रईसजादे! (ढिंग टांग)

रईसजादे! (ढिंग टांग)

(एक पत्रापत्री)

उपऱ्यांचे कर्दनकाळ महाराष्ट्रधर्माचे तारणहार श्रीमान चुलतराजसाहेब ह्यांसी बालके अमेयाजी खो नामे कडवट मनसैनिकाचे लाख लाख दंडवत, विनंती विशेष. साहेबकाम तडीस नेले, मोहीम फते जाहली, ह्याचा संतोष वाटोन घ्यावा, ह्या इराद्याने हा नाचीज बंदा खतलिखाईची मुजोरी करितो आहे. मुआफी चाहतो. आपणांस हे विदित असेलच, की "रईस‘ आणि "ऐ दिल है मुश्‍किल‘ ह्या दोन हिंदी चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलावंत काम करीत असल्याची खबर ऐन मध्यरात्री लागली. गोटात चलबिचल जाहली. हे तो उंटाचे तंबूत अरब शिरल्यासारिखे जाहले. (म्हण उलटसुलट जाहली. समजोन घेणे.) छावणीत दडी मारोन कार्यभाग साधणाऱ्या गनिमास वेचोन वेचोन काढोन पोकळ बांबूचे फटके द्यावेत, हे तो अवयवासकट आपणच सांगितलेले...आपला बोल, म्हंजे मोगरीचे फूल!! भूमीवर पडता उपेग नाही!! तदनुसार पोकळ बांबूचा उदंड साठा मेळविला आहे. चिंता नसावी!! दरम्यान सदर चित्रपटांत पाकिस्तानी फनकार मौजूद आहेती व त्यांस बख्खळ दौलतजादाही करणेची जुर्रत एथील काही खंडोजी खोपडे करिताती, ऐसा अंबल जाहला. हे तो ऐन पंक्‍तीत वरणाचे वाटींत बदकार्य करिण्यासारिखे. तळपायाची आग मस्तकात पोचली. पाकिस्तानी फनकारांस गांठोन 48 तासात मुलुख सोडून जा, ऐसे फर्माविले. 44 व्या कलाकास फवाद खान नावाचा गनीम कराचीत पोचल्याची खबर येऊन थडकली!! सदर इसम "रईस‘ नावाच्या चित्रपटात काम करत होता, असे निष्पन्न जाहले असोन मुदलात फवाद नावाचे इसमास मुलुखात प्रवेश कोण्ही दिल्हा, ह्याची चवकशी आरंभली आहे. (पोकळ बांबू तयार आहेत!) असो.

दरम्यान, आपल्या पहारेदारांनी जुहूपासोन तहत गोरेग्रामापरेंतचा इलाखा पिंजोन काढिला. आवश्‍यक तेथ "हीट‘ हे कीटनाशक फवारिले आहे. चिंता नसावी! किमान आठ हाटेलांमध्ये जाऊन पाकिस्तानी कलाकार दडून राहिले नाहीत ना, ह्याची तपासणी केली. दोन ठिकाणी कबाब बरे मिळतात, ऐसा शोध लागला. वानोळा म्हणून पार्सल धाडत आहे. कृपया स्वीकार करावा. हिंदुस्तान झिंदाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. जय महाराष्ट्र. आपला नम्र सैनिक अमेयाजी खो.
ता. क. : ह्या घटकेस मुंबैनगरीत एकही गनीम औषधालाही उरलेला नाही, याची ग्वाही देतो. संबंधित चित्रपटाच्या कचेऱ्यांमध्येच दाराआड पोकळ बांबू उभे करून ठेवण्यात आले आहेत. बाकी साहेबेच्छा बलियसी. खो.
* **

प्रिय खो,
शाब्बाश मेरे पठ्‌ठे! तुमच्यासारखे बारा सैनिक मिळाले तरी हा महाराष्ट्र मी आमूलाग्र बदलून दाखवीन. पोकळ बांबू हे एक अमोघ शस्त्र आहे. ते चालविणाऱ्याचे यश हे ठरलेलेच असते. जोवर गनिमाचे कारनामे थांबत नाहीत, तोवर त्यांच्या मुल्कातील कलावंतांना येथे पायीचा अंगठादेखील आम्ही शिरवू देणार नाही. आम्ही स्वत: पुणे आणि कर्जत ही दोन ठिकाणे सोडून कोठेही जात नाही. हे कशाला येथे येतात? असो.

बाय द वे, आमचे परममित्र सल्लुभाई ह्यांचा काल फोन आला होता. लोक त्यांस "भाई‘ म्हणत असले, तरी तो आम्हास "भाई‘ म्हणतो...बरं!! काळविट मारल्यागत आवाज काढोन त्याणे आम्हांस गळ घातली, की "रईस‘ आणि "ऐ दिल है मुश्‍किल‘ हे दोन्ही चित्रपट कृपया शांततेत रिलीज होऊ द्यावेत. अन्यथा गनीम फनकार कराचीत निघोन जातील, परंतु एतद्देशीय निर्मात्यांचे बुरे हाल होतील. चित्रपट बोंबलल्यास सदर चित्रपटांचे निर्माते अनुक्रमे करण जोहर, शाहरुख खान, गौरी खान, फरहान अख्तर आदींना नौकरीपाण्यासाठी रेल्वे भर्तीची परीक्षा देण्याची वेळ येईल!! सल्लुभाय आमचे मित्र आहेत. तेव्हा, केवळ त्यांच्या आग्रहाखातर रेल्वे भर्तीचे (मराठीतील) फॉर्म शाखेत आणोन ठेवावेत, अशी आमची सख्त सूचना आहे. वेळ पडल्यास उपेग होईल. बाकी सुक्षेम. साहेब.

ता. क. : आपल्यासाठी सोन्याचे सलकडे काढोन ठेविले आहे. उदईक येवोन घेवोन जावे. आपण पाठवलेले कबाब बरे होते. पुन्हा गाडाभर पाठवावे. सा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com