रिलॅक्‍स! (ढिंग टांग!)

रिलॅक्‍स! (ढिंग टांग!)

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, श्रावण शुद्ध सप्तमी.
आजचा वार : रिलॅक्‍सवार!
आजचा सुविचार : आज करै सो कल कर
कल करै सो परसों!
इतनी भी क्‍या जल्दी है
जब जीना है बरसों?
(हाहा हाहा हाहा हाहा!!!)
.........................

नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा.) "जो कोणी मला उद्या सकाळी लौकर उठवेल, त्याचा खेळ खल्लास,‘ असे मी काल रात्रीच सगळ्यांना बजावून सांगून ठेवले होते. सबब दुपारी उठलो. नाश्‍ता मागितल्यावर घरच्यांनी ज्या नजरेने माझ्याकडे पाहिले, त्यावरून मला कळले की दुपार झाली आहे!! असो. काहीही असले तरी आजचा दिवस माझा आहे.
 

आता अगदी रिलॅक्‍स राहायचे असे मी ठरवले आहे. नो टेन्शन, नो वरी, नो वर्क! दुपार टळल्यावर आमचे व्यायाम प्रशिक्षक मिकी मेहता हजर झाले. "दंड-बैठका आज काढणार नाही,‘ असे ठामपणाने सांगून दार लावून घेतले. जाव, आज व्यायामसुद्धा करणार नाही!! कारण आजचा दिवस माझा आहे!
 

...गेले कित्येक दिवस मी प्रचंड मेहनत करत होतो आणि हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसते काम, काम आणि काम! इतके काम करणारा (तेही नागपूरचा) मुख्यमंत्री उभ्या महाराष्ट्राने कधी पाहिला होता काय? नाही, नाही, नाही!! त्रिवार नाही! वास्तविक त्या काळात मला तितकेसे बरे वाटत नव्हते. पडसे झाले की राजकारणातला माणूस पार वाया जातो. पडसे झालेल्या अवस्थेत कोणीही भाषणे करून दाखवावीत. आपली पैज आहे!! साधे "झिंदाबाद‘ धड म्हणता येत नाही; पण त्याही अवस्थेत मी नुसती भाषणे म्हटली नाहीत, तर गाणीदेखील म्हटली!!
 

त्याचे असे झाले की आमचे (पुणेकर) बापटमंत्री रा. गिरीशभाऊ तूरडाळवाले ह्यांनी "गटारी‘चे निमंत्रण दिले होते. शेजारीच बंगला आहे..."हा आलोच...‘ असे सांगून चपला पायात सरकवून थेट त्यांच्या घरी गेलो. पाहातो तो काय! तिथे महाराष्ट्राचे धाकले धनी ऊर्फ दादासाहेबांपासून सगळे दिग्गज हजर होते. आमच्या बापटमंत्र्यांनी संधी साधून "मी गाणं म्हणू का?‘ असे विचारायला सुरवात केली. ही विनंती आहे की धमकी, हेच कोणाला कळेना!! शेवटी मीच घसा खाकरून किशोरकुमारची गाणी म्हणायला सुरवात केली. "एक लडकी भीगीभागीसी‘पासून "यारा तेरी यारी‘पर्यंत. सगळ्यांनी जाताना मला आवर्जून "थॅंक्‍यू‘ का म्हटले हे बापटमंत्र्यांना शेवटपर्यंत कळले नाही! असो.
 

गाणीबजावणी, भाषणे, दिल्लीवाऱ्या ह्या धामधुमीतच मी आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेब ह्यांच्या घरी जाऊन (जेवून) आलो. म्हटले, श्रावण लागण्याआधीच "मातोश्री‘वर गेलेले बरे!! गेलो ते बरेच झाले. एका जेवणात दोन पक्षी मारले!! (खुलासा : जेवणात कोंबडी नावाचा पक्षी नव्हता!) एकतर दोस्तीचा इजहार झाला नि दुसरे म्हंजे त्यांचे सेनानी संजयाजी राऊत ह्यांचे अग्रलेख (एकदाचे) थांबले!! संजयाजी राऊत हे कितीही सेनानी असले तरी शेवटी पिंड पत्रकाराचा!! आणि पत्रकार कितीही लढवय्या असला तरी जेवणावळीपुढे शरण जातो, हे एक रोकडे वास्तव आहे. जेवलो आम्ही दोघे, पण थंड पडले ते! पुन्हा असो.
 

तब्बेत बरी नसतानाही मी इतके झपाट्यानं काम कां करतो आहे? हा प्रश्‍न उभ्या महाराष्ट्राला पडला होता. "तब्बेतीला जपा‘ असे सगळ्यांचे सांगून झाले होते; पण तश्‍शात काल रात्री श्रीमान उधोजीसाहेब "वर्षा‘वर जेवायला आले. म्हटले काही हरकत नाही, "या!‘ येताना आपल्या मावळ्यांची शिबंदीही घेऊन आले. सव्वा तास त्यांच्यासोबत घालवला. त्यांच्या घरी आम्ही प्रॉन्स करी खाल्ली होती; पण बैठकीच्या सुरवातीलाच त्यांना श्रावण महिन्याचे महत्त्व सांगून टाकले आणि विषय संपवला!!
 

शेवटी कितीही राजकारण, समाजकारण झाले तरी "तुझी माझी धाव आहे, जेवणाकडून जेवणाकडे!‘ हेच खरे! काही का असेना, एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले. मी आता रिलॅक्‍स झालो आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com