भय आणि आकर्षण

भय आणि आकर्षण
भय आणि आकर्षण

सरकारी नोकरीमध्ये मूळ पगार, महागाई भत्ता, घरभाडे असे क्रमाने सांगताना मध्ये ‘e. b.’ नावाची एक पायरी येते. याला ‘efficiency bar’ असे म्हणतात. म्हणजे प्रमोशन होण्यापूर्वी हा उमेदवार त्यासाठी लायक आहे किंवा नाही, याची ही कसोटी असते.

साधनामार्गामध्ये प्रगती करीत असताना भय आणि आकर्षण नावाचे दोन अडथळे येतात. हे अडथळे याच क्रमाने येतात. प्रथम भय येते. त्यात भ्याला, अडकला, संपला, पळाला तर साधना तेथेच समाप्त होते. ते पार करून पुढे गेला, तर पुढला अडथळा लोभाचा, मोहाचा, आकर्षणाचा येतो. भयाचा तुटवडा हिमतीने पार करणारे भले भले आकर्षणाच्या जाळ्यात अडकतात. लाकूड पोखरणारा भुंगा कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकतो, अशासारखे होते. त्यांचा ‘विश्‍वामित्र’ होतो. मग पुन्हा नव्या जोमाने सुरवात करावी लागते. या वेळी सावधगिरी वाढलेली असते. मग ती साधना सफळ होते. मनुष्य आपले ईप्सित साध्य करतो आणि साधक परमपदाला पोचतो.
सीतेच्या शोधासाठी समुद्र पार करण्यासाठी महेंद्र पर्वतावरून उडी मारणाऱ्या हनुमंताला प्रथम सुरसा मगर अडवते. त्याच्यासमोर विक्राळ जबडा वासून उभी राहते. ‘तुला खाईन’ म्हणते. तिला न घाबरता, तिच्याशी संघर्ष न करता हनुमंत युक्तीने पुढे निघाला, तेव्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर समुद्रातून मैनाक नावाचा पर्वत बाहेर निघाला. त्याने हनुमंताच्या निष्ठेचे, पराक्रमाचे कौतुक करून त्याला फळे खाण्याची व विश्रांती घेण्याची विनंती केली; पण ‘रामकाज किये बिना, अब मोहे कहाँ विश्राम’ असे म्हणून हनुमंत पुढे निघाला व लंकेला पोचला.

‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात मिल्खासिंग यांची धावपटू होण्यासाठीची साधना दाखवली आहे. थोडी चुणूक दाखवल्यानंतर बहादूरसिंग राणा नावाचा त्यांचा प्रतिस्पर्धी आपल्या मित्रासंह हॉकीस्टिक घेऊन त्यांच्यावर हल्ला करतो. खिळे लावलेल्या बुटांनी अक्षरशः तुडवतो. जखमी मिल्खासिंग तसेच पट्टी बांधून जिद्दीने धावतात व पहिला अडथळा पार करतात. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये मॅचसाठी गेले असताना, तेथील एका गोऱ्या तरुणीच्या जाळ्यात अडकतात. तिच्या संगे रंग उधळतात, रात्री बियर पितात, सकाळी उशिरा प्रॅक्‍टिसला पोचतात. मग मॅच हरतात.
यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आरशात पाहून निर्दयपणे स्वतःच्या गालावर फाडफाड मारून घेतात आणि पुन्हा असे न अडकण्याचा निर्धार करतात. तसा प्रसंग पुन्हा येतो. स्विमिंग पुलामध्ये एक भारतीय जलतरणपटू त्यांच्याकडे आकर्षित होते. तिला निर्धाराने दूर करताना मिल्खासिंग म्हणतात ‘‘सॉरी जी! मुझे माफ कर देना.. मैं आप की इन्सल्ट नही कर रहाँ हुॅ... ये मेरी खुद से लडाई है...’’

भय आणि आकर्षण हे दोन अडथळे प्रत्येकाला पार पाडावेच लागतात. हे दोन ‘e. b.’ पार केल्यानंतरच प्रमोशन मिळते. साधकांची योग्यता वाढविण्यासाठी त्यांची  योजना असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com