लोकज्ञानाची विज्ञानाशा सांगड

Pune Edition Editorial Article on Cultural Things
Pune Edition Editorial Article on Cultural Things

बत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या चड्ड्यांत अघनाशिनीच्या पात्रातल्या शिळांवरून उड्या मारत हिंडत होतो आणि कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते, की ब्लूमबर्गना दहा वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. काविळीचा एक प्रकार आहे हेपॅटायटिस बी; एक विषाणू या प्रकारच्या काविळीला कारणीभूत आहे आणि बॅरींनी हा विषाणू शोधून काढला होता.

बॅरींना मानवजातीच्या आनुवंशिक वैविध्यातही खूप रस होता; जगभरच्या मानवी आनुवंशिक वैविध्याच्या अभ्यासातून त्यांना ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीत एक हेपॅटायटिस बीच्या विषाणूचा ऍन्टिजेन सापडला होता. तो ऍन्टिजेन वापरून बॅरींनी हेपॅटायटिस बीविरुद्धची प्रभावी लस तयार केली होती; तिच्यामुळे काविळीवर आणि काविळीच्या जोडीने होणाऱ्या कर्करोगावरही बऱ्याच प्रमाणात मात करता आली होती. ह्या महत्त्वपूर्ण कामासाठी बॅरींना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. 

बॅरींचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय होता ज्ञानपरंपरा. वनौषधींचा उपयोग ही मनुष्यजातीच्या दोन लाख वर्षांपूर्वीच्या उत्पत्तीहूनही पुरातन ज्ञानपरंपरा आहे. काही व्याधी झाल्या की, चिंपांझी जाणीवपूर्वक निवडक वनस्पतींची पाने खातात; चिंपांझी एकमेकांचे अनुकरण करतात, शिवाय आपल्या पिल्लांना पद्धतशीरपणे शिकवतात. तेव्हा जशी मानवांच्या तशीच चिंपांझीच्या समूहांतही वनौषधींची ज्ञानपरंपरा आहे. आपली आणि चिंपांझीची कुळी 50 लाख वर्षांपूर्वी विभक्त झाली, तेव्हा ही परंपरा त्याहूनही अधिक पुरातन असणार. जगभरातल्या सर्व मानव समाजांकडे तिथल्या तिथल्या वनस्पतींच्या, प्राण्यांच्या औषधी उपयोगांचे ज्ञान आहे. ज्ञान अधिक पद्धतशीरपणे स्थापन होताना साहजिकच ह्या ज्ञानभांडाराचे महत्त्व ओळखले गेले.

सुश्रुत संहिता सांगते : "तपस्वी व्याध गोपाळ, वैदू जे हिंडती वनी, कंदमुळे भक्षिती त्यांच्या, वनौषधी ध्यानी मनी'. आयुर्वेद वैद्यांनी हे ज्ञान शिकून घ्यावे, वापरात आणावे. म्हणजेच ज्ञान हे मानवनिर्मित आहे; त्यात कदाचित चुका असू शकतील, तरीही असे ज्ञान वापरात आणावे, अशी धारणा होती. पण समाजावर जसजसा विशिष्ट वर्गांचा पगडा बसत गेला तसतसा ज्ञानाबद्दलचा एक वेगळाच दृष्टिकोन प्रस्थापित केला गेला. या मांडणीप्रमाणे वेदांसारखे ईश्वरदत्त, अपौरुषेय ज्ञान हेच खरे आणि शाश्वत ज्ञान आहे, उलट चुकांनी भरलेले मानवनिर्मित ज्ञान टाकाऊ आहे. ही विचारसरणी स्वीकारत चरक, सुश्रुत सांगतात की आयुर्वेदाचे ज्ञान अश्‍विनीकुमारांकडून ऋषींकडे आणि नंतर मानवाकडे आले; मानवाच्या हाती ते वाढत नाही, तर केवळ 
क्षीण होत जाते. अशा विचारसरणीच्या परंपरेत ज्ञानवृद्धीला वाव नाही; आणि ह्यामुळेच गेल्या दीड-दोन हजार वर्षांत आयुर्वेदात काहीही खास प्रगती झालेली नाही. 

आपल्याकडे जैन व बौद्ध परंपरांनी वेदप्रामाण्य नाकारत बुद्धिप्रामाण्य स्वीकारले आणि त्यामुळे भारतात ज्ञानाची वृद्धी मुख्यतः या परंपरांमधून होत राहिली. साहजिकच चरक-सुश्रुतांनंतर आयुर्वेदाला मोठे योगदान करणारा वाग्भट बौद्ध होता. पण जगात ज्ञान खरे झपाट्याने वाढू लागले ते  मध्ययुगात नवचैतन्य निर्माण झालेल्या युरोपात. ह्या नवचैतन्यामागचे रहस्य होते वास्तवाचे निरीक्षण हाच ज्ञानाचा खरा आधार मानणे व बायबलची अधिकारवाणी नाकारणे आणि ह्यातूनच विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. ह्या आधुनिक पाश्‍चात्त्य वैद्यकशास्त्राने जिवाणू, विषाणू ओळखले आणि बॅरींनी या परंपरेतूनच पुढे जाऊन हिपॅटायटीस बीचा विषाणू शोधून काढला. पण बॅरी असहिष्णू नव्हते; ते शिस्तबद्ध आधुनिक विज्ञानाच्या चौकटीच्या बाहेरही खूप ज्ञान आहे; लोकांजवळ आहे.

तसेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि इतर देशांतील अशाच वैद्यकीय परंपरांतही आहे हे पूर्णपणे ओळखून होते. तेव्हा त्यांनी ठरवले, की काविळीच्या निवारणासाठी जगभर कोणकोणत्या वनौषधी वापरल्या जातात याचे ज्ञान पद्धतशीरपणे संकलित करावे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून बॅरी बंगळुरात पोचले आणि मला पकडून म्हणाले, की तुमच्या डोंगर-खोऱ्यातल्या वैदूंकडे मला घेऊन चल. मी त्या वेळी कारवार जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या मुलखात परिसर शास्त्रीय संशोधनात गर्क होतो; तिथले अनेक शेतकरी, धनगर, मच्छीमार माझे मित्र होते. मी म्हणालो, अघनाशिनी नदीचे खोरे जैववैविध्याने समृद्ध आहे; तिथे वनौषधींचा भरपूर वापर होतो; त्या भागात हिंडत तुम्हाला हवी तशी माहिती आपण गोळा करूया. रात्री एखाद्या गावात माझ्या परिचयाच्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करायचो आणि त्यांच्या ओळखीने आसपासच्या गावांत जाऊन तिथल्या वैदूंना ते कोणत्या वनौषधी कोणत्या व्याधींवर उपचार करण्यासाठी वापरतात, याची माहिती विचारायचो.

बॅरी ही सगळी माहिती अतिशय काटेकोरपणे नोंदून ठेवायचे, त्या वैदूंची छायाचित्रे घ्यायचे आणि त्यांना ह्यातून काही पुढे निष्पन्न झाले तर त्याचा फायदा तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन, असे आश्वासन द्यायचे. विज्ञान मानते की, कोणतेही ज्ञान परिपूर्ण नाही, शाश्वत नाही, त्यात भरपूर चुका असू शकतात. वास्तवाचे सातत्याने पद्धतशीरपणे निरीक्षण करावे, त्या अनुभवातून चुका लक्षात येतात आणि त्या दुरुस्त करत विज्ञानाची आगेकूच होत राहते. लोकांचे वनौषधींचे ज्ञानही अनुभवजन्य आहे; पण ते पुरेसे काटेकोरपणे पडताळले गेले नसल्याने त्यात खूप जास्त चुका असण्याची शक्‍यता आहे. तरीही वेगवेगळ्या समाजांच्या ज्ञानात एखादे समान सूत्र दिसल्यास ते बरोबर असण्याची खूपच शक्‍यता आहे. बॅरींनी असेच हजारो वैदूंचे, आयुर्वेदासारख्या शेकडो ग्रंथांचे ज्ञान संगणकांचा वापर करत संकलित केले आणि त्यात एखादी वनस्पती जवळजवळ सगळीकडे काविळीविरुद्ध वापरली जाते का, हे शोधले. 

भुईआवळा ही आशियात, आफ्रिकेत जिकडे तिकडे सहज वाढणारी, सुमारे एक फूट उंचीची वनस्पती आहे आणि बॅरींच्या लक्षात आले की, ती सर्वत्र कावीळ निवारणासाठी वापरली जाते. मग त्यांनी पुढचे पाऊल उचलले आणि प्रयोगशाळेतील काळजीपूर्वक संशोधनातून भुईआवळ्यातील काविळीला काबूत आणणारे रसायन शोधून काढले. हे रसायन शोधून काढल्यावर त्यांनी शास्त्रज्ञांच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे पेटंट घेतले. पण पेटंट मिळता क्षणीच जाहीर केले की कोणतीही औषध उत्पादन करणारी कंपनी जर हे रसायन "ना नफा ना तोटा' धर्तीवर लोकांना उपलब्ध करून देणार असेल, तर लोकांचे ऋण फेडण्यासाठी मी काहीही रॉयल्टी मागणार नाही.

अजूनपर्यंत कोणतीही औषधे कंपनी हे करायला पुढे आलेली नाही; पण बॅरींनी लोकज्ञानाची विज्ञानाशी सांगड कशी घालावी, हे आपल्या कर्तबगारीतून छान दाखवून दिले आहे. भारताच्या जैवविविधता कायद्याच्या चौकटीत, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेत, हे देशभर करता येईल. दुर्दैवाने हा कायदा सोळा वर्षे खुंटीवर टांगून ठेवला गेला आहे. 
आता तरी विकासाचे जनआंदोलन उभारण्याच्या घोषणा देणाऱ्या शासनयंत्रणेने लोकाभिमुख, विज्ञानाभिमुख वृत्तीने "जैवविविधता कायदा' अमलात आणला तर आपण एका नव्या डिजिटल इंडियात जोमाने पदार्पण करू शकू. 

माधव गाडगीळ, (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com