सद्‌गुरूंचा महिमा! (परिमळ)

सद्‌गुरूंचा महिमा! (परिमळ)

गुरू कोणाला म्हणावे? संत तुकाराम म्हणतात, "आपणासारिखे करिती तात्काळ । नाही काळवेळ मग त्यासी ।‘ जो शिष्याला आपल्यासारखे करतो तो "गुरू‘. शिष्य अपूर्णत्वाचे लक्षण, नवखेपण म्हणजे शिष्यत्व. उलट गुरू म्हणजे पूर्णत्व, अनुभवसंपन्नत्व. ज्याला विश्‍वाचे सत्य गवसले तो गुरू. त्याला भारतीय आध्यात्मिक परंपरेत "सद्‌गुरू‘ असे म्हटले जाते. गुरूशिवाय विद्या नाही. जिज्ञासा हा माणसाचा उपजत गुणधर्म आहे. त्यामुळेच ज्ञानासाठी सर्वांचीच धडपड चालू असते. तिची पूर्तता, तृप्ती ज्ञानाने होते. ते ज्ञान ऐहिक वा पारमार्थिक कोणतेही असो. म्हणूनच "नही ज्ञानेन सदृश्‍यं पवित्रमिहं विद्यते।‘ असे म्हटले जाते. ज्ञान देतो तो गुरू. जिज्ञासा हे शिष्यत्व, तर ज्ञान म्हणजे गुरुत्व होय. ईश्‍वर आहे काय, हा प्रश्‍न घेऊन युवक नरेंद्र अनेकांकडे गेला, पण स्वामी रामकृष्णांनीच, "हो आहे, आणि तुझ्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मी त्याला पाहत असतो.‘ असे आश्‍वासक उत्तर दिले आणि त्याचे समाधान केले. अपवादात्मक स्थितीत एखादाच एकलव्य गुरूशिवाय घडतो; पण त्यानेही द्रोणाचार्यांवर श्रद्धा ठेवूनच धनुर्विद्या अवगत केली. 


लौकिक अर्थाने आपल्याला जो शिकवतो, शाळा-कॉलेजात असतो तो शिक्षकही गुरूच असतो; पण तो ऐहिक गुरू असतो. तो आपल्याला जीवन सन्मानाने जगण्यासाठी लागणारी कौशल्ये किंवा उपयुक्त ज्ञान देतो. पण ऐहिक जीवनापलीकडेही एक जग आहे, असा विचार देणारी संबंध मानवी संस्कृती आजही लोकमनाचा ठाव घेऊन आहे. त्याचे भान करून देणारा तो सद्‌गुरू होय. अशा सद्‌गुरूंचे स्मरण म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता होय. बहुतेक सर्वच भारतीय संतांनी ही कृतज्ञता आपल्या वाणीतून व्यक्त केली आहे. संत ज्ञानेश्‍वरांच्या दृष्टीने गुरूंचा महिमा मोठा आहे. ते म्हणतात,
गुरू हा संतकुळीचा राजा । गुरू हा प्राणविसावा माझा ।
गुरुविण देव दुजा । नाही नाही त्रिलोकी ।।
गुरूला त्यांनी देवच म्हटले आहे. संत कबीर एका साखीत म्हणतात, "गुरु गोविंद दोंऊ खडे, काके लागूं पाय। बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताय ।। गुरू आणि ईश्‍वर हे दोन्ही एकदम पुढे आल्यास प्रथम गुरूला वंदन करेन, कारण त्यांनी ईश्‍वर दाखविलेला असतो.
गुरुपौर्णिमा हे गुरूच्या पूर्णत्वाचे प्रतीक आहे. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो. अमावास्या शिष्याच्या अज्ञानाचे, तर चंद्राच्या विविध कला त्याच्या अपूर्णत्वाचे प्रतीक असते; पण त्याच कला हळूहळू पूर्णत्वाला पोचतात. त्याचप्रमाणे शिष्याच्या ठायी येणारे गुरुत्व म्हणजे पूर्णत्व होय. गुरूंनी माणसाला माणूस म्हणूनच नव्हे, तर संतत्वाकडे जाण्यासाठीचा मार्ग दाखविला. "स्व‘ ओळखीचा कार्यक्रम दिला. महाभारतासारखे केवळ अतुल्य महाकाव्य ज्यांच्या प्रतिभेतून साकार झाले आणि श्रीकृष्णासारखा सामान्यांनाही आपला वाटावा असा सर्वांगपरिपूर्ण, व्यवहारनिपुण, जीवनाच्या लढाईत लढण्यास प्रवृत्त करणारा "देव‘ दिला, त्या महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेला भारतीय मनाने केलेला सलाम, वाहिलेली आदरांजली म्हणजेच गुरुपौर्णिमा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com