पीड पराई...(अग्रलेख)

पीड पराई...(अग्रलेख)

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे इम्रान खान यांनी हाती घेतल्यानंतर भारत व पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये "अमन की आशा' फुलू लागली असतानाच, पाकिस्तानी लष्कराने सुरू ठेवलेल्या कारवायांबद्दल अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत खडे बोल सुनावले आहेत! स्वराज यांचे भाषण पाकिस्तानची दुटप्पी भूमिका आणि दहशतवादी कारवायांना दिला जाणारा पाठिंबा यांचे वस्त्रहरण करणारेच होते. पाकिस्तानी लष्कर काश्‍मीरमधील दहशतवादी कारवाया कशा थांबवायला तयार नाही, याचा तपशील तर त्यांनी आमसभेत विगतवार सादर केलाच आणि एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आमसभेच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बोलणी व्हावीत, ही इम्रान यांची विनंती कशी दुटप्पी होती, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

पाकपुरस्कृत दहशतवाद हा राक्षसी कसा आहे, तेही त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. स्वराज या वकील आहेत आणि हिंदी भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे. त्यामुळे आपला वकिली बाणा दाखवताना, त्यांच्या वक्‍तृत्वाला बहर आला होता. 
मात्र, पाकिस्तानवर सोडलेल्या टीकास्त्रापेक्षा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्वराज यांच्या भाषणात होता आणि तो संयुक्‍त राष्ट्रांच्या कार्यपद्धतीबद्दलचा होता. या संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत, तसेच धोरणांत आमूलाग्र बदल केला नाही, तर जागतिक स्तरावरची ही महत्त्वाची संघटना कालबाह्य होऊन जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दुसरे महायुद्ध पाच दोस्त राष्ट्रांनी जिंकले होते. त्यानंतरच्या सात दशकांनंतरही याच पाच देशांचे या संघटनेवर वर्चस्व कसे, हा त्यांचा सवाल कोणालाही निरूत्तर करणाराच होता. त्यामुळे एकीकडे भारत-पाक संबंधांचा विचार करतानाच, या संघटनेच्या नेतृत्वाला बदलती जागतिक व्यवस्था आणि काळाची पावले ओळखून आपल्या कार्यपद्धतीबद्दल फेरविचार करावा लागेल यात शंका नाही. अर्थात, स्वराज यांच्या भाषणाचा सारा रोख हा पाकिस्तानवरच होता.

आमसभेच्या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्कमध्येच "सार्क' देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि तीत स्वराज आणि पाक परराष्ट्रमंत्री महंमद कुरेशी हे आमने-सामने आले होते. तेथेही स्वराज यांनी पाकिस्तानलाच थेट लक्ष्य केले आणि त्यानंतर कुरेशी यांच्या भाषणाला त्या थांबल्याही नाहीत! पाकिस्तानचा यामुळे थयथयाट होणे, हे स्वाभाविकच होते. 

भारताने दोन परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे झालेला संताप इम्रान खान यांना आवरता आला नाही आणि त्यांनी भारताचा हा निर्णय केवळ नकारात्मकच नव्हे, तर "उद्दामपणा'चा आहे, अशी टीका इस्लामाबादेत केली. मात्र, एकीकडे मोदी यांना चर्चेसाठी विनंती करावयाची आणि त्याचवेळी जम्मू-काश्‍मीरच्या तीन पोलिसांचे अपहरण करून त्यांची हत्या करायची, या धोरणातून त्यांच्या "कब्जी कलुषा' व्यक्‍तिमत्त्वाचेच दर्शन घडले आहे. पाकिस्तान सरकारने भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा केलेला आणखी एक प्रकार म्हणजे आपल्या सुरक्षा यंत्रणांबरोबरील चकमकीत मारला गेलेला दहशतवादी आणि "जैशे महम्मद' संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हाण वाणी याच्या नावाने काढलेली टपाल तिकिटे. यासंबंधात मात्र इम्रान काहीच बोलायला तयार नाहीत. या साऱ्या गेल्या आठ-पंधरा दिवसांतील विसंवादी घडामोडींनंतर भारताने संवाद न साधण्याचा निर्णय घेतला, तर तो "उद्दामपणा' कसा काय ठरू शकतो? 

या पार्श्‍वभूमीवर मग भारताने आपल्या लष्करी बळाची चुणूक पाकिस्तानला परत एकदा दाखवली असेल, तर ते गैर म्हणता येणार नाही. उरी येथील लष्करी तळावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने "सर्जिकल स्ट्राइक' करून आपली ताकद दाखवून दिली होती. त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच, पुन्हा अशी काही कारवाई झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सूचित केले आहे. "सरहद पर कुछ अच्छी घटना हुई हैं...' हे त्यांचे विधान बरेच काही सांगून जाणारे आहे. मात्र "सर्जिकल स्ट्राइक'च्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्ताने मोदी सरकारने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना देण्यात आलेला राजकीय रंग हा अश्‍लाघ्यच म्हणावा लागेल. जवानांच्या कामगिरीचा अशा रीतीने पक्षीय राजकारणासाठी वापर करणे गैरच आहे. 

मात्र, संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेची यंदाची बैठक प्रदीर्घकाळ लक्षात राहील ती सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर चढवलेल्या घणाघाती हल्ल्यामुळेच! आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या आवडत्या "वैष्णव जन तो..' या भजनातील "पीड पराई जाने रे..' या पंक्‍तीचा संदर्भ दिला. त्यामुळे तरी संयुक्‍त राष्ट्र संघटना पाकिस्तान सातत्याने भारताला देत असलेल्या "पीडे'चा गांभीर्याने विचार करेल काय? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com