धडा आणि इशारा 

धडा आणि इशारा 

महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना या "सख्ख्या मित्रा'वर मात करून पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद मात्र भारतीय जनता पक्षाला साजरा करता आला नाही! याचे कारण त्याचवेळी भंडाऱ्याची एक जागा गमवावी लागली तर उत्तर प्रदेशातील कैराना या बहुचर्चित मतदारसंघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप उमेदवाराला पाणी पाजले. पालघरची निवडणूक ही जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती, त्याचप्रमाणे कैरानाची लढत ही उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी महत्त्वाची होती.

अलीकडेच उत्तर प्रदेशात झालेल्या फूलपूर व योगींचा गड समजल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकत्र येऊन भाजपला धडा शिकवला होता. मात्र, योगी हे कैरानाकडे फारसे लक्ष न देता थेट पालघरमध्ये प्रचारासाठी अवतीर्ण झाले होते! शिवाय, कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशात नूरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपच्या पदरी पराभवच आला आहे. त्याचवेळी भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांनी आघाडी अभेद्य राखत भाजप उमेदवाराचा पराभव केला. या निकालांचा अर्थ स्पष्ट आहे.

विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली तर भाजपचा पराभव होऊ शकतो, याचे प्रत्यंतर या निकालांमुळे विरोधकांना आले आहे. त्यामुळेच वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला आपल्या कार्यपद्धतीत बऱ्याच सुधारणा कराव्या लागतील, विरोधकांना आपले बळ दाखवणारी ही "एकी' पुढचे किमान एक वर्ष तरी अभेद्य राखावी लागणार आहे. त्याचवेळी देशभरातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही मतदारांनी थेट भाजपविरोधात कौल दिला आहे. कर्नाटकात भले कॉंग्रेसला स्वबळावर आपली सत्ता राखता आली नसेल, मात्र त्यापाठोपाठ झालेल्या या पोटनिवडणुकांनी पुढच्या चार महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत होणाऱ्या निवडणुकांना अनेक संदर्भ प्राप्त करून दिले आहेत. 
या निकालांपासून काही बोध घ्यायचा असेल तो कॉंग्रेस आणि विशेषत: राहुल गांधी यांना घ्यावा लागणार आहे. कर्नाटकातील निवडणूक ही "सिद्धरामय्या विरुद्ध येडियुरप्पा' अशी होऊ न देता, ती मोदी विरुद्ध राहुल यांच्यातच होईल, अशी दक्षता भाजपने घेतली आणि या लढतीत मोदी विजयी होणार, हे उघड होते. त्यामुळेच आता आगामी लोकसभा निवडणुकीलाही "मोदी विरुद्ध इतर सगळे' असा रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. तेव्हा विरोधकांनी ती निवडणूक मोदींचा नव्हे, तर भाजपचा पाच वर्षांचा कारभार विरुद्ध देशातील जनता अशा स्वरूपात लढवली, तरच त्यांना फायदा होऊ शकेल. महाराष्ट्रासाठी दोन पोटनिवडणुकांपासून सर्वांत मोठा धडा घ्यायचा असेल तर तो शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन पक्षांना!

कॉंग्रेस पालघरमध्ये थेट पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारानेही कॉंग्रेसपेक्षा अधिक मते घेतली. खरे तर 2014 मध्ये या मतदारसंघात न लढणाऱ्या कॉंग्रेसने देशभरातील विरोधकांचे ऐक्‍य लक्षात घेऊन स्वत: न लढता मार्क्‍सवाद्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. पालघरमध्ये शिवसेना आजवर कधीच लढली नव्हती, तरीही या वेळी दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव शिवसेनेकडे आले आणि त्यांनी दोन लाखांहून अधिक मतेही घेतली. त्यामुळे आता लोकसभेत भाजप-शिवसेना युती झाली नाहीच, तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे पट्ट्याबरोबरच पालघरमध्येही शिवसेना भाजपला सळो की पळो करून सोडणार, याची ग्वाही मिळाली आहे. मात्र, श्रीनिवास वनगा आपल्या गोटात दाखल होऊन निवडणुकीला भावनिक रंग दिल्यावरही आपल्याला विजय न मिळाल्याचे खापर केवळ "ईव्हीएम'वर फोडून चालणार नाही.

विधानसभा पोटनिवडणुकीतील एक महत्त्वाचा मतदारसंघ हा बिहारमधील होता. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन पुन्हा भाजपबरोबर पाट लावल्यानंतर नितीश यांच्या जनता दल (यु)च्या आमदारांनी राजीनामा दिला होता. तेथे आता लालूप्रसादांच्या अनुपस्थितीत यशस्वी यादव यांनी नितीशकुमारांना पाणी पाजले आहे. 

या पोटनिवडणुका गाजल्या त्या आणखी एका कारणामुळे. पालघर असो की कैराना की भंडारा-गोंदिया येथे "ईव्हीएम' यंत्रणेबाबत अनेक तक्रारी झाल्या. अशा तक्रारी येणे हे निवडणूक आयोगाचे अपयश आहे आणि त्यामुळे या यंत्रणेवरील जनतेचा विश्‍वास उडून जाऊ शकतो, हा धडा आयोगानेही घ्यायला हवा आणि या यंत्रणेत सुधारणा घडवून आणायला हव्यात. तरच 2019 मधील निवडणुका या निष्पक्षपणे पार पडल्याचे समाधान जनतेला मिळू शकेल! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com