दिल्ली का बॉस! (ढिंग टांग! )

Pune Edition Editorial Article on Delhi Politics
Pune Edition Editorial Article on Delhi Politics

नमोजी : (वाजणारा फोन हळूच उचलत) जे श्री क्रष्ण...कोण छे? 
आम आदमी : (खाकरत) मैं हूं जी!! 
नमोजी : (पुन्हा हळूच) मैं माने? 
आम आदमी : (पुन्हा खाकरत) मैं आम आदमी बोल रहा हूं जी! 
नमोजी : (संशयानं) ओळखाण लागत नाय! कोण छो तमे? जरा डिटेल मां बतावो!! 
आम आदमी : (खुलासा करत) कशी लागणार ओळख! माझा आवाज तुम्हीच बंद केला होता जी! खोकल्याचं औषध म्हणून काहीतरी प्यायला दिलंत आणि खोकल्याबरोबर माझा आवाजही गेला! आठवतंय का? 
नमोजी : (दिलखुलासपणे) अरे हां...आत्ता ओळख पटली! बीजा घर मां घुसीने आप लोग मस्त राहाते! झोप काढते, जेवण करते! खरा हाय ने? 

आम आदमी : (फुशारकीने) मी दिल्लीचा बॉस आहे...कुठेही राहीन!! 
नमोजी : (खवचटपणे)...तबियत तो ठीक छे ने? 
आम आदमी : (किंचित खोकत)...आता बरंच बरं आहे!! तुम्ही टीव्ही पाहिलात का? दिल्लीचा बॉस मीच आहे असं आत्ता कोर्टानं सांगितलं आहे! 
नमोजी : (गोंधळात पडून) तमे दिल्ली नां बोस? 
आम आदमी : (दुप्पट गोंधळात पडून) बोस नाही...केजरीवाल, केजरीवाल!! 
नमोजी : (सावध होत) तो पछी हूं कोण छुं? 
आम आदमी : (दुर्लक्ष करत) दिल्लीचा बॉस मीच असल्यानं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मलाच आहे, बाकी कुणी माझ्या कारभारात ढवळाढवळ करण्याचं कारण नाही, असं कोर्टानं सांगितलं आहे! मला ताबडतोब दोन-अडीचशे सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या आहेत! 

नमोजी : (डोळे बारीक करून) मग करा ने...मला कशाला सांगते? 
आम आदमी : (शांतपणे) त्या अधिकाऱ्यांची नावं पाठवा...आय मीन यादी! त्यातल्या कुणाची बदली करायची ते मी ठरवीन! 
नमोजी : (मान हलवत) बदली कशाला करते? जवां दे ने!! 
आम आदमी : (निर्धाराने) गेली तीन वर्षे कुणाची तरी बदली करण्याचं स्वप्नं मी पाहातो आहे!! दिल्लीचा बॉस होऊनही मला एकही बदली करता आलेली नाही, हा लोकशाहीचा पराभव आहे, असं मी मानतो!! 
नमोजी : (मखलाशी करत) अरे, तमे दिल्ली नो बोस छे ने? तो पछी बदलीच्या काम कशाला करते? मस्त आराम करवानु, छोला-प्रांठा खावानुं!! काम काय कोण पण करते... 

आम आदमी : (रागाने) तुमच्यामुळे तीन वर्षं माझ्या दिल्लीचा विकास रखडला! एक काम धड करू दिलं नाहीत! त्याचा निषेध करण्यात पुढली दोन वर्ष निघून जातील!! उरलेली कामं कोण करणार? 
नमोजी : (समजूत घालत) ब्युरोक्रसी हाय ने...काम करायला! तुम्ही कशाला टेन्शन घेते? 
आम आदमी : (तक्रारीच्या सुरात) सर्व्हिसेस विभागानं कोर्टाच्या निकालानंतरही आमच्या फायली परत पाठवल्या! आम्ही तुमचं ऐकावं असं कोर्टानं कुठंही म्हटलेलं नाही, असं ते म्हणतात! पण आम्ही त्यांना आमचा इंगा आता दाखवू! दुनिया की कोई भी ताकद अब हमें रोक नहीं सकती!! 

नमोजी : (दिलदारपणे) कोंग्रेच्युलेशन्स...तुम्ही कोर्टमधी जंग जिंकले! मी पण आम आदमीसाठीज काम करते, सांभळ्यो? 
आम आदमी : (झटकून टाकत) तुम्ही शेठजी लोकांचीच कामं करता, आमचं दिल्लीतलं सरकार हे खरंखुरं आम आदमीनं आम आदमीसाठी चालवलेलं आम सरकार आहे... 
नमोजी : (कळकळीने विचारत) अरे भाई, हां हां...मी कुठे नाकबूल करते? पण हवे तमे शुं जोइये? 
आम आदमी : (फोनवर टेचात फर्मावत) लोककल्याण मार्गावरच्या तुमच्या घरातल्या दिवाणखान्यातले सोफे तयार ठेवा! आम्ही पाच-दहा लोक तिथं राहायला येत आहोत...लौकरच! हाहा!! 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com