आधुनिक 'मोरोपंतां'ची नवी केकावली! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे 'ब्रह्मचर्य' आणि त्याच्या प्रजननाबाबत राजस्थान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावरून त्यांच्या 'दिव्य दृष्टी'ची कल्पना येते.

मोरोपंत रामचंद्र पराडकर ऊर्फ 'मोरोपंत' हे अठराव्या शतकातील ख्यातकीर्त कवी! त्यांचे 'केकावली' हे काव्य प्रसिद्ध आहे. मात्र, एकविसाव्या शतकात आता आणखी एक 'मोरोपंत' उदयास आले असून, त्यांनी नवी 'केकावली' रचली आहे! राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांनी आपल्या निवृत्तीच्या दिवशी भर न्यायालयात ही 'केकावली' रचली आणि त्यातील अद्‌भुत अशा प्रतिपादनामुळे त्यांना 'मोरोपंत' ही पदवी कोणीही बहाल करेल! या आधुनिक 'मोरोपंतां'चे म्हणणे असे की, आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा आजन्म 'ब्रह्मचारी' असतो! ते खरे धरायचे तर मग आजच्या काळात आपल्याला मोर बघायलाच मिळाले नसते. मोर हा 'ब्रह्मचारी' असेल, तर त्याचे आजच्या काळात दर्शनही व्हायला नको. मात्र, हे आधुनिक 'मोरोपंत' हुशार आहेत आणि त्यामुळेच त्यांनी मोराचे प्रजनन मिलनाशिवाय कसे होते, याबाबत नवाच सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती राहते आणि मयूरांच्या पिढ्या पुढे वाढत राहतात!

आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद भूषवणाऱ्या या महोदयांचे या चित्तचक्षूचमत्कारी आणि लोकोत्तर अशा सिद्धांताबद्दल खरे तर सर्वांनी अभिनंदन करायला हवे होते आणि नोबेल पुरस्कार पटकावणाऱ्या भारतीयांपेक्षा अद्‌भुत असा हा शोध लावल्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळावा, अशी मागणी करायला हवी होती. अवघे आयुष्य पक्ष्यांच्या अभ्यासात घालवलेल्या सालीम अलींना जे उमजले नाही, ते या आधुनिक 'मोरोपंतां'च्या दिव्य दृष्टीला दिसले आहे. प्रत्यक्षात हातातल्या स्मार्टफोनमधील 'सोशल मीडिया'चा वापर करून हवी ती मुक्‍ताफळे उधळणाऱ्या 'समाजबांधवां'नी मात्र या महोदयांची यथेच्छ टवाळीच केली! खरे तर त्याबद्दल न्यायसंस्थेने अशा समाजकंटकांना कठोरातील कठोर सजाच सुनवायला हवी! इतकी टवाळी होऊनही शर्माजी आपल्या प्रतिपादनावर ठाम राहिले आणि एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुराणाचे दाखले देऊन आपल्या या अद्‌भुत शोधाचे ठाम समर्थन केले.

'प्रत्यक्ष 'ब्रह्मपुराणा'त मोर हा ब्रह्मचारी असल्याचा उल्लेख असताना, तुम्ही त्यासंबंधात शंका घेताच कशी,' असा न्या. शर्मा यांचा बिनतोड सवाल होता. 'ब्रह्मपुराणात तसा उल्लेख असला तरी, कोणत्याही विज्ञानविषयक नियतकालिकात वा पक्षीशास्त्रात असा उल्लेख नाही,' या प्रश्‍नकर्त्याच्या सवालावर या आधुनिक 'मोरोपंतां'चे म्हणणे आहे : ब्रह्मपुराण वा अन्य कोणतेही पुराण हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि विज्ञान हे त्यानंतर येते! आता त्यानंतरही कोणी त्यांच्या या विधानाबाबत शंका घेत असतील, तर घेऊ देत बापडे! अज्ञजनांना ते आणखी समजवणार तरी कसे? ही आधुनिक 'केकावली' रचतानाच न्या. शर्मा यांनी मोराला आपल्या देशाने बहाल केलेला 'राष्ट्रीय पक्षी' हा किताब रद्दबातल ठरवून गाय हाच राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करावा, असाही निकाल देऊन टाकला आहे! अज्ञजन त्यावरूनही त्यांची टिंगलटवाळी करत आहेतच. मात्र, मोराच्या ब्रह्मचर्याबाबत ठाम असलेले हे न्यायमूर्तीमहोदय त्याबाबत तितकेसे आग्रही नाहीत. हा आपला निर्णय नसून, ती केवळ शिफारस आहे, असे आता ते सांगत आहेत.

खरे तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या राष्ट्रपतिपदाच्या काळात भारताला 2020 मध्ये महासत्ता बनवण्याचे स्वप्न देशाला दाखवले होते. न्या. शर्मा यांचे हे सारे प्रतिपादन हे त्याच स्वप्नाचा एक भाग आहे, असे मानून त्यांना आपल्या देशातील 'आधुनिक विज्ञानशास्त्री' हा किताब द्यायला हरकत नसावी. तसेच गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणूनही जाहीर करण्याचा निर्णय मोदी सरकारने तातडीने घेऊन टाकावा. त्याचे कारण म्हणजे न्यायसंस्थेने दिलेला आदेश हा अंतिम असतो. काही बिच्चारे लोक मात्र न्यायदेवता आंधळी असते, असे मानतात! त्यामुळे लोकांनी काहीही तारे तोडले तरी आपल्याला मात्र मोर हा ब्रह्मचारीच असतो, हे आता मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही, हेच खरे!