'ढिंग एक्‍स्प्रेस' (नाममुद्रा)

Pune Edition Editorial Article on Dhing Express
Pune Edition Editorial Article on Dhing Express

पी. टी. उषाच्या रूपाने भारतीय ऍथलेटिक्‍सला एक स्वप्न पडले होते. तिचा कित्ता अनेकांनी गिरवला; पण तिच्या जवळपासदेखील कुणी पोचले नाही. आता ती उणीव दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. होय, आसामच्या हिमा दास या 18 वर्षीय मुलीने तो आशेचा किरण दाखवला आहे. फिनलंडमधील टाम्पेरे येथे वीस वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत हिमाने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले.

ऍथलेटिक्‍स प्रकारात कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅकवरील हे पहिलेच सुवर्ण. आसामच्या नागाव जिल्ह्यातील ढिंग गावातील रणजित आणि जोनाली दाम्पत्याच्या या कन्येने केवळ शिक्षकांनी सांगितले म्हणून फुटबॉलची आवड बाजूला ठेवत ऍथलेटिक्‍समध्ये लक्ष घातले. 

जेमतेम दोन वर्षांतच तिची ट्रॅकवर वेगाने पावले पडू लागली. प्रशिक्षक निपोन दास यांनी सर्वप्रथम तिच्यातील गुणवत्तेला पैलू पाडले. गेल्या वर्षी राष्ट्रीय युवक स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नांत तिने चमक दाखवली. लगोलग तिने नैरोबी येथे जागतिक युवक स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळविले. राष्ट्रीय शिबिरात हे रत्न गॅलीना बुखरीना व बसंत सिंग यांच्या हाती पडले.

गॅलीनानेच तिला 400 मीटर करण्याचा सल्ला दिला आणि तो अचूक ठरला. तिची तयारी पाहून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक दूर नाही, असे भाकित तज्ज्ञ व्यक्त करून लागले. हे भाकित इतक्‍या लवकर खरे होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. फेडरेशन करंडक आणि नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने 400 मीटरमध्ये प्रभावी कामगिरी केली. हा अनुभव गाठीशी घेत तिने फिनलॅंडमध्ये थेट सुवर्णपदक पटकावले. गावकऱ्यांनी दिलेले "ढिंग एक्‍स्प्रेस' हे विशेषण तिने सिद्ध करून दाखवले. 

प्रतिस्पर्धी कोण आहे, याविषयी हिमाला काही फरक पडत नाही. ती शर्यत पूर्ण एन्जॉय करते. तिची हेअरस्टाईल, मोजे घालण्याची खास शैली यामुळेही ती चांगलीच ओळखली जाते. भोगेश्‍वर बरुआनंतर (1966 -बॅंकॉक आशियाई स्पर्धामध्ये 800मीटरमध्ये सुवर्णपदक) आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी हिमा आसामची दुसरी धावपटू.

वरिष्ठ पातळीवर खेळण्यातील फरक अजून तिला समजावून घ्यायचा आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी हे "ढिंग एक्‍स्प्रेस' नावाचे रत्न जपून वापरायला हवे. अन्यथा, जास्त पदके मिळविण्याच्या नादात हे रत्न अधिक प्रमाणात घासल्याने त्याची लकाकी कधी कमी होईल, ते कळणारही नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com