आखातावर सूडचक्राचे सावट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सौदी अरेबियाच्या पुढाकारातून बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त इत्यादी देशांनी कतारबरोबरील सर्व संबंध तोडल्यामुळे अरब जगतातील तणाव शिगेला पोचला असतानाच, या घटनेला काही प्रमाणात निमित्त ठरलेल्या इराणच्या संसदेवर आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही.

सौदी अरेबियाच्या पुढाकारातून बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त इत्यादी देशांनी कतारबरोबरील सर्व संबंध तोडल्यामुळे अरब जगतातील तणाव शिगेला पोचला असतानाच, या घटनेला काही प्रमाणात निमित्त ठरलेल्या इराणच्या संसदेवर आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही.

अधिवेशन सुरू असताना इराणच्या संसदेवर आणि त्या देशाचे क्रांतिकारी नेते आयातुल्ला खोमेनी यांच्या स्मारकावर अत्यंत नियोजनपूर्वक झालेल्या हल्ल्यांमुळे आखातात संघर्षाचा भडका उडण्याचा धोका आहे. कतार दहशतवादाला फूस लावत असल्याचा आरोप सौदी अरेबिया व अन्य देशांनी केला होता; पण त्यांना त्याचबरोबर कतारची इराणशी वाढती जवळीक खुपत होती. म्हणूनच कतारची कोंडी करण्याचे पाऊल त्यांनी उचलले. त्यापाठोपाठ दोनच दिवसांत इराणमध्ये हल्ले झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सौदी अरेबियाला दिलेल्या भेटीत दहशतवादाच्या मुद्यावरून इराणवर टीकास्त्र सोडले होते, त्याचाही संदर्भ ताज्या हल्ल्याला असू शकतो. हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली असली तरी त्याला सौदी अरेबियाचीच फूस आहे, असा आरोप झाला आहे. ट्रम्प यांच्या भेटीनंतर आठवडाभरातच हा हल्ला झाला यावर इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने बोट ठेवले आहे आणि हल्ल्याचा सूड घेण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे आखातात सूडचक्र सुरू होण्याची भीती आहे. 
सीरिया आणि इराकमधील संघर्षात इराणने ‘इसिस’विरोधात सीरियाच्या अध्यक्षांना आणि इराकमध्ये अन्य बंडखोरांना पाठबळ दिले आहे. त्यातून इराणला धडा शिकविण्याची धमकी ‘इसिस’ने दिल्याने इराणमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली होती. परिणामी, या हल्ल्यांत मोठी प्राणहानी झाली नाही आणि चारही दहशतवाद्यांचा खातमा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. गेल्याच महिन्यात इराणमधील अध्यक्षीय निवडणुकीत सुधारणावादी नेते हसन रुहानी हे कट्टरपंथीय उमेदवाराचा पराभव करून दुसऱ्यांदा निवडून आले. रुहानींवर नाराज असलेले कट्टरपंथीय नेते दहशतवादी हल्ल्यांमुळे संतप्त झाले आहेत. ते रुहानींची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. त्यातून रुहानी आणि कट्टरपंथीय यांच्यातील तणाव वाढू शकतो. तेव्हा त्यांना देशांतर्गत विरोधकांशी सामना करतानाच  एकीकडे ‘इसिस’ आणि दुसरीकडे सौदी अरेबिया व अन्य सुन्नी देशांशीही दोन हात करायची तयारी ठेवावी लागेल. या संघर्षाला तोंड फुटल्यास आखातातील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होत जाईल आणि त्याच्या झळा आखातापुरत्याच मर्यादित नक्कीच राहणार नाहीत.