प्रश्‍न वाघांच्या अस्तित्वाचा 

Question of existence of tigers
Question of existence of tigers

देशातील वाघांची संख्या वाढत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी संसदेत दिली. 2014 मध्ये महाराष्ट्रात 190 वाघ होते. चार वर्षांनी होणारी राष्ट्रीय व्याघ्रगणना यंदा झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील वाघांची संख्या 235 ते 250 असू शकते. संख्या वाढत असतानाच गेल्या सहा महिन्यांत राज्यात तेरा वाघांचा मृत्यू झाला, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढताना त्यांच्या संरक्षणाचा मुद्दाही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, संख्या वाढली तरी त्यांचे घर (अधिवास) मात्र वाढलेले नाही. तसेच, त्यांचे भ्रमणमार्गही (कॉरिडॉर) सुरक्षित नाहीत. त्यांचे अधिवास टिकवून ठेवणे आणि भ्रमणमार्ग वाढविणे, हे मोठे आव्हान वन विभागापुढे आहे. 

राज्यात सहा व्याघ्रप्रकल्प आहेत. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, यवतमाळ आणि अमरावती या सात जिल्ह्यांत वाघांची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची संख्या आता 150 वर गेली आहे. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचे परिश्रम आणि सरकारचे पाठबळ यामुळेच ते शक्‍य झाले आहे. वनसंवर्धन, संरक्षण आणि गावांचे पुनर्वसन या तीन प्रमुख कारणांमुळे ही संख्या वाढली आहे. मानवाचा जंगलातील हस्तक्षेप कमी केल्याचाही सकारात्मक परिणाम संख्यावाढीवर झाला आहे. शिकारी आणि नैसर्गिक कारणांमुळेही संख्या घटते, हेही सत्य आहे. त्यामुळे वन विभागाने अधिक दक्ष राहणे, हीसुद्धा काळाची गरज आहे. 

विदर्भातील ताडोबा, मेळघाट, पेंचसारख्या उष्ण व कोरड्या हवामानात वाघाने आपला अधिवास केला आहे. बदलता काळ आणि परिस्थितीनुसार वाघाचा अधिवासही बदलतो आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केला, तर वाघांचा हा अधिवास वाढलेला नाही. म्हणजेच, वाघांचे घर तेवढेच असले तरी त्यातील वाघांची संख्या मात्र लक्षणीयरीत्या वाढली आहे. दुसरा वाघ एखाद्या वाघाच्या अधिवास क्षेत्रात गेला, तर त्याला ते आवडत नाही. त्यामुळे या नैसर्गिक बाबीचा अतिशय गांभीर्याने विचार व्हायला हवा. वाघांचे अस्तित्व हे केवळ निसर्गसाखळी म्हणून नव्हे, तर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अतिशय मोलाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com