उडाले चरावया पक्षी! (अग्रलेख)

उडाले चरावया पक्षी! (अग्रलेख)
तत्त्वशून्य राजकारणाची जणू स्पर्धाच सुरू झाली असून, पूर्वी कॉंग्रेस पक्ष जे करीत होता, त्याचे दाखले देत त्याच मार्गाने जर भाजप जाऊ पाहत असेल तर वेगळेपणा तो काय राहिला?

उत्तर प्रदेशनंतर आता येनकेनप्रकारेण बिहारमध्येही भारतीय जनता पक्षाचा उदय झाल्यानंतर, सूर्योदय होताच घरट्यातील पक्षी दाणा-पाणी शोधण्यासाठी भुर्रकन उडून जातात, त्या धर्तीवर कॉंग्रेस तसेच अन्य काही पक्षांचे आमदार उडून जाऊ लागले आहेत! याची सुरवात अर्थातच गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून अलीकडेच केली होती. मात्र, हे पक्षी चरावयास उडून जाणे आणि त्याच वेळी गुजरात विधानसभेतून राज्यसभेसाठी सदस्य पाठवण्याची निवडणूक येणे, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. त्यातच या वेळी भाजपने आपले पक्षाध्यक्ष, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उजवे हात म्हणून ख्यातकीर्त असलेले अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे! त्याशिवाय कॉंग्रेसच्या गोटात हलकल्लोळ उडवून देण्यासाठी आणखी एक जादा उमेदवार उभा करण्याचे ठरविले आहे. हा उमेदवार दुसरा-तिसरा कोणी नसून आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या गोटात गेलेल्या कॉंग्रेसच्या तीन आमदारांपैकी एक, बलवंतसिंग राजपूत आहे आणि हे राजपूत महाशय वाघेला यांचे जवळचे रिश्‍तेदारच आहेत! बिहारमध्ये सत्ताग्रहणासाठी घडवून आणलेल्या विलक्षण नाट्यानंतर आता गुजराती रंगभूमीवरच्या या नाटकाची संहिताही अमित शहा आणि वाघेला यांनी संयुक्‍तपणे लिहिलेली दिसते. त्यामुळेच हवालदिल झालेल्या कॉंग्रेसला आपल्या हाती असलेल्या उर्वरित 40 आमदारांचा कळप बंगळुरूजवळच्या एका आलिशान "रिझॉर्ट'मध्ये पाठवणे भाग तर पडलेच; शिवाय, ही आमदारांची कथित "पळवापळव' थांबवण्यासाठी थेट निवडणूक आयोगालाही त्यांनी साकडे घातले. आता आयोगाने या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले असले, तरी त्यातून फार काही निष्पन्न होण्याची शक्‍यता अशा प्रकरणांतील पूर्वानुभव बघता दिसत नाही.

एकीकडे कॉंग्रेसच्या गुजरातेतील घरट्यातून पक्षी उडून जात असतानाच, तिकडे उत्तर प्रदेशात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या एका तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनीही राजीनामे देऊन, भाजपच्या कूटनीतीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. मायावती आणि अखिलेश या दोघांनीही आपल्या आमदारांची "शिकार' करण्यात आल्याचा आरोप भाजपवर केला आहे. मात्र, कॉंग्रेसचे खरे दुखणे वेगळेच आहे. गुजरातेतील आमदारांनी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे सोनिया गांधी यांचे प्रदीर्घ काळापासूनचे सल्लागार अहमद पटेल आता पुन्हा राज्यसभेत परतणे कठीण झाले आहे. ही अशी जहरी जखम हे आमदार न करते तर बहुधा सुस्तावलेल्या कॉंग्रेसला जाग येणे कठीणच होते. एकीकडे भाजपचे हे विरोधी आमदार आपल्या गळाला लावण्याच्या सुरू असलेल्या डावपेचांमुळे तोंडावर येऊन ठेपलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल तर लागल्यातच जमा आहे. आता कोणे एकेकाळी भाजपने क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि पटेल यांना एकत्रित करून जमवलेल्या "खाप' समीकरणाच्या जोरावर 148 जागा जिंकून केलेल्या विक्रमाला यंदा ओलांडले जाते काय, हाच प्रश्‍न आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कॉंग्रेस काय रणनीती आखणार हा प्रश्‍न आहे. मुळात वाघेला यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता तो राहुल यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच! गुजरातचे कॉंग्रेसचे प्रभारी गुरुदास कामत हे वाघेला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन दिल्लीस आले असता, राहुल यांनी त्यांची साधी भेट घेण्यासही नकार दिल्यामुळे अपमानित झालेल्या वाघेला यांनी हे टोकाचे पाऊल तर उचलले. शिवाय, त्यामुळेच कामत यांनीही प्रभारीपद सोडले. खरे तर हार्दिक पटेल यांनी उभे केलेले आंदोलन, गोवंशमांस प्रकरणावरून उना येथे दलितांना झालेली अमानुष मारहाण आदी बाबींमुळे गुजरातेत भाजपविरोधी वातावरण तयार होत असतानाही राहुल गांधी आपली कार्यपद्धती बदलायला तयार नाहीत. त्याचाच हा फटका आहे.

या पार्श्‍वभूमीवर "कॉंग्रेस आमदारांना धमक्‍या देऊन पक्ष सोडण्यास भाजप भाग पाडत आहे,' या कामत यांच्यानंतर गुजरातचे प्रभारीपद सांभाळणारे कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्या आरोपाचा विचार करायला लागेल. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासारख्या विरोधी ऐक्‍याचा चेहरा असलेल्या बड्या नेत्यास आपल्या गोटात खेचण्याची रणनीती भाजपने प्रदीर्घ काळापासून आखली होती आणि त्यात यश मिळाल्याने आता मोदी-शहा या जोडगोळीच्या अंगी 12 हत्तींचे बळ आले आहे. त्यामुळे जमेल तेथून आणि शक्‍य असेल त्या सर्व मार्गांचा वापर करून विरोधी पक्षाचे नेते तसेच आमदार फोडण्याचे काम सुरू झालेले दिसते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पावन करून घेऊन त्यांना थेट "वाल्मीकी' बनवण्यात आले होते. हे राजकारण नव्हे आणि "पार्टी वुईथ डिफरन्स'च्या गप्पा मारणाऱ्या पक्षाला तर ते बिलकूलच शोभणारे नाही. मात्र, टीव्हीवरील भाजपचे बोलके पोपट याचे समर्थन कॉंग्रेसनेही असेच केल्याचे दाखले देऊन करत आहेत! मात्र, याच वर्तनाचा कॉंग्रेसला अखेरीस जबर फटका बसला होता. निवडणुका न जिंकताही निव्वळ कूटनीतीच्या जोरावर सरकारे बनवता येत असतील, तर मग आणखी काय हवे? अर्थात, कॉंग्रेस असो की बसपा वा सपा, त्यांनाही आपली घरटी सांभाळता येत नसतील, तर मग दोष तरी कुणी आणि कुणाला द्यायचा? तूर्तास, तरी पक्षी चरावया निघाले, हेच खरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com