राज्याभिषेकाचे निनादले पडघम!

Rahul Gandhi
Rahul Gandhi

अखेर कॉंग्रेसला मुहूर्त सापडला आहे! इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीची सांगता रविवारी झाली आणि सोमवारी कॉंग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याच्या दिशेने प्रत्यक्ष पावले टाकली. आता औपचारिकता बाकी आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या 31 डिसेंबर या मुदतीपूर्वी कॉंग्रेसला ती पार करावयाची होती. त्या औपचारिकतेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज चार डिसेंबरपर्यंत सादर करता येतील. अर्थात, राहुल यांच्याशिवाय अन्य कोणाचा अर्ज आलाच, तर मतदान होईल. मात्र, तशी शक्‍यता कमी आहे. पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी गांधी घराण्यापलीकडे पहायचेच नाही, हा पक्षात पडलेला रिवाज आता इतका मुरला आहे, की चर्चेपुरतीदेखील पर्यायी नावे पुढे आली नाहीत. कॉंग्रेसच्या सध्याच्या स्थितीविषयी बरेच काही सांगणारे हे वास्तव आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे जानेवारी 2013 मध्ये उपाध्यक्ष झालेले राहुल आता अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतील, हे स्पष्ट झाले आहे. राहुल हे अध्यक्ष होणार, अशा वावड्या कॉंग्रेसजनांनी अनेकदा उठवल्या आणि अनेक राजकीय ज्योतिषांनी त्यासाठी मुहूर्तही जाहीर केले होते. मात्र, "रिलक्‍टंट प्रिन्स' असे वर्णन केले जाणारे राहुल हे कॉंग्रेसच्या या सर्वोच्च पदापासून दूरच राहू पाहत होते. मग आताच नेमके असे काय घडले की राहुल हे नेतृत्वाची धुरा स्वीकारण्यास तयार झाले? या प्रश्‍नाचे उत्तर हे अन्य कोणी नव्हे, तर गुजरातच्या जनतेने गेल्या महिनाभरात त्यांना दिलेल्या प्रतिसादात आहे. राहुल यांनी गुजरातच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि या प्रचारमोहिमेत त्यांची शब्दभाषा व देहबोली पुरती बदलून गेल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे 2014 लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गारठून गेलेल्या कॉंग्रेसजनांमध्येही जान आली आहे. एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि त्याचवेळी गुजरातच्या जनतेचा प्रतिसाद यामुळे अखेर राहुल यांनी अखेर या पक्षांतर्गत राज्याभिषेकास मान्यता दिलेली दिसते.

या निमित्ताने कॉंग्रेसमध्ये 17 वर्षांनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. यापूर्वी 2002 मध्ये सोनिया यांच्या अध्यक्षपदाला जितेंद्रप्रसाद यांनी आव्हान दिले होते. मात्र, त्यांना ते पेलवणे शक्‍यच नव्हते. खरे तर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांना ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी गळ घालून 1998 मध्ये प्रचारात उतरवले होते आणि पुढे सीताराम केसरी यांची हकालपट्टी करून कॉंग्रेस कार्यकारिणीनेच त्यांची अध्यक्षपदी विधिवत प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर पुढची जवळपास दोन दशके त्यांच्याच हातात सारी सूत्रे होती. आता हे "बॅटन' त्या चिरंजीव राहुल यांच्या हातात सोपवणार असल्या, तरी राहुल यांच्यापुढची आव्हाने फार मोठी आहेत. सोनिया अध्यक्ष असतानाही राहुल यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला लोकसभेत अर्धशतकही गाठता आले नव्हते आणि अवघ्या 44 खासदारांना घेऊन त्यांना लोकसभेतील किल्ला लढवावा लागला. त्यांनी लोकसभेतील पक्षाचे नेतृत्वही स्वीकारले नव्हते आणि त्यापूर्वी दहा वर्षे कॉंग्रेसप्रणीत "युपीए'चे सरकार असताना मंत्रिपदालाही नकार दिला होता. तरीही सत्ता आपल्याच हाती आहे, हे डॉ. मनमोहनसिंग सरकारचा एक अध्यादेश जाहीरपणे फाडून टाकत राहुल गांधी यांनी दाखवून दिले होते. मात्र, आता अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांना आपल्या या स्वभावात बदल घडवून आणावा लागेल. त्याशिवाय सोनिया गांधी यांच्या दरबारी राजकारणातील प्रस्थापितांनाही दूर सारावे लागणार आहे. अर्थात, त्याची सुरवात सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव आदींकडे काही ना काही मोठ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांनी केलीच आहे. मात्र, सोनिया अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही त्या राहुल यांना किती मोकळा हात देतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

राहुल यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी आहे आणि ती म्हणजे मुस्लिम, दलित या कॉंग्रेसच्या पारंपरिक मतपेढीच्या पुढे जाऊन पक्ष वाढवण्याची. गुजरातमध्ये जनतेशी थेट संवाद साधतानाच, त्यांनी पाटीदार, ओबीसी आणि दलित यांच्यावर काही प्रमाणात तरी प्रभाव पाडल्याचे दिसत आहे. त्यापलीकडे जाऊन जातीपातींच्या विळख्यात गुंतून पडलेल्या कॉंग्रेसला नवी दृष्टी देण्याचे आणि मुख्य म्हणजे नव्या आशा-आकांक्षांनी प्रेरित झालेल्या तरुणांना आश्‍वासक कार्यक्रम देण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे. आता 2019 मधील लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच असणार, हेही स्पष्ट झाले आहे. मोदी हे विकासाचा अजेंडा राबवण्याचे आश्‍वासन देतानाच हिंदुत्वाची खेळीही तेव्हा खेळणार. त्यामुळे राहुल यांना केवळ टीकाकाराची भूमिका घेऊन चालणार नाही, तर त्यांना पर्यायी आर्थिक कार्यक्रमही जनतेपुढे मांडावा लागेल. शिवाय, तो तरुणांना रुचणारा असायला हवा. राजीव गांधी यांनी ते करून दाखवले होते. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने भरारी घेतली, ती राजीव यांच्याच काळात. राहुल यांनाही त्याच वाटेने जावे लागेल. ते काम त्यांना नैमित्तिक सुट्यांना तिलांजली देऊन "24 बाय 7' काम करावे लागेल, तरच सत्ता येवो ना येवो, किमान मजबूत विरोधी पक्ष म्हणून तरी कॉंग्रेस उभी राहू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com