पुराने दाखवले धोक्‍याचे मूळ (अग्रलेख)

Sampadak
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्ती आहेत. त्या कोणी टाळू शकत नाही. अशा आपत्तीच्या काळात अलीकडच्या काळात ज्या प्रकारचे नुकसान होते ते प्रामुख्याने मानवनिर्मित असल्याचे वास्तव खूपच गंभीर आहे. कोल्हापुरात पुरामुळे उडालेला हाहाकार हे त्याचे ताजे उदाहरण आहे. 

 

अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्ती आहेत. त्या कोणी टाळू शकत नाही. अशा आपत्तीच्या काळात अलीकडच्या काळात ज्या प्रकारचे नुकसान होते ते प्रामुख्याने मानवनिर्मित असल्याचे वास्तव खूपच गंभीर आहे. कोल्हापुरात पुरामुळे उडालेला हाहाकार हे त्याचे ताजे उदाहरण आहे. 

 

मॉन्सूनचे आगमन यंदा लांबले, तसे राज्य हवालदिल झाले होते. गतवर्षी महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला दुष्काळ व अवर्षणाच्या झळा सोसाव्या लागल्या. यंदाही जून जवळपास कोरडा गेल्याने चिंतेचे ढग गडद झाले होते. जुलैही कोरडा जाईल की काय, अशी भीती वाटत असतानाच गेल्या चार-पाच दिवसांत वरुणराजाने जोरदार आणि दमदार उपस्थिती लावली. राज्याच्या बहुतांश भागांत कमी-जास्त प्रमाणात का होईना सर्वदूर झालेल्या पावसाने सर्वधारणपणे आशादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र एकीकडे असताना कोल्हापूर परिसरात मात्र पुरामुळे हाहाकार उडाला. अतिवृष्टीने पंचगंगा नदी धोक्‍याच्या पातळीवर पोचली. वारणा व कृष्णा नद्यांना पूर आले. कोल्हापूर जिल्ह्यातील 125 गावांचा संपर्क पुरामुळे तुटला. 84 बंधारे पाण्याखाली गेले. हजारो लोकांचे स्थलांतर करावे लागले. पुराच्या पाण्याचा शहरी भागालाही मोठा तडाखा बसला. मदत व बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) धाव घ्यावी लागली. वास्तविक अतिवृष्टी वा महापूर यांसारख्या आपत्ती कोल्हापूरला नव्या नाहीत. राज्यातील सर्वाधिक पावसाचा तालुका गगनबावडा याच जिल्ह्यात येतो. कोकणला जवळचा भाग असल्याने पावसाचा जोर या जिल्ह्यातील पश्‍चिम भाग नेहमीच अनुभवत असतो. जिल्ह्यातील धरणे भरली नाहीत, असे आजतागायत कधीही झालेले नाही. अशी पार्श्‍वभूमी असली तरी यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच पुराने उडवलेला हाहाकार सावधानतेचा वेगळाच इशारा देऊन गेला आहे. एरवी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ ही धरणे भरल्यानंतर त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे वेगाने होत असते; पण यंदा राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा ही मोठी धरणे भरलेली नसताना व त्यातून पाण्याचा विसर्ग चालू नसताना पूरस्थिती उद्‌भवली ही वस्तुस्थिती खूप काही सांगून जाते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पूरस्थिती कायम राहते, हे कशाचे लक्षण? 

 

अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्ती आहेत. त्या कोणी टाळू तर शकत नाही. अशा आपत्तीच्या काळात अलीकडच्या काळात ज्या प्रकारचे नुकसान होते ते प्रामुख्याने मानवनिर्मित असल्याचे वास्तव खूपच गंभीर आहे. नद्या-नाल्यांच्या पात्रातही मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. पूररेषा किंवा ‘रेड झोन‘ याकडे सर्रास दुर्लक्ष करून केल्या जाणाऱ्या अशा बेकायदा बांधकामांमुळे पुराचे पाणी नागरी वस्तीत वेगाने घुसण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. कोल्हापुरात तेच घडले आहे. शहरानजीक नदीच्या पात्रात बेसुमार बांधकामे झाली आहेत. पूरक्षेत्रात भराव टाकले गेले आहेत. अर्थात हे काही एका रात्रीत घडलेले नाही; पण ते घडत असताना प्रशासन नावाची यंत्रणा निद्रिस्त होती, हे नक्की दिसते. या निद्रिस्ततेमागे मोठे अर्थकारण आहे; पण इतरांच्या जीवावर बेतणारे असे अर्थकारण करणारे बडे लोक, त्यांना मदत करणारे सरकारी अधिकारी यांच्या मुसक्‍या केव्हा तरी आवळायला हव्यात. एरवी संकटाच्या काळात अशा बाबतीत कारवाईच्या वल्गना जरूर होतात; पण या संदर्भातले इशारे ‘बोलाची कढी...‘ असे ठरतात. पूर ओसरला, की इशारेही ओसरतात आणि कारवाईचा तर प्रश्‍नच नाही. पुन्हा पुढच्या पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या...‘. असे कित्येक वर्षे होत राहते. कोल्हापुरातील काही मंडळी आता हा मुद्दा न्यायालयीन पातळीवर नेण्याच्या तयारीत आहेत. हरकत नाही. तिथूनच आता दिलाशाची अपेक्षा. पूरक्षेत्रात बांधकामे हे चित्र अर्थात फक्त कोल्हापूरचेच आहे असे नाही; तर मुंबई, पुण्यापासून विदर्भ-मराठवाडा व कोकणापर्यंत त्याची व्याप्ती आहे. अर्थात, प्रश्‍नाचे स्वरूप वेगळे असेल; पण गंभीरता तीच आहे. 

 

निसर्ग कोपला तर आपण समजू शकतो; पण मानवनिर्मित संकटे टाळण्यासाठी कठोर पावलेच उचलावी लागतील. पाऊसमानाचे चक्र अलीकडच्या काळात अनियमित झाल्याचा अनुभव आहे. त्याची वेगवेगळी कारणमीमांसाही केली जाते. निसर्गाचे संवर्धन तर दूरच; पण त्यावर आक्रमणाची घातक मानवी प्रवृत्ती बळावत चालली आहे. बेसुमार वृक्षतोड, जंगलांमध्येही अतिक्रमण, वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ढासळत चाललेला तोल या साऱ्या बाबी निसर्गचक्राला बाधित करणाऱ्या आहेत. त्याचे गांभीर्य समजून घेऊन सामूहिकरीत्या काही पावले उचलावी लागतील. समाजानेही मानसिकता बदलायला हवी. व्यापक जनजागृतीही करावी लागेल. 

 

कायद्यांची कठोर अंमलबजावणी व वेळप्रसंगी नवे कायदे करूनही काही उपाय करता येतील. नैसर्गिक संकट टाळणे आपल्या हातात नसले तरी त्याला खंबीरपणे सामोरे जाणे हा भाग मात्र महत्त्वाचा आहे. दुष्काळ असो वा पूरस्थिती, संकटाच्या काळात माणसे अगतिक होतात. परिस्थितीचा तो रेटा असतो. पण संकटे ही येतात आणि जातातही. आलेल्या संकटातून त्याचे संधीत रूपांतर करणेही शक्‍य असते. या पावसाळ्यात ते करण्यावर भर देण्याचा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न व्हावा. अजूनही पुढे खूप पाऊस बाकी आहे.