रशुद्ध व व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन तीन महिन्यांचा प्रशिक्षणवर्ग लवकरच सुरू करण्याचं प्रयोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com