एक कदम मागे! (ढिंग टांग!)

Pune Edition Editorial Dhing Tang on One Foot Back
Pune Edition Editorial Dhing Tang on One Foot Back

प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून तिला डब्बलटिब्बल गाठ मारण्याची उबळ आम्हाला वारंवार येत असून केवळ हवेच्या दाबामुळे प्लास्टिकबंदीच्या निर्णयात सरकारला एक कदम मागे घ्यावा लागल्याने आम्ही खूप कष्टी झालो आहो. प्लास्टिकचा बोळा निघाल्याने आता विकासाचा प्रवाह जोरात वाहू लागून तुंबातुंबी होणार नाही, अशी आमची अटकळ होती. पण अखेर पर्यावरणमंत्र्यांनी आपल्याच निर्णयावर प्लास्टिकचे आवरण चढवून विषय प्याकबंद केल्याने आमची बोलती बंद झाली आहे. तथापि, आम्ही प्रारंभापासून पर्यावरणवादी आहो. प्लास्टिकबंदीला आमचा पाठिंबा कालही होता, आजही आहे व इन्शाल्ला उद्याही असेल. 

प्लास्टिकबंदी जाहीर झाल्यापासून आम्ही प्लास्टिकच्या हरेक गोष्टीचा त्याग केला आहे, ह्याची आम्ही येथे नम्रपणे नोंद करू. (आपणही करून ठेवावी!) ज्याप्रमाणे सारा भारत देश कांग्रेसमुक्‍त होत आहे, त्याप्रमाणे आम्हीही अंतर्बाह्य प्लास्टिकमुक्‍त होत आहो! ह्या प्लास्टिकने आमचे आयुष्य फार्फार पोखरले. बालपणी मेणकापडावर सुरू झालेला हा प्लास्टिकसंबंध पानवाल्याच्या तळहाती खर्रा वा मावा रगडण्यापर्यंत कायम राहिला. तंबाकूचा मावा रगडण्याच्या प्रक्रियेत प्लास्टिकची भूमिका अतिशय महत्त्वाची असे. हे प्रकरण थेट तळहातात घासण्याचे नाही. पक्‍का तुकडा सुपारीचा समावेश त्यात असेल तर अजिबातच नाही. तरीही आम्ही आमच्या पानवाल्यास सारा ऐवज तस्साच देण्यास फर्मावून मुखात टाकला. तोंडाची आगाग झाली, पण प्लास्टिकला शरण गेलो नाही!! 

प्लास्टिकबंदी झाल्यानंतर मात्र आम्ही ह्या सवयी कष्टाने सोडल्या. उदाहरणार्थ, कालपर्वापावेतो आम्ही प्लास्टिकच्या कोपातून कटिंग चहा पीत असू. आता (कापडी) पिशवीतून चिनीमातीचा कानफुटका कोप घेऊन कोपऱ्यावरील चहावाल्याकडे जाऊन उभे राहातो. पूर्वीच्या काळी आम्ही अंडीवाल्याकडे जाऊन निव्वळ चार बोटे दाखवून उभे राहात असू. आता तीच चार अंडी आंजुळीत धरुन (घरी) आणतो! जिज्ञासूंनी तळहातात अंडी धरून रस्ता क्रॉस करून दाखवावा, म्हंजे आम्ही करीत असलेला त्याग कळेल!! 

प्लास्टिकबंदीमुळे आपल्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल करावे लागतील, हे मात्र शतप्रतिशत खरे आहे. गेल्या पाच दिवसात आम्ही बरेचसे बदल आमच्यात केले. परंतु, सामान्य जनतेच्या वेदनांचे काय करायचे? प्लास्टिकबंदीच्या काळात मासे आणि मुर्गी खाणाऱ्यांची होणारी घुसमट आम्ही समजू शकतो. कापडी पिशवीत डबा घेऊन फार्तर कोळंबी अथवा बोंबलाचा वाटा आणता येईल. पण पापलेट कसे आणावे, ह्यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? विस्वण कशातून आणावे? मुर्गीवाल्याच्या तराजूशेजारी असलेल्या प्लास्टिकच्या काळ्या पिशव्यांचे आता काय झाले असेल? तूरडाळ कशातून आणावी? सोड्याच्या बाटल्या हातात घेऊन येणाऱ्याकडे आसपासचे रहिवासी कुठल्या नजरेने बघतात, हे आम्ही काय सांगावे? (आपण सुज्ञ आहा!!) त्यासाठी प्लास्टिकची पिशवी अत्यंत उपयोगी पडत असे. कोथिंबिरीची बारकी जुडी एकवेळ हातातून आणता येईल, परंतु, मिरच्या आणि अद्रकाचा पंजा एकत्र कसा धरावा? हाही एक यक्षप्रश्‍न आहे. 

परंतु, आम्ही आता बदललो आहो. परवा वडे-भजी आदी पदार्थ पार्सलमध्ये बांधून आणण्याऐवजी पोटाच्या खोळीत भरूनच घरी आणले, तेव्हा वाटले, आम्ही जिंकलो!! प्लास्टिकविरहित जीवनाला आम्ही सरावतो न सरावतो तोच पर्यावरणमंत्र्यांनी बंदीची गाठ ढिली करुन प्लास्टिक व्यापाऱ्यांना दिलासा दिला. ह्याला काय अर्थ उरला? ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही थेट पर्यावरणमंत्र्यांकडे गेलो. 
""अचानक निर्णय बदलून आपण आमचा सरावभंग केला असल्याने पाच हजार रुपये दंड भरा!!'' आम्ही सज्जड दम भरला. त्यांनी करुण दृष्टीने आमच्याकडे पाहून आमच्या हातावर एक प्लास्टिकची पिशवी तेवढी ठेवली! 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com