अमेरिकी पल्प फिक्‍शन! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी रशियाने अमेरिकी निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ केल्याचे अनेक पुरावे उघडकीस आले आहेत. अमेरिकी निवडणूक प्रक्रिया किती पोकळ आहे, हेच जगासमोर आणावयाचे पुतिन यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते, असे दिसते.

 

अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धात गुप्तहेरांच्या कारवायांचे जसे पेव फुटले होते, तसेच काहीसे संशयाचे धुके सध्या अमेरिकी जनता अनुभवते आहे. शीतयुद्धाच्या काळातील गुप्तहेरांच्या कारवाया हा अमेरिकी धाटणीच्या "पल्प'कथा-कादंबऱ्यांचा विषय झाला होता. प्रत्यक्षात दोन महासत्तांची ही साठमारी जगासाठी जीवघेणी ठरत होती. 1991 मध्ये सोव्हिएत महासंघाचे विघटन झाले आणि पाठोपाठ 1992मध्ये जर्मनीतील बर्लिन भिंतीचे पाडकाम पुरे झाले. एका खुल्या जगतातला हा शीतयुद्धाचा पूर्णविराम मानला गेला. अवघ्या पंचवीस वर्षांपूर्वीचा हा इतिहास ताजा असतानाच रशियन गुप्तचरांनी अमेरिकेच्या ताज्या अध्यक्षीय निवडणुकीवरच अंकुश ठेवण्याची कामगिरी बजावल्याचे उघड झाल्याने हा शीतयुद्धाचा नवा अध्याय मानावा काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी रशियानेच भरपूर गुप्त कारवाया केल्याचे आता उघड झाले असून विशेष म्हणजे ते उघड केले अमेरिकेच्याच "सीआयए', "एनएसए' आणि "एफबीआय' या गुप्तचर यंत्रणांनी! या तिन्ही गुप्तचर संस्थांनी एकत्रित अहवाल तयार करून खुद्द ट्रम्प यांच्यासमोरच गेल्या आठवड्यात "दूध का दूध, पानी का पानी' केल्याचे वृत्त आहे. "ट्रम्प टॉवर' या ट्रम्प यांच्या निवासस्थानी जाऊन अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या उच्चाधिकाऱ्यांनी संपूर्ण अहवालच त्यांच्यासमोर ठेवला. इतकेच नव्हे, तर त्या प्रदीर्घ अहवालाचा काही अंश प्रसारमाध्यमांसाठीही खुला केला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत: रस घेऊन अमेरिकेची अख्खी निवडणूक "हॅक' आणि "हायजॅक' केली, असा थेट निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन यांच्यात झालेल्या तुंबळ लढतीत अखेर ट्रम्प यांनीच बाजी मारली. ट्रम्प यांचा तोंडाळपणा त्यांना पराभूत करेल, असा अनेकांचा होरा होता; पण तुलनेने प्रगल्भ आणि धोरणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिलरी क्‍लिंटन यांची आघाडी मोडून काढत ट्रम्प, लोकशाही पद्धतीने रीतसर निवडून आले. क्‍लिंटन यांचे पारडे जड असताना, बव्हंशी विचारशील समाजाचा त्यांना पाठिंबा असताना जनमताचा रेटा अचानक ट्रम्प यांच्याकडे कसा सरकला? अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी हे कोडे उलगडले आहे. पुतिन यांनी जातीने अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रस घेतला. ही संपूर्ण प्रक्रिया ताब्यात घेऊन ट्रम्प यांची सरशी होईल, असे सायबरयुद्धातील डावपेच लढवले. व्यावसायिक हॅकर्सची मदत घेऊन क्‍लिंटन आणि त्यांच्या पाठीराख्यांची ई-मेल खाती हॅक केली. अनेक गोष्टी चव्हाट्यावर आणून क्‍लिंटन यांची विश्‍वासार्हताच धोक्‍यात आणली. अमेरिकी मतदारांना "कात्रजचा घाट' दाखवण्याच्या या कामात "विकिलिक्‍स' या पंचमस्तंभी पोलखोल संकेतस्थळाचा मोठा वाटा होता, अशी प्रारंभी चर्चा होती. पण प्रत्यक्षात हे काम रशियन लष्करी गुप्तचर यंत्रणेने (जीआरयू) केल्याचा "सीआयए'चा दावा आहे. रुमेनियातील एक "गुसिफर 2.0' या सायबरनामानिशी कारनामे करणाऱ्या हॅकरला हाताशी धरून रशियाने अमेरिकी निवडणूक प्रक्रियेत प्रच्छन्न ढवळाढवळ केली, याचे अनेक पुरावे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) गोळा केले आहेत.

पुतिन यांच्या विरोधात मध्यंतरी उठलेली विविध आरोपांची राळ जगभर चर्चेचा विषय झाली होती. पुतिन यांनी तब्बल दोन अब्ज डॉलरची माया परदेशी खात्यांमध्ये जमा केली असल्याचे कुप्रसिद्ध "पनामा पेपर्स'मधून फुटले होते. त्या आरोपाला तोंड देता देता पुतिन यांची दमछाक झाली. "पनामा पेपर्स'चे कुभांड हे अमेरिकी गुप्तचर संस्थांनीच रचलेले आहे, असा ठाम आरोप तेव्हा पुतिन यांनी केला होता. त्याचा सूड म्हणून त्यांनी अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचा बोजवारा उडवण्याचे आदेश दिल्याचे बोलले जाते.अमेरिकी निवडणूक प्रक्रिया किती पोकळ आणि उथळ आहे, हेच जगासमोर आणावयाचे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते, असा निष्कर्ष "सीआयए'ने काढला आहे, त्यात सकृद्दर्शनी तरी तथ्य दिसते. ट्रम्प यांच्या निवडीनंतर मॉस्कोमधल्या "क्रेमलिन'मध्ये पुतिन यांच्या कंपूची प्रचंड मोठी मेजवानी पार पडली व तेथे सारे जण एकमेकांचे अभिनंदन करत होते, असेही या गुप्तचर अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकी गुप्तचर अहवाल फेटाळलेला नाही, ही लक्षणीय बाब आहे. "रशियाशी चांगले संबंध नकोत, असे फक्‍त काही मूर्खांनाच वाटू शकते,' अशी मल्लिनाथी त्यांनी "ट्विटर'वर केली आहे. आपल्या कारकिर्दीत रशियाशी संबंध सुधारतील, अशी ग्वाहीच त्यांनी देऊन टाकली आहे. ट्रम्पसाहेबांना पहिल्याच अध्यक्षीय घासाला मिठाचा खडा लागला असला, तरी त्यांच्या चेहऱ्यावरची माशी त्यांनी हलू दिलेली नाही! ट्रम्प अद्याप "व्हाइट हाउस' या अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी राहावयास गेलेले नाहीत. मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांची सामानाची हलवाहलव सध्या सुरू आहे. ट्रम्प यांनी अधिकृतरीत्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण कसे बदलते, याकडे जगातील धोरणकर्त्यांचे लक्ष लागलेले असेल. कारण या दोन महासत्तांमधल्या शीतयुद्धाने अनेक अर्थव्यवस्था चेपल्या गेल्या होत्या, त्यांच्यातील मेतकुटानेही काही अर्थव्यवस्थांना ग्रहण लागू शकते. यामध्ये सर्वांत मोठी झळ पोचू शकेल ती चिनी महासत्तेला... हातोहात खपणाऱ्या अमेरिकन पल्प फिक्‍शनच्या विश्‍वाला पुन्हा बरकत येणार, अशी ही चिन्हे आहेत!