तरुण संशोधकांची झेप (नाममुद्रा)

Sambhaji gandmale writes about young scientist
Sambhaji gandmale writes about young scientist

चांद्रयानाबरोबर पाठवता येईल, अशा उपकरणाच्या निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या "लॅब-टू-मून' या स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे आणि मुंबईचा एक अशा तिघांची "टीम ईयर्स' चमकली. एक्‍स प्राइड फाउंडेशन व "गुगल'च्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी कोल्हापूरचे अनिकेत कामत, ऐश्वर्या मुंगळे आणि मुंबईचा सौमिल वैद्य यांनी तयार केलेले "इलेक्‍ट्रोस्टॅटिक ऍक्‍टिव्ह रेडिएशन शिल्ड' हे उपकरण निवडले गेले आहे. 
अनिकेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. ऐश्‍वर्या भौतिकशास्त्रात पदवी घेऊन सध्या गोव्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे; तर सौमिल हा कोल्हापूरच्या "केआयटी'मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन सध्या मुंबईत शासकीय सेवेत कार्यरत आहे. त्यानेच या प्रकल्पाचे नेतृत्व केले. जेव्हा एखादा अंतराळवीर पृथ्वीबाहेर जातो तेव्हा तेथे असलेल्या घातक व अतिउच्च तीव्रतेच्या वैश्विक किरणांमुळे त्याला गंभीर इजा होऊ शकते. पृथ्वीबाहेरील घातक वैश्विक किरणांपासून (रेडिएशन) संरक्षण मिळवता येईल का, यावर अभ्यास करणे हा "टीम ईयर्स'च्या प्रयोगाचा हेतू आहे. या तिघांनी उपकरण तयार करण्याचे ठरवले; मात्र त्यांच्यापुढे खरे आव्हान होते ते समन्वयाचे. कारण एक जण कोल्हापुरात, एक गोव्यात आणि एक मुंबईत. अखेर सर्व प्रयोग व त्याची तयारी कोल्हापुरात करण्याचा निर्णय झाला. कोल्हापुरात हे प्रयोग तपासून पाहण्याची व्यवस्था नसल्याने अनिकेत प्रत्येक आठवड्यास केलेले उपकरण गोव्याला पाठवत असे, ऐश्वर्या तो प्रयोग तिच्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासून त्यातील सुधारणांबाबत लिहून अनिकेतला पुन्हा पाठवत असे. असे अनेकदा करावे लागले. अत्यंत चिकाटीने हे काम सुरू होते. अखेर त्याला यश आले. 
"गुगल लुनार एक्‍स प्राइझ' स्पर्धेत जगभरातून पंचवीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला. चंद्रावर रोव्हर (चांद्रबग्गी) नेऊन ती चंद्रावर यशस्वीरीत्या पाचशे मीटर चालवणे आणि त्यावरील कॅमेऱ्याच्या माध्यमातून उच्च प्रतीची छायाचित्रे काढून ती पृथ्वीवर मिळवणे, हे आव्हान जी संस्था यशस्वीरीत्या पेलेल, तिला "गुगल'कडून दोन कोटी अमेरिकी डॉलरचे (अंदाजे 134 कोटी रुपये) बक्षीस आहे. या मुख्य स्पर्धेसाठी "टीम इंडस' प्रयत्नशील असून त्याच उपक्रमांतर्गत त्यांनी टीम ईयर्सचे हे उपकरण निवडले आहे. त्याच्या यशासाठीचा पुढील प्रवास आर्थिकदृष्ट्या खडतर आहे, तरीही "त्यावरही नक्कीच मात करू' असा आत्मविश्‍वास तिघांकडे आहे, हे उल्लेखनीय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com