नाते - जोडलेले (परिमळ)

नाते - जोडलेले (परिमळ)

आपण माणसे म्हणजे "सोशल ऍनिमल‘ असतो. आपल्याला एकटे राहायला आवडत नाही. आपल्याला कोणाची ना कोणाची साथ हवी असते. त्यासाठीच आपण नाती जोडतो. नाते जुळायला अगदी साधे कारणही पुरते. मुंबईसारख्या महानगरात ठराविक स्टेशनवर ठराविक वेळी ठराविक लोकल ट्रेनमध्ये, तेही ठराविक डब्यामध्ये चढणाऱ्या लोकांचेही एकमेकांशी नाते जुळते. हे नाते फार घट्ट असते असे नाही. एकमेकांना ते रोज "हाय... हॅलो‘सुध्दा करत नाहीत. पण नजरेनेच एकमेकांची दखल घेतली जाते. एखाद्याच्या गैरहजेरीचीही मनोमन नोंद घेतली जाते.

नवीन नाते जुळणे हा अतिशय सुखद अनुभव असतो. एखाद्या व्यक्तीशी नवीन ओळख होते आणि आपल्याला वाटून जाते की आपले आणि या व्यक्तीचे चांगले जुळेल. असे वाटणे मनाला उभारी देणारे असते. त्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल अशीच भावना निर्माण झाली असेल, तर दुधात साखरच! असे परस्परानुकूल योग तुलनेने दुर्मिळ असतात. बऱ्याचदा अशा गोष्टी "एकतर्फी - वन साइडेड‘ असतात. कधी आपल्याला ती व्यक्ती भावते; पण तिला आपण भावत नाही किंवा नेमके या उलट. मग ते नाते लादल्यासारखे होते. अशी नाती तडजोड म्हणून निभवावी लागतात.

नाते जोडणे ही एक कला आहे. काही भाग्यवान ही कला उपजतच घेऊन येतात, पण ही कला प्रयत्नाने साध्य करणे शक्‍य व्हावे. आपल्याला ही कला कितपत अवगत आहे हे एका स्वाध्यायाने शोधता येईल. आपल्या गत आयुष्यात आपण किती नाती जोडली (किंवा जुळली) आणि किती तोडली (किंवा तुटली) याचा धांडोळा घ्यावा. जोडलेल्या/जुळलेल्या नात्यांची संख्या तोडलेल्या/तुटलेल्यांपेक्षा जितकी जास्त तितके तुम्ही नाती जोडण्यात प्रवीण. त्यातही दीर्घकाळ टिकलेली किती नाती तुटली हेही बघावे. दीर्घकाळ टिकलेले नाते तुटणे मनाला डागण्या देते. या स्वाध्यायातील पुढील भाग म्हणजे नाती टिकण्याचे आणि तुटण्याचे कारण शोधायचे. कारणांची संख्या वरकरणी जास्त वाटली, तरी नाती टिकण्याचे प्राथमिक कारण एकच असेल, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा अधिक विचार करणे.

नात्यामध्ये स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार जास्त करणे खरेच शक्‍य होते काय? हे अंमळ अतिआदर्शवादी किंवा अव्यावहारिक तर होत नाही? असंगाशी संग टाळणे, किमान जेवढ्यास तेवढा ठेवणे इष्ट नव्हे काय? या शक्‍यतेची छाननी निश्‍चितच करायला हवी. आपण समोरच्याला संधी द्यायला हवी. समोरची व्यक्ती नातेसंबंध जोडण्यासाठी अनिष्ट आहे, हे त्याने सिद्ध करावे, आपण शक्‍यतो ते गृहीत धरू नये. अजून एक ध्यानात घेण्याची गोष्ट म्हणजे दोन सारख्या व्यक्तींमध्ये नाते जुळणे सोपे असते असे नव्हे; नाते जुळण्यासाठी सारखेपणापेक्षा अनुरूपता जास्त उपकारक ठरते. अखेर बुद्धी कितीही शिणविली तरी चांगले नातेसंबंध जुळणे हा भाग्ययोग आहे, असे म्हणणे भाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com