मारेकऱ्याला मोकळे रान! (अग्रलेख)

-
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

सभ्यतेचा बुरखा पांघरून एखादा निर्ढावलेला गुन्हेगार सहा खून करूनही तेरा वर्षे मोकळा राहत असेल तर पोलिसांची तपास यंत्रणाच नव्हे, तर कायद्याच्या एकूण व्यवस्थेचेच हे ढळढळीत अपयश म्हणावे लागेल. 

सभ्यतेचा बुरखा पांघरून एखादा निर्ढावलेला गुन्हेगार सहा खून करूनही तेरा वर्षे मोकळा राहत असेल तर पोलिसांची तपास यंत्रणाच नव्हे, तर कायद्याच्या एकूण व्यवस्थेचेच हे ढळढळीत अपयश म्हणावे लागेल. 

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांसह अनेक गुन्हे करूनही एखादी व्यक्ती तेरा वर्षे मोकाट राहू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय वाईतील खून सत्रामुळे आला आहे. एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथानकापेक्षाही भयानक अशा खुनांच्या घटनेने सारा महाराष्ट्र अक्षरशः हादरला आहे. सभ्यतेचा बुरखा पांघरून एखादा निर्ढावलेला गुन्हेगार सहा खून करूनही तेरा वर्षे मोकळा राहत असेल तर पोलिसांची तपास यंत्रणाच नव्हे तर कायद्याच्या एकूण व्यवस्थेचेच हे ढळढळीत अपयश म्हणावे लागेल. या व्यवस्थेला कीड लागलेली आहे, ती भ्रष्टाचाराची. कोणत्याच प्रशासकीय यंत्रणेच्या पातळीवर कथित डॉक्‍टर संतोष पोळ याच्या उपद्‌व्यापांना अटकाव झाला नाही, त्याचेही कारण व्यवस्थेला पोखरणारी ही कीडच आहे. या संपूर्ण घटनेचा क्रम लक्षात घेतला तर आपल्याकडच्या ‘पोलिसिंग‘मधल्या अनेक कच्च्या ‘जागा‘ त्यात उघड झाल्या आहेत; गरज आहे ती त्यात तातडीने सुधारणा करण्याची. मुख्य म्हणजे पोळसारख्या व्यक्ती याच कच्च्या दुव्यांचा पुरेपूर फायदा उठवितात. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा आधार घेऊन पोलिसांवरच दबाव आणण्याची या कथित डॉक्‍टरची चलाखी बराच काळ चालून जाते, हे कशाचे लक्षण आहे? चोराच्या उलट्या...येथे चालू शकतात, याचे कारण पोलिस यंत्रणेचा कमी झालेला वचक. त्यामुळेच या घटनेच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करून हा दरारा पुनःस्थापित करण्याचे उपाय शोधले पाहिजेत. तसे केले नाही, तर पोळसारखे आणखीही गुन्हेगार भविष्यात तयार होणार नाहीत, याची काहीही शाश्‍वती नाही. सामाजिक रेटा निर्माण झाला, तरच पोलिस यंत्रणा खडबडून जागी होते, हे यातील वास्तव धक्कादायक आहे. 

2003 पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा खून झाल्याचे निष्पन्न होणे हा धक्का आणखीनच भेदरवून टाकणारा आहे. अंगणवाडी सेविकांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या अध्यक्षा मंगल जेधे 15 जूनपासून बेपत्ता होत्या. पदाधिकारी असल्याने संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जेधे यांच्या प्रकरणाचा तपास झाला आणि दोन महिन्यांनी का होईना घटनेचा छडा लागला. डॉ. संतोष पोळ आणि त्याची साथीदार ज्योती मांढरे यांना अटक झाली. जे मृतदेह सापडले आहेत, त्यातील एक अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीबाबतची बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यापैकी एखाद्याच्या बाबतीत जरी कसून शोध झाला असता तर पुढील जीव कदाचित वाचले असते. 

सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या वाईच्या परिसरात 13 वर्षांपासून ही खुनाची मालिका सुरू होती. जमिनीच्या विक्रीच्या प्रकरणात या कथित डॉक्‍टरने चुलत चुलती जगाबाई पोळ यांचा खून केल्याचा आरोप आहे. इतर खुनांमागे सोने, पैशाचे आमिष, अनैतिक संबंध लपविणे अशी विविध कारणे आहेत. परंतु, प्रत्येक खुनामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. ती शोधून काढायला लागतील. बहुतेक खुनासाठी त्याने विषारी इंजेक्‍शनचा उपयोग केला आहे. डॉ. पोळ याचे धोम येथील गावाबाहेर असणारे निवासस्थान व पोल्ट्री फार्मच्या परिसरात हे मृतदेह पुरण्यात आले, तर एक मृतदेह धोमच्या कालव्यात फेकण्यात आला. मृतदेहांची विल्हेवाट अशा प्रकारे लावणाऱ्या पोळ याची ‘मोडस ऑपरेंडी‘ वेगळीच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्याची भीती दाखवून तो पोलिसांवर दडपण आणत असे. काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याने लाचलुचपतीच्या जाळ्यात अडकविलेही होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी, तसेच सखोल तपास होऊ नये, यासाठी पोळने वेळोवेळी दबावतंत्राचा वापर केला. ‘सोने दुप्पट करून देते, असे सांगून माझ्याकडून मंगल जेधे 20 तोळे सोने घेऊन गेल्या,‘ असा खोटा तक्रार अर्ज त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे केला होता. त्याचबरोबर 24 जून 2016 रोजी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनावही केला होता. त्याची साथीदार ज्योती मांढरे हिने त्याच्या सांगण्यावरून वाईच्या फौजदारी न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 

गंभीर गुन्हे करूनही हा नराधम डॉक्‍टर म्हणून उजळ माथ्याने मिरवत होता. त्याच्या वैद्यकीय पदवीबाबत संभ्रम आहे. इलेक्‍ट्रोपॅथीची पदवी त्याच्याकडे असल्याचे सांगण्यात येते. विषारी इंजेक्‍शनचा वापर करणे किंवा रुग्णांना एड्‌स झाल्याचे सांगून उपचारासाठी पैसे उकळणे अशा मार्गांचा अवलंब त्याने वेळोवेळी केला. बोगस डॉक्‍टर म्हणून त्याच्यावर कारवाई झाली असती तरी यातील काही गुन्हे टाळता आले असते. त्याचा धोम येथील पोल्ट्री फार्मही बेकायदा आहे. म्हणजे पोलिसांसह विविध सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणाचे हे सारे हकनाक बळी ठरले आहेत. हे सर्व गुन्हे त्याने एकट्यानेच केले की त्याचे आणखी काही साथीदार आहेत, याचा कसून शोध घेतला जावा. प्रत्येक गुन्ह्याचा स्वतंत्र तपशील गोळा करून स्वतंत्र खटले दाखल करताना या क्रूरकर्म्याचे गुन्हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी पोलिसांना भक्कम पुरावे गोळा करावे लागतील. बेपत्ता व्यक्तींच्या तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारावा लागेल. तसेच या प्रकरणामुळे पोलिसांवरील जनतेच्या विश्‍वासाला तडा गेल्याने, तो पुन्हा संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Web Title: Ran the killer free!