आमचं नाव...बाबूराव! (ढिंग टांग!)

आमचं नाव...बाबूराव!  (ढिंग टांग!)
आमचं नाव...बाबूराव! (ढिंग टांग!)

शिक्षणमहर्षी श्रीमान वीर विनोदराव यांसी,
सर्वप्रथम आमची ओळख करून देतो. आमचं नाव बाबूराव. जनलोक आम्हाला फुकटचंबू बाबूराव या लाडक्‍या नावाने ओळखतात. जे जे फुक्‍कट, ते ते उत्तम हे आमचे आयुष्याचे ब्रीद असून फुकटेपणाच्या खडतर वाटेवर प्रवास करत आम्ही आजवर येथे (फुकट) येऊन पोचलो आहो. "सर्वांना सर्वकाळ सारे काही फुकट हवे असते. टोल नको, कर्जफेड नको, ट्याक्‍स नको...' असे चिंत्य उद्‌गार आपण कल्याण येथे काढल्याचे (शेजाऱ्यांकडून आणलेल्या) वर्तमानपत्रात वाचले. बहुत संतोष जाहला. या जगतात आपण एकटे नाही, या भावनेने ऊर भरून आले.

आपण म्हणता ते अगदी खरे आहे. माणसाला सारे काही फुकट हवे असते. काहीही फुकट मिळणार असेल तर मन कसे फुलून येते. फुकटेपणाची ही दीक्षा आम्हाला वारसाहक्‍काने मिळाली. गेल्या दोन पिढ्या आम्ही ज्या चाळीत राहतो, त्या जागेचे भाडेही आम्ही आजवर भरलेले नाही, हे अभिमानाने सांगू. चाळमालक पावती पुस्तक घेऊन आमच्या दारावरून जातो. पण भाडे मागण्याची हिंमत नाही. "तुमच्या गोवऱ्या मसणात गेल्या!' अशी खबर चाळमालकाने दिली असता ""क्‍या बात है! सरण फुकट?'' असे बाणेदार उद्‌गार आमच्या तीर्थरूपांनी वीस वर्षांपूर्वी काढले होते. अर्थात, त्यांचे हे स्वप्न अद्याप अधुरेच राहिले आहे. हवेत ऑक्‍सिजन असतो व तो फुकट उपलब्ध होत असल्यानेच ते अजून "आहेत'!! असो.

टोल भरणे हा निव्वळ खर्चच नव्हे, तर तो अपमानदेखील आहे, हे आपणही कबूल करावे! मोटारवाला जितका बडा व हुद्देदार तितका त्याला टोल माफ असतो, हे सत्य आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठलाही पुढारी व पुढाऱ्यांची माणसे टोल भरणे नैतिक गुन्हा समजतात. महाजनांच्या पंथावर चालावे, ही शिकवण आम्हाला बालपणापासूनच मिळालेली असल्याने आम्हीही टोल भरणे गुन्ह्यासमान मानतो. यात गैर ते काय? ट्याक्‍सचेही तसेच! स्वत:च जमेल तसे कमवावे आणि खावे हे ठीक, परंतु त्यातला काही (म्हंजे बराचसा) भाग सरकारला काढून द्यावा, हा शतप्रतिशत अन्याय आहे. गुदस्ता आमचे बिऱ्हाडी विरजण मागावयास आलेल्या शेजारच्या गोरेकाकूंकडे आमच्या तीर्थरूपांनी "पाच रुपये आकार पडेल' असे सांगून (आंबट चेहऱ्याने) परत पाठवले होते. हल्ली कोण कोणास पदरचे काढून देते? शिवाय हल्लीच्या युगात ट्याक्‍स भरणाऱ्यापेक्षा हुकवणारा अधिक यशस्वी ठरतो, हेदेखील मान्य व्हावे.

सल्ला ही वस्तू सोडता, माणसाला सदासर्वकाळ सारे काही फुकट हवे असते. गेल्याच महिन्यात आम्ही विशिष्ट कंपनीचा गंजिफ्राक आणला. का विचारा? तर त्यावर पायमोजे फ्री होते!! गंजिफ्राक आम्ही त्याच किमतीत दुसऱ्याला विकला, पण मोजे आजही पायात आहेत!! अशा असंख्य फ्री वस्तूंमुळेच आमची आजवरची वाटचाल झाली आहे. ह्या जगात फुकटचे भोजन मिळत नाही, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे, असे आम्ही (फुकट मिळालेल्या) एका गाइडात वाचले होते. (देअर इज नो फ्री लंच..!) पण सांगावयास अभिमान वाटतो, की हा फुकटचंबू बाबूराव या नियमास अपवाद आहे. तथापि, तरीही ही म्हण सत्य आहे. फक्‍त त्यात आम्ही छोटासा बदल करून "ह्या जगात फुकटचे भोजन आणि फुकटचे मत मिळत नाही' अशी नवी म्हण सांगू. सुज्ञास अधिक सांगणे न लगे! कळावे. आपला. फुकटचंबू बाबूराव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com