भिंतीवरले भविष्य! (अग्रलेख)

Pune Edition Editorial Article Bhintivaril Bhavishya
Pune Edition Editorial Article Bhintivaril Bhavishya

दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा मेरुमणी ठरावा, असा चमत्कार आता घडणार आहे. विशेष म्हणजे हा काही शतकांनंतर होणारा बदल नसून आपल्या हयातीतच हे संक्रमण बघायला मिळणार आहे. भिंतीवरचा टीव्ही सेट हा आपल्या जीवनशैलीचा कणा बनण्याचा प्रसंग आता फार दूर नाही. एखाद-दोन वर्षातच ती परिस्थिती येऊ घातली आहे. 

दूरसंचाराच्या क्षेत्रातली या क्रांतिकारी भरारीची चुणूक रिलायन्स जिओच्या नव्या योजनेमुळे भारतीयांच्या दृष्टिपथात आली आहे. काळाची पावले ओळखून नवे, विकसित उत्पादन बाजारात आणायचे, स्पर्धक सावध होण्याच्या आत झपाट्याने अवघी बाजारपेठ काबीज करायची, ही खास अमेरिकी, बलाढ्या उद्योगांची शैली जगाला एव्हाना ठाऊक झाली आहे. गच्च भरलेल्या भांडवलाच्या थैल्या उशाशी असल्या की अशी स्वप्ने विनासायास पडतात, आणि साकारताही येतात, हा नव्या जगाचा नवा नियम आहे. भारतात हा प्रकार "रिलायन्स'सारख्या आर्थिकदृष्ट्या बळिवंत अशा उद्योगसमूहालाच परवडण्याजोगा होता, हे मान्य करावेच लागेल.

2016 मध्ये "रिलायन्स जिओ'ची घोषणा झाल्यानंतर भारतातील दूरसंचार क्षेत्र कसे अक्षरश: ढवळून निघाले होते, हे स्मरण ताजे आहेच. मोबाईल फोनची दुनिया तेव्हा जनसामान्यांच्या मुठ्‌ठीत आल्याची भावना झाली होती. स्पर्धक कंपन्याही हवालदिल झाल्या, आणि एक जोरदार "किंमतयुद्ध' झडले होते. त्याचा फायदा अर्थातच रिलायन्सकडे ढुंकूनही न बघणाऱ्या ग्राहकांनाही झालाच. त्यापेक्षाही जोरकस धक्‍का रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गुरुवारी आपल्या समूहाच्या सर्वसाधारण सभेत दिला. "जिओ 2' या फायबर आधारित ब्रॉडबॅण्ड सेवेची भव्य योजना त्यांनी जाहीर केली. अर्थात हा नवा टप्पा मोबाइलशी संबंधित आहेच, पण घरातल्या टीव्हीचा रोलच बदलून टाकणारा आहे. 

आभासी वास्तव म्हणजेच व्हर्च्युअल रिऍलिटी हा शब्द आपण हल्ली वारंवार ऐकत असतो. तरुणाई तर त्याच्या बव्हंशी कच्छपि लागलेली दिसतेच. पण हेच आभासी वास्तव आता लवकरच आपल्या टीव्हीच्या पडद्यामधून घरात शिरणार आहे. अल्ट्रा-एचडी, व्हर्च्युअल असिस्टंट, एकाच वेळी अनेकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, गेमिंग अशा कितीतरी गोष्टी टीव्हीद्वारे साध्य होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही गोष्ट आजवर केवळ कार्यालयीन कामे, न्यायालयीन साक्षी किंवा मुलाखती आदी व्यावहारिक कामांसाठी वापरली जायची.

येत्या काळात हळदीकुंकवासारखे कार्यक्रमही घरबसल्या होतील! कारण या सेवा अगदीच माफक दरात, जवळजवळ फुकटच उपलब्ध होतील. शिवाय त्या सामान्य माणसाला वापरण्याइतक्‍या सोप्याही होतील. अनेकदा कार्यालय गाठण्याच्या धावपळीत अचानक मनात शंका डोकावते की, घराला कुलूप तर नीट लावले ना? पंखे बंद केले ना? खिडक्‍या? गॅस चालू राहिला असेल तर...? पण तुमच्या घरातल्या टीव्हीचे आणि हातातल्या मोबाइलचे "डिजिटल सख्य' जमले की ही कामे तुम्हाला कचेरीत बसूनदेखील करता येतील. 

सकाळी उठून वर्तमानपत्र आले का, म्हणून दाराची कडी तपासून येण्याचे कारण नाही. तुम्ही ठरवलेल्या सकाळच्या चहाच्या वेळेला आपोआप टीव्हीचा पडदा उजळून तुमचे आवडते वर्तमानपत्र ताजेपणासहित उघडेल. तुमच्या आवडीच्याच निवडक बातम्या बघण्याची सोय निर्माण होईल. एकदा तसे "सेटिंग्ज' दिले की झाले. अर्थात, हे एकटे "जिओ'मुळे होणार आहे, असे समजण्याचे कारण नाही.

स्पर्धेच्या या दुनियेत आणखीही खेळाडू तेल लावून तय्यार आहेत. पुन्हा एकदा किंमतयुद्ध होऊन अंतिमत: या सुविधा कमी दरात आपल्याला उपलब्ध होतील, असे मानायला हरकत नाही. "या जगात फुकट भोजन असे काही नसते' असे एक सुभाषित इंग्रजीत प्रचलित आहे. त्या उक्‍तीनुसार या कंपन्यांचेही उखळ पांढरे होणारच आहे. पण हेच नजीकचे भविष्य आहे, हे ओळखून काळानुरुप आपणही स्वत:त बदल करून सायबरयुगाच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार राहाणे श्रेयस्कर. भिंतीवरल्या खिडकीतून भविष्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे, इतकाच याचा अर्थ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com