या लुटारूंना आवरा (मर्म)

-
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

मुंबईत ‘गोमाते‘चे दर्शन होणे, हा काहीसा दुर्मिळ योग असला, तरी राज्याच्या या राजधानीत ‘गोरक्षकां‘ची जमात उदयास येणे, ही या महानगरात संधिसाधू लोकांचे पीक कसे फोफावत चालले आहे, याचीच साक्ष आहे. या तथाकथित गोरक्षकांनी गेले काही महिने देशभरात घातलेला धुमाकूळ अणि सुरू केलेला हिंसाचार यापासून काहींनी ‘प्रेरणा‘ घेऊन, त्यातून लूटमारीच्या संधी शोधण्याचे उपक्रमही हाती घेतले आहेत! मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात आणि प्रामुख्याने उच्चभ्रू वस्ती असलेल्या अंधेरीमध्ये शुक्रवारी घडलेली घटना अशाच प्रवृत्तींवर लखलखीत प्रकाश टाकते.

मुंबईत ‘गोमाते‘चे दर्शन होणे, हा काहीसा दुर्मिळ योग असला, तरी राज्याच्या या राजधानीत ‘गोरक्षकां‘ची जमात उदयास येणे, ही या महानगरात संधिसाधू लोकांचे पीक कसे फोफावत चालले आहे, याचीच साक्ष आहे. या तथाकथित गोरक्षकांनी गेले काही महिने देशभरात घातलेला धुमाकूळ अणि सुरू केलेला हिंसाचार यापासून काहींनी ‘प्रेरणा‘ घेऊन, त्यातून लूटमारीच्या संधी शोधण्याचे उपक्रमही हाती घेतले आहेत! मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात आणि प्रामुख्याने उच्चभ्रू वस्ती असलेल्या अंधेरीमध्ये शुक्रवारी घडलेली घटना अशाच प्रवृत्तींवर लखलखीत प्रकाश टाकते. खरे तर या तथाकथित गोरक्षकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक समज दिल्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत, उलट त्याचे लोण मुंबईपर्यंत येऊन पोचलेले दिसते. 

तपकुमार कश्‍यप हा एका रिक्षात बसल्यानंतर त्याच्याजवळची बॅग ही गाईच्या चामड्याची आहे, असे गृहीत धरून, या रिक्षाचालकाने त्यास दमदाटी सुरू केली आणि अंधेरी ‘आरटीओ‘जवळील आपल्या साथीदारांच्या अड्ड्यावर नेले. हा रिक्षाचालक चांगला सुशिक्षित होता, हे त्याने कश्‍यपशी इंग्रजीतून संभाषण सुरू केल्यामुळे स्पष्ट होते. त्यावरून ‘गोरक्षण‘ नावाखाली सुरू झालेल्या या गुंडागर्दीत आता सुशिक्षित तरुणही सामील होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोरक्षणाचा आव आणला, की आपल्याला काही होणार नाही, अशी समजूत पसरत असेल तर ते धोक्‍याचे आहे. इथे फक्त कायद्याचेच राज्य चालते, याची जाणीव करून देऊन राज्य सरकारने अशा समाजकंटकांना वेळीच आवरायला हवे. 

खरे तर मोदी यांनी तथाकथित गोरक्षकांचे कान उपटल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई होणे, अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे पंतप्रधानांचे हे उद्‌गार म्हणजे निव्वळ ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कढी‘ असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे आता कश्‍यपने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन, तो रिक्षाचालक आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर येऊन पडली आहे. पोलिसांचे म्हणणे कश्‍यपने रिक्षाचा क्रमांकही दिलेला नाही, असे आहे. मात्र, अंधेरी ‘आरटीओ‘जवळ दलाल आणि गुंड तरुण काय करत असतात, ते पोलिसांना पूर्ण ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना संबंधित रिक्षाचालकास शोधून काढणे फारसे कठीण नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराचा छडा लावण्यासाठी जातीने प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा, ‘गोरक्षणा‘च्या नावाखाली गुंडगिरी आणि लुटालूट यांचे प्रकार वाढीस लागतील, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळीच ध्यानात घेतलेले बरे.

Web Title: The robbers control