नानासाहेब परुळेकरांचा सामाजिक विवेक

samrat phadnis
samrat phadnis

‘सकाळ’ची दिशा डॉ. ना. भि. परुळेकर यांनी घालून दिलेल्या ‘सामाजिक विवेका’ची आहे. समाजाला बरोबर घेऊन जात त्याला युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याची आहे... डॉ. परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख.

नवमाध्यमांनी भारतीय जाणिवांचे अवकाश व्यापत आणल्याच्या आजच्या काळात ‘सकाळ’चे संस्थापक- संपादक ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या कार्याचे स्मरण केवळ भाषिक नव्हे; तर भारतीय माध्यमसृष्टीसाठी आवश्‍यक आहे. माध्यमे कशासाठी, त्यांचे स्वातंत्र्य म्हणजे काय, सचोटीने माध्यमांचा व्यवसाय कसा करावा आणि अंतिमतः लोकहितासाठीच माध्यमांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, याचा आदर्श डॉ. परुळेकर यांनी घालून दिला. काळाच्या कसोटीवर टिकतात, समृद्ध होतात, तीच खरी मूल्ये असतात आणि बाकीच्या तत्कालिक तडजोडी असतात. डॉ. परुळेकर यांनी मूल्ये जपली आणि ती काळाच्या कसोटीवर सोन्यासारखी झळाळून सिद्ध झाली, हे आज त्यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्ताने प्रकर्षाने जाणवते.

भोवतालच्या बदलांचे आकलन करून, सामाजिक विवेक वापरून चांगल्या- वाइटाची निवड करणे शाश्वत भविष्यासाठी आवश्‍यक असते. प्रत्येक बदल सकारात्मकच असतो असे नाही आणि प्रत्येक बदलाला विरोध करणेही अयोग्य. बदलांमध्ये समाजाच्या व्यापक भल्याचे काय, हा विचार केंद्रस्थानी हवा. त्यासाठी व्यक्तीच्या विचारांची वाचनातून मशागत झाली पाहिजे. डॉ. परुळेकर यांनी अशी विचारांची मशागत केली. वाचन कसे असले पाहिजे, हे त्यांनी वाचकांना शिकवले. ‘बुद्धीला किंचित घासून न जाता किंवा श्रम न होता मुळमुळ गिळण्याचे जे निव्वळ मौजेचे वाचन ते कनिष्ठ समजले पाहिजे,’ असे त्यांनी ६५ वर्षांपूर्वी लिहून ठेवले. ‘राज्यशकट बरा-बाईट चालणे, हे आता जसे एका व्यक्तीच्या विभूतिमत्त्वावर अवलंबून राहणे शक्‍य नाही, तशी ती कोणा एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होऊ शकत नाही. कारण अखेरपक्षी आणि खऱ्या अर्थाने या राज्यसत्तेचे धनीपण सर्व जनतेचे आहे. त्या धनीपणाची चिंता प्रत्येक नागरिकाने वाहिली पाहिजे, हा लोकशाहीचा मूळ अर्थ आहे,’ अशा शब्दांत त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात उगवलेल्या व्यक्तिपूजेला आणि पर्यायाने जनतेला सुनावले. जग बदलते आहे आणि शिक्षण सरकारी ओझ्यातून अधिकाधिक मोकळे झाले पाहिजे, अशी हाक त्यांनी दिली. ‘अमूक एका विषयाचे इतके ज्ञान परीक्षेच्या वेळी मुलांना असले म्हणजे पुरे, बाकी कोणत्या विषयास किती तास द्यावेत इत्यादी बारीकसारीक निर्बंध न घालता, शिक्षक आणि शाळाचालकांना आपापला कारभार आणि त्यात आवश्‍यक ते बदल करण्याची मुभा दिली, तर कितीतरी कार्य ते करू शकतील,’ असे १९५५ मध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांना सुनावण्याचे धाडस त्यांच्यात होते.

डॉ. परुळेकर यांची ही उदाहरणे अशासाठी दिली, की वाचन, व्यक्तिपूजा आणि शिक्षण व्यवस्था या तिन्हींबाबतचे त्यांचे विचार सामाजिक विवेक सांभाळणारे आणि वाचकांना शाश्वत भविष्याकडे नेणारे होते, हे समजावे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले बदल स्वीकारताना त्यांच्यात भाबडेपणा नव्हता आणि सामाजिक विवेकाचा तोल जाऊ नये, यासाठीची धडपड होती. लोकशाही हा डॉ. परुळेकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय. पाश्‍चात्त्य देशांमध्ये झालेला प्रवास, तेथील बदलांचे बारकाईने केलेले आकलन आणि लोकशाहीसाठी युरोपीय, अमेरिकी देशांमध्ये झालेले लढे-संघर्ष यांचा अभ्यास यामधून डॉ. परुळेकर यांची लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा दृढ होत गेली होती. कदाचित त्यातूनच नागरी संघटनेचा जन्म पुण्यात झाला. लोकशाहीत विचारी माणसांनी पक्ष बाजूला ठेवून लोकांच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे, अशी नागरी संघटनेच्या स्थापनेमागील भावना होती. ‘लोकशाहीचा पुरस्कार चौफेर करीत गेल्याखेरीज सामान्य जनतेपर्यंत ती पोहोचणार नाही, ती न पोहोचेल, तर दादालोक सत्तेच्या निरनिराळ्या थरांत आपली आसने टाकून बसतील आणि लोकशाहीऐवजी स्वार्थी, स्थानिक पुढाऱ्यांची सत्ता त्या ठिकाणी दृढमूल होईल... हा हुकूमशाहीचा भाऊ आहे. यातून सरंजामशाही निर्माण होऊन उद्याच्या हुकूमशाहीशी संगनमत करेल,’ अशी ठाम भूमिका डॉ. परुळेकर यांनी पुण्यात मांडली आणि ‘सकाळ’ने पुरस्कृत केलेल्या नागरी संघटनेमार्फत नगरपालिकेची निवडणूक अनेकांनी लढविली.

सामाजिक विवेक जागृत ठेवणारी मूल्ये जपणे आणि त्यासाठी प्रसंगी एकांडा शिलेदार बनणे हा त्यांचा खाक्‍या होता. भाषावार प्रांतरचनेला त्यांनी कडाडून विरोध केला. भाषावार प्रांतरचनेतून राष्ट्रवाद मागे पडून प्रादेशिकता फोफावेल, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी सातत्याने लेखन केले, नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि आपली भूमिका पटवून सांगितली. तीव्र विरोध सहन केला. तथापि, भाषावार प्रांतरचना राष्ट्रवाद जपू शकत नाही, या भूमिकेपासून ते मागे हटले नाहीत. बहुसंख्याकांना आवडतील, रुचतील अशाच भूमिका घेण्याची माध्यमांना आवश्‍यकता नाही, माध्यमांच्या भूमिका या लोकशाही मूल्ये सदृढ करण्यासाठीच असल्या पाहिजेत, अशी डॉ. परुळेकर यांची शिकवण होती. या भूमिकांना तात्कालिक कसोटीवर संघर्षाला सामारे जावे लागले; मात्र भूमिकांचा गाभा स्वच्छ असल्याने त्या विरोधामुळे गढूळ आणि पातळ होत गेल्या नाहीत.

डॉ. परुळेकर सतत प्रवास करीत. जग उघड्या डोळ्यांनी पाहात. जगातील जे जे उत्तम ते ते ‘सकाळ’मध्ये रुजविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत. प्रवासाबद्दल लेखन करून आपली निरीक्षणे नोंदवीत. छोट्या जाहिरातींच्या रूपाने भारतीय वृत्तपत्रसृष्टीला दिलेले योगदान असो, छपाईचे नवे तंत्रज्ञान असो किंवा भविष्यातील शहराची वाढ ओळखून वृत्तपत्राच्या वितरणासाठी केलेले प्रयोग असोत, डॉ. परुळेकर यांनी सतत काळाच्या पुढे पाहिले. बदल होताना ते सारासार विवेकाने स्वीकारले आणि ‘सकाळ’ केवळ वर्तमानपत्र न ठेवता संस्था बनविली. संस्था टिकावू असतात. त्यांना परंपरा, मूल्ये आणि भविष्याची स्पष्ट जाणीव असते. आजचा ‘सकाळ’ या संस्थेचे विराट रूप आहे. डॉ. परुळेकर आज हयात असते, तर त्यांनी समाजमाध्यमांना (सोशल मीडिया) डोक्‍यावरही घेतले असते आणि जरूर तिथे चार शब्द सुनावलेही असते. जनपत्रकारितेला (सिटिझन जर्नालिझम) समाजमाध्यमांमुळे नवा आयाम मिळाला आहे, हे त्यांनी ओळखले असते. डॉ. परुळेकर यांच्या विचारांचा प्रवाह आजच्या ‘सकाळ’मध्येही तसाच; किंबहुना अधिक ऊर्जेने खळाळतो आहे. म्हणूनच नवमाध्यमांमध्येही ‘सकाळ’ अग्रेसर आहे, जनपत्रकारितेतून शेकडो वाचकांना लिहिते करीत आहे.

डॉ. परुळेकर यांनी स्थापन केलेल्या भाजीपाला समित्या, कीर्तन मंडळे, इंडिया फाउंडेशन आदी उपक्रमांबद्दल सातत्याने चर्चा झाली आहे. या उपक्रमांमागील कार्यकारणभावाकडे लक्ष वेधणे आवश्‍यक वाटते. वर्तमानपत्र माध्यम समाजाला प्रगतीची दिशा देऊ शकते, यावर डॉ. परुळेकर यांचा विश्वास होता. तो त्यांच्या लेखनातून वारंवार व्यक्त झाला आहे. सकाळी घरी येणारे वर्तमानपत्र केवळ माहिती घेऊन येत नाही, तर भोवतालावर प्रकाश टाकते आणि त्यातून समाजाला वस्तुस्थितीची समज येऊन निवडीचे पर्याय निर्माण होतात. निवडीचे पर्याय चांगले आणि वाईट अशा दोन्ही दिशांचे असतात. दिशा कोणती निवडावी, हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न असला, तरी वर्तमानपत्र चांगल्या दिशेसाठी भूमिका घेऊन उभे राहू शकते आणि वाचकाला त्या दिशेनेच जाण्यासाठी प्रोत्साहित करू शकते.

‘सकाळ’ची दिशा डॉ. परुळेकर यांनी घालून दिलेल्या सामाजिक विवेकाची आहे, सामाजिक हिताची आहे. समाजाला बरोबर घेऊन त्याला युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याची आहे. कोणतीही विशिष्ट बाजू न घेताही वृत्तपत्राचा किंवा एकूण माध्यमांचा व्यवसाय चालू शकतो. वारे वाहील, तसे वाहणे सोपे असते. तशी उदाहरणे आसपास आहेतच. मात्र, भूमिका घेणे, दिशा ठरविणे आणि त्यासाठी सर्व ताकदीने पुढे चालत राहणे, यासाठी दम असावा लागतो. वाऱ्यासमोर पाय घट्ट रोवून उभे राहण्यासाठी धमक लागते. तो दम, ती धमक ‘सकाळ’मध्ये आहे. देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हितासाठी आवाज उठविताना ‘सकाळ’ला कधी कुणाचे मिंधेपण वागवावे लागले नाही, हे डॉ. परुळेकर आणि त्यांच्या पश्‍चातही टिकून राहिलेल्या लोकशाहीवादी, सामाजिक विवेकाच्या मूल्यांचे यश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com