सरकारचा 19चा पाढा !

Pune Edition Editorial On Financial Situations
Pune Edition Editorial On Financial Situations

2019च्या रणदुंदुभी आत्तापासूनच वाजू लागल्या असून, अनेक आघाड्यांवर त्याचे पडसाद उमटणार, हे नक्की. जीएसटी परिषदेच्या बैठकीत सुमारे शंभर ग्राहकोपयोगी वस्तूंवरील "वस्तू-सेवा कर' (जीएसटी) कमी करण्याचा जो निर्णय घेण्यात आला, त्याला ते परिमाण आहे, यात शंका नाही. अप्रत्यक्ष कररचनेतील मूलभूत अशी सुधारणा "जीएसटी'च्या रूपाने करण्यात आली ती एका वर्षापूर्वी. "जीएसटी'तून वर्षाला 12 लाख कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता, तो प्रत्यक्षात 13 लाख कोटी रुपये मिळाल्याने सरकारचा उत्साह वाढला असेल तर नवल नाही. त्यामुळेच सार्वत्रिक निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना सरकारकडून काही सवलती मिळणार, याची अटकळ बांधली जात होतीच. अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंवरील "जीएसटी' कमी करून केंद्र सरकारने प्रामुख्याने मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. 

एकूणच या सवलतींमुळे केंद्र व राज्य सरकारांच्या तिजोरीला वर्षाला दहा ते बारा हजार कोटींचा खड्डा पडेल, याकडे असा अंदाज आहे. मात्र, सत्ताधारी सध्या निवडणुकीच्या "मोड'मध्ये असल्याने अर्थकारणाचे निकष बाजूला पडणार, हे ओघानेच आले. राज्यांना केंद्राकडून भरपाई मिळणार असल्याने जीएसटी परिषदेच्या बैठकीत या बदलांना विरोध झाला नाही. हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी दरबदलांमुळे एकूणच करवसुलीचे प्रमाण वाढेल व त्यामुळे हा खड्डा भरून निघण्यास मदत होईल, असे म्हटले असले तरी तो फक्त आशावाद आहे; पण तूर्त ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रेफ्रिजरेटर, मिक्‍सर, वॉटर हीटर, वॉशिंग मशिन या चैनीच्या वस्तू राहिलेल्या नाहीत, याचे प्रत्यंतर व्यवहारात येते आहेच. केंद्राने त्यांवरील कर 28वरून अठरा टक्‍क्‍यांवर आणून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

याशिवाय हस्तकला वस्तूंवरील कर 18वरून 12 टक्‍क्‍यांवर, तर एक हजार रुपयांपर्यंतच्या पादत्राणांवरील कर 18 वरून थेट पाच टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. करकपात झालेल्या वस्तूंची एकूण संख्या शंभर आहे, यावरून या बदलाचे व्यापकत्व लक्षात येते. यापैकी सॅनिटरी नॅपकिनवरील कर शून्यावर आणण्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. महिला सक्षमीकरण, महिलांचे आरोग्य या विषयांवर बरेच बोलले जात असले तरी प्रत्यक्षात त्या दिशेने ठोस पावले पडत नाहीत, असे बऱ्याचदा आढळते. या पार्श्‍वभूमीवर सरकारने दिलेला हा दिलासा महत्त्वाचा ठरतो. 

जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण या दृष्टीनेही या निर्णयाकडे पाहता येईल. "जीएसटी'चे पाऊल उचलताना सात प्रकारचे दर ही त्यातील एक मोठी तडजोड होती; पण ती तात्पुरती ठरून बहुसंख्य वस्तू 12 ते 18 या दोनच दरांमध्ये बसविण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरू झाला आहे, असे म्हणता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com