रिओ ऑलिंपिकचा "वायफाय' पसारा

रिओ ऑलिंपिकचा "वायफाय' पसारा

पुढच्या आठवड्यातल्या शुक्रवारी, 5 ऑगस्टला सुरू होणाऱ्या रिओ ऑलिंपिकचे वेध सोशल मीडियालाही लागलेत. स्पर्धा सुरू होण्याआधीच व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर, स्नॅपचॅट, फेसबुकवर रोज लाखोंच्या संख्येने क्रीडारसिक पृथ्वीतलावरील सर्वांत मोठ्या स्पर्धेची चर्चा करताहेत. विचार करा, प्रत्यक्ष स्पर्धा सुरू इनडोअर व आउटडोअर स्टेडियममध्ये विविध खेळांमधील चुरशीचा एकेक क्षण अनुभवणारे 25 हजारांहून अधिक प्रेक्षक छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावरून जगभर पाठवित असतील, तेव्हा जणू खेळासोबतच नवमाध्यमांच्या आतषबाजीची ती दिवाळी असेल. पारंपरिक मुद्रित माध्यमे, टीव्ही, इंटरनेटसोबतच सोशल मीडियाद्वारे जगभर पोचणारे उत्कंठावर्धक क्षण हे रिओ ऑलिंपिकचे खूप वेगळे वैशिष्ट्य असेल. लंडन ऑलिंपिकच्या तुलनेत हे प्रमाण चौपट असेल.

ब्राझीलच्या रूपाने दक्षिण अमेरिकेतील देशात भरवले जाणारे हे पहिले ऑलिंपिक आहे. 37 स्पर्धा स्थळांवर मिळून 17 हजारांहून अधिक खेळाडू पदकांसाठी कौशल्य पणाला लावतील. त्याशिवाय, देशोदेशीचे अधिकारी, अन्य मंडळी आणि अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व इतर हौसे-नवसे-गवसे असे स्थानिकही प्रचंड संख्येने सहभागी असतील. पस्तीस ते पन्नास लाख इतके पर्यटक स्पर्धेच्या निमित्ताने ब्राझीलला भेट देतील. अर्थात त्यांच्याकडील संपर्काची, दळणवळणाची साधने तशाच मोठ्या संख्येने असतील. इंटरनेट व "जीपीआरएस‘ सेवा पुरविणाऱ्या "व्हीवो‘, "ओआय‘, "टीआयएम‘, "क्‍लॅरो‘ वगैरे मोबाईल कंपन्यांच्या अंदाजानुसार 5 ऑगस्ट रोजी माराकाना स्टेडियममध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्यावेळी किमान 70 हजार लोक एका क्षणाला सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ, अन्य माहिती पोस्ट करीत असतील, तर स्पर्धाकाळात एका क्षणाला सोशल मीडियावर पोस्टिंग करणाऱ्यांची संख्या किमान 25 हजार असेल. आठ हजार "वायफाय स्पॉट‘ तयार करण्यात आले आहेत. 3-जी व 4-जी अशा दोन्ही नेटवर्कचा वापर होईल. तथापि, तुलनेने लंडनला 3-जी चा वापर सत्तर टक्‍के होता आणि रिओमध्ये 4-जी चा वापर 70 टक्‍के असेल. याशिवाय, बाराशे फोर-जी रेडिओ बेस स्टेशन्स, त्यापैकी किमान 70 टक्‍के स्टेशन्सना 1.8 गिगा हर्टझ फ्रिक्‍वेन्सी आणि जोडीला जवळपास एक हजार थ्री-जी रेडिओ बेस स्टेशन्स असे थेट प्रक्षेपणाचे जाळे असेल.

या अतिभव्य संपर्क यंत्रणेचा आधार आहे, "ओआय‘ कंपनीचे ब्राझीलमधील तीन लाख तेहेतीस हजार किलोमीटर लांबीचे "ऑप्टीकल फायबर नेटवर्क‘. त्याआधारे देशातील विविध प्रांतांच्या मिळून 27 पैकी 24 राजधानीच्या शहरांना सामावणाऱ्या वेगवेगळ्या तीन "सर्कीट‘द्वारे ओआय तसेच अन्य "सर्व्हिस प्रोव्हायडर‘ कंपन्या दर सेकंदाला 100 जीबी या वेगाने सेवा पुरवतील. दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्येच झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या एकूण 64 सामन्यांना 34 लाख तीस हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, तर एकूण फुटबॉल चाहत्यांची संख्या होती 51 लाख 60 हजार. आता रिओ दि जानेरो शहराच्या नावाने यंदाचे ऑलिंपिक ओळखले जातेय, तिथल्या कोपाकबाना स्टेडियममध्ये झालेल्या सर्व सामन्यांचा आनंद तब्बल 9 लाख 37 हजार 330 प्रेक्षकांनी लुटला. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या चाहत्यांचा विचार करता 1994 मध्ये अमेरिकेत झालेल्या स्पर्धेनंतरचा, त्याचप्रमाणे प्रतिसामना 53 हजार 592 प्रेक्षक हादेखील विक्रम होता. फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी देश असतात अवघे 32 आणि रिओ ऑलिंपिकसाठी आतापर्यंत 106 देशांनी सहभाग निश्‍चित केला आहे.
............................
नायजेरियन खेळाडूंची परवड
खेळाडूंना सुविधा, आर्थिक मदतीबाबत काही अपवाद वगळता जगभर एकसारखीच उदासीनता आहे. नायजेरियाच्या खेळाडूंना तर खर्चासाठी पैशाची सोय करताना सोशल मीडियावर अक्षरश: भीक मागितल्यासारखी याचना करावी लागली. राष्ट्राध्यक्ष महम्मदू बुहारी यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळांडूंना गेल्या मंगळवारी प्रीतिभोजन दिले खरे; पण त्यांच्या खर्चाची सोय करायला विसरले. परिणामी, त्या देशाचा सर्वाधिक वेगवान धावक सेये ओगूनलेवे, 400 मीटरची आफ्रिकन विजेती रेगिना जॉर्ज वगैरे खेळाडूंना मदतीसाठी याचना करावी लागली. रेगिनाच्या "गोफंडमी‘ आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला व दोन दिवसांत चार हजार अमेरिकन डॉलर्स जमा झाले. सेयेसाठीही मदतीचा ओघ सुरू आहे.
जाता जाता - सुशीलकुमार सोबतच्या वादावादीनंतर रिओवारीचे तिकीट मिळालेल्या नरसिंग यादवच्या कारकिर्दीवर मादक पदार्थ सेवनाचा डाग लागलाय. स्वत: नरसिंगने त्याला फसवले गेल्याचा दावा केलाय, तर त्याचे चाहते हळहळत आहेत
.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com