नीती व भ्रष्टता (परिमळ)

raskar
raskar

भ्रष्टता ही वृत्ती, तर भ्रष्टाचार ही कृती आहे. झाडाचे मूळ जेवढे खोलवर असते, तेवढाच अधिक जिवंतपणा त्याच्यातही असतो. भ्रष्टाचार केवळ पैशाचाच असतो, असे नाही. भ्रष्ट आचार-बिघडलेला आचार म्हणजे भ्रष्टाचार. मानवी जीवनातील हर क्षेत्रात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भ्रष्टता ही आढळतेच. मुळात ती एक वृत्ती आहे. स्खलनशीलतेत तिचे मूळ आहे. स्खलनशीलता म्हणजे अधःपतनाची शक्‍यता. ती मानवी प्रकृतीचा भाग असते. माणूस हा विचारशील प्राणी आहे. त्याच्यात प्राणी म्हणून सहजप्रवृत्ती, तर माणूस म्हणून विवेकशीलता असते; पण या दोन वृत्तींमध्ये प्राणित्व अधिक असते. त्यामानाने तो विवेकाने कमी वागतो. थोडा थोडका नव्हे, तर हजारो वर्षे तो नीतिमान होण्यासाठी धडपडतोय; पण यशस्वी होत नाही. खरे तर नीती ही सामाजिक गरज आहे. आधी देवाधर्माच्या प्राप्तीसाठी माणसाला तिची गरज भासली. नंतर निरामय सामाजिक व्यवहारासाठी तिची आवश्‍यकता वाटली. वस्तुतः नीती दैवी नसते, की नैसर्गिकही नसते. ती मानवी समाजाची ‘सोय’ असते. समाज या संज्ञेत नीती दडली आहे. कारण समाज म्हणजे ‘मर्यादा’ असे म्हटले जाते. माझ्या इच्छांना इतरांच्या इच्छांसाठी मुरड घालणे हीच मर्यादा होय. असे असेल तर माणसाने नीतीने वागणे आवश्‍यक ठरते; पण दुर्दैवाने असे घडत नाही. आजचे सर्वसाधारण सामाजिक चित्र हेच आहे. असे का व्हावे? नीतीचे सार्वत्रिकीकरण झाले नाही, हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे, ज्यांनी तिचा अंगीकार केला, त्यांचा गौरव झाला नाही. उलट त्यांना प्रचंड यातनाच झाल्या. म्हणूनच की काय, ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ असे म्हटले गेले. संतांची, सज्जनांची चरित्रे याचा दाखला देतात. समाजही ‘फेसलेस’ झाला. शिवाय, नीती-अनीती, चांगले-वाईट, सत्य-असत्य यांची व्याख्या वैयक्तिक राहिली. त्यामुळे वाईटाची मात्रा वाढत गेली. जसे निसर्ग नियम सार्वत्रिक असतात, तसे नीती नियमांचे झाले नाही.

आचार्य विनोबा म्हणतात, नीतीचे शास्त्रीय प्रमेय झाले पाहिजे. तिला सिद्धांताचे रूप आले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नीतीच्या वैश्‍विकतेचा विचार मांडला. असे झाले असते, तर आज मानवी समाजाचे नैतिक अधःपतन झाले नसते, भ्रष्टता घराघरांत दिसली नसती. अर्थातच भ्रष्टाचार वाढत जाणार. अशावेळी भ्रष्टाचार रोखण्याचा एकाकी प्रयत्न करणे म्हणजे अरण्यरुदन ठरेल. जखम खोलवर पोचली आहे. तेव्हा बाहेरून केवळ मलमपट्टी करून भागणार नाही. आतूनही औषध घेतले पाहिजे. भ्रष्टाचाराचेही तसेच आहे. तो ज्यातून आला ती भ्रष्टता वाढू न देणे आणि विवेकाच्या साह्याने सद्‌गुणांची प्रतिष्ठापना व जोपासना करणे गरजेचे आहे. यालाच भगवान गौतम बुद्ध ‘सम्यक्‌ व्यायाम’ म्हणतात; पण त्याची सुरवात ‘माणूस’ घडवणाऱ्या नवीन शिक्षण पद्धतीतून करावी लागेल. मग ‘कॅशलेस’ काय, ‘कास्टलेस’ समाजही उदयाला येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com