राधामोहनसिंहांची "बाधा' 

Pune Edition Article Editorial Article on Radha Mohan Singh
Pune Edition Article Editorial Article on Radha Mohan Singh

गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा. म्हणूनच दूध व शेतमालाला रास्त भाव आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी संप पुकारणाऱ्या, रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांचा "पब्लिसिटी स्टंट' असा पाणउतारा करण्याची "नियत' कृषिमंत्र्यांनी दाखविली आहे. 

महात्मा गांधींनी नीळउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर बिहारमधल्या ज्या चंपारणमध्ये पहिला लढा उभारला, त्याच्या पूर्व भागाचे, म्हणजे मोतीहारीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राधामोहनसिंहांना शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळण्याआधी गेल्या वर्षीच शताब्दी साजरी झालेला तो लढा आठवायला हवा होता. कृषिमंत्र्यांना संवेदनशीलतेचा विसर पडल्याचे हे पहिले उदाहरण नाही. याआधीही त्यांनी शेतकरी आत्महत्यांमागे प्रेम प्रकरणे, गृहकलह वगैरे कारणांचा जावई शोध लावला होता.

मोदी सरकारचा कार्यकाळ हा देशातील शेती-शेतकऱ्यांसाठी वाईट म्हणावा लागेल आणि या अस्वस्थ वर्तमानकाळाचे धनी कृषिमंत्री राधामोहनसिंह आहेत. त्यावर मात करण्याऐवजी स्वत:चे अपयश लपविताना वादग्रस्त, अवमानकारक वक्तव्ये करून ते सरकारला अडचणीत आणत आहेत. मोदी लाटेत उद्धार झाल्यानंतर राधामोहनसिंह कृषिमंत्री बनले, तेव्हाच ते पदाला न्याय देऊ शकतील का, अशी शंका होती. चार वर्षांत त्यांनीच ती शंका रास्त होती, हे सिद्ध केले आहे. 

खरेतर शेतकरी का संतापला आहे, पोटच्या मुलाप्रमाणे माया करीत पिकविलेला शेतमाल किंवा दूध रस्त्यावर ओतून संताप व्यक्‍त करण्याची वेळ त्याच्यावर का आली आहे, हे कृषिमंत्री म्हणून राधामोहनसिंह यांनी जाणून घेण्याची आवश्‍यकता होती. सरकारची धोरणे शेती व शेतकरीविरोधी आहेत. उत्पादकापेक्षा ग्राहकाची काळजी सरकार अधिक करते, असा आक्षेप आहे. उठसूठ दरवर्षी उच्चांकी उत्पादनाचे गोडवे गायले जातात. तथापि उत्पादन नव्हे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न किती वाढले, हे महत्त्वाचे असताना उत्पादनवाढीचा लाभ अधिकाधिक निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना मिळू देण्याऐवजी केंद्र सरकारचा भर आयातीवर आहे. 

शेतीला पाणी, उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न वगैरे घोषणा देत सरकार सत्तेवर आले खरे; परंतु तिच्यातली एकही घोषणा अमलात आलेली नाही. आयातीच्या आततायीपणामुळे शेतमालाची माती होत आहे. मागील चार वर्षांत शेतीला उभारी देणारा एकही नावीन्यपूर्ण उपक्रम, योजना, कार्यक्रम केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राबविलेला नाही. आधीच्या ज्या योजनांची नावे व निकष बदलून ढोल वाजविले गेले, त्यांचेही अंमलबजावणीच्या पातळीवर तीन तेरा वाजलेले आहेत. हे सगळे असह्य झाल्यानेच गेल्या वर्षभरात शेतकरी वारंवार आंदोलने करीत आहेत. बळिराजाचा संताप सात्विक असतानाही मंत्र्यांनी त्याला "पब्लिसिटी स्टंट' असे हिणवून टिंगलटवाळी करणे हे केवळ दुर्दैवी नाही तर हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांनी याबद्दल माफी मागायला हवी. 

"पब्लिसिटी स्टंट' किंवा "हेडलाइन मॅनेजमेंट' या गोष्टी पटकन राधामोहनसिंह यांच्या ओठावर येण्याचे कारणही आपण समजून घेतले पाहिजे. सामान्यांच्या जीवनात थोडेसे "अच्छे दिन' आणण्याऐवजी माध्यमांमधल्या खाचाखोचांचा शॉर्टकट वापरण्याची सवय झाल्याने त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. संवेदनशीलता, माणुसकी वगैरेचा एकूण स्तर पाहता चळवळी, आंदोलने, त्यासाठी खावयाच्या खस्ता या गोष्टी त्यांच्या नावीगावी असणे शक्‍य नाही. पब्लिसिटीच्या संधी बिच्चाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा मंत्र्यांनाच अधिक मिळतात. दोन वर्षांपूर्वी तमिळनाडूत दीडशे वर्षांतला सर्वांत भीषण दुष्काळ पडला. शेतकरी देशोधडीला लागला. तेव्हा दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट राधामोहनसिंह यांनी घेतली नाही. गतसाली जूनमध्ये भाजपचीच सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात मंदसौरला पोलिसांच्या गोळीबारात आंदोलक शेतकऱ्यांचे जीव गेले. तेव्हाही कृषिमंत्री तिकडे गेले नाहीत. 

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातले हजारो शेतकरी अनवाणी पाय रक्‍तबंबाळ होईपर्यंत नाशिकवरून मजल दरमजल करीत मुंबईत पोचले. तेव्हाही त्यांना भेटून पब्लिसिटी करून घ्यावी, असे राधामोहनसिंह यांना वाटले नाही. थोडक्‍यात अशी संधी साधण्याची ज्यांची हातोटी आहे, अशा कृषिमंत्र्यांनाच ते स्टंट करता आले नसतील तर मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागणारे, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्यांकडे नेते व अभिनेत्यांची खासियत असलेल्या क्‍लृप्त्या कुठून जमणार. त्यामुळे "पब्लिसिटी'चाच विचार करायचा झाला तर राधामोहनसिंह यांच्या वक्‍तव्यामुळे शेतकरी संपाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले, असे म्हणावे लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com