आतली गोष्ट! (ढिंग टांग!)

आतली गोष्ट! (ढिंग टांग!)

हातातले वर्तमानपत्र झटकन 
मिटून घेत ती बसली सावध, 
ैमौनपणे भिरभिरत्या नजरेने 
तिने बघितला किंचित चाचपून 
आपलाच भूतकाळ... 
खोल मनतळी वेळोवेळी 
ठरवून गाडून टाकलेले 
कडूझर स्पर्श पुन्हा एकवार 
झाले टोकदार, आणि 
काळवंडून गेले तिचे मन 
एकाएकी. 

आढ्याकडे नजर जाताना तिला 
वाटलं, आपणही लिहिले पाहिजे. 
पण काय लिहिले पाहिजे? 

किस्से लिहिता येतात, 
अनुभव लिहिता येतात, 
नकोसे स्पर्श कसे लिहावेत? 

उदाहरणार्थ, 
-अगदीच चिमखड्या वयात 
गालावर खरखरलेली दाढी. 
-प्रचंड खिदळाखिदळीनंतर 
रात्री गच्चीत एकत्र झोपलेल्या 
भावंडांच्या वऱ्हाडगर्दीत 
अंथरुणात वळवळलेला स्पर्श. 
-कपडे बदलताना दाराच्या फटीतून 
बघणारे लसलसते डोळे. 
-लाडाकोडाच्या नावाखाली 
इथे तिथे फिरलेले हात. 

-गर्दीत पाठीमागून चेपले जाणारे 
भुरटे पौरुष आणि दुर्गंधित श्‍वास. 
- ह्या ना त्या निमित्तानं घेतले 
गेलेले कैक शहाजोग गालगुच्चे. 
गळामिठ्या. गालमिठ्या. 
-बाकाला टेकून लघळपणे 
रेकणाऱ्या गुरुजनांच्या आठवणी. 
-स्पेशल क्‍लाससाठी थांबवून 
केलेले बळजबरीचे ज्ञानदान. 
-कंप्युटरवर काम करताना 
पाठीमागे अनंतकाळ उभे राहून 
सोडलेले उष्ण श्‍वास. 

-कंप्युटरच्या माऊसवरल्या हातावर 
बेमूर्वतपणे पडलेला राकट हात. 
-"साडीत टॉपच दिसतेस...' ह्या 
पुरुष सहकाऱ्याच्या "दिलखुलास' 
कॉम्प्लिमेंट्‌समधलं नकोसेपण. 
-बसमध्ये लगटून उभा असलेला 
अनोळखी, गिळगिळीत पुरुषदेह. 
-ज्येष्ठ सहकाऱ्यांनी पाठवलेल्या 
चावट मेसेजेस-फोटोजचं 
काळजीपूर्वक डिलिट करणं. 
(मुलगा अजून लहान आहे, आणि 
खेळतो म्हणे) 
आणि- 

...दिवसेंदिवस अनोळखी होत चाललेला, 
पण वारंवार वाट्याला येणारा, 
घरातल्याच माणसाचा देहस्पर्श. 

सोवळेपणाची अपेक्षा नव्हतीच कधी, 
हवा होता तिला एकच स्पर्श, 
ज्याने दिले असते तिला 
अनंग तृप्तीचे कढत पुरतेपण. 
आपलेपणाचा ओलावा, आणि 
संपूर्णतेचा अनामिक अधिकार. 

पण तो स्पर्श तिच्या वाट्याला 
आलाच नाही कधी... 
हाती उरला तो हा निव्वळ कचरा. 

हे लिहायचे कशाला? 

झटकून तिनं पुन्हा 
वर्तमानपत्र हाती घेतले, आणि 
आणि ती पुढे जगू लागली.... 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com