महाविजयाचा महाव्यवस्थापक (नाममुद्रा)

sunil bansal
sunil bansal

जातिधर्माचे उत्तुंग किल्ले अन्‌ त्यांच्या समतोलात दडलेल्या सत्तेच्या चावीभोवती निवडणुका फिरत राहणाऱ्या उत्तर प्रदेशात यंदाही सपा-कॉंग्रेस आघाडी, बसप अन्‌ सगळ्याच पक्षांनी डाव टाकले. मात्र, ते सगळे विस्कटून भाजपने सव्वातीनशे जागांसह अभूतपूर्व विजय संपादित केला. देशाच्या राजकारणाचा नूर बदलणारा अन्‌ अगदी सगळ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांना खोटे ठरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील महाविजयाचे श्रेय जाते पडद्यामागचे नायक सुनील बन्सल यांना. प्रशांत किशोर या बहुचर्चित रणनीतीकाराला पर्याय कोण, याचे उत्तर भाजपने बन्सल यांच्यारूपाने दिले आहे. 
भाजपच्या लखनौ कार्यालयातील "वॉररूम'मधून त्यांनी निवडणुकीची सगळी सूत्रे हलवली. तसा हा त्यांचा उत्तर प्रदेशातील दुसरा अनुभव. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा व केंद्रातील सत्तेची चावी या हिंदी पट्ट्यातील अन्‌ देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील 71 जागांमुळेच भाजपला शक्‍य झाली होती. अमित शहा यांनी तिथे सहा महिने तळ ठोकला होता. तेव्हा मदतीला हेच बन्सल होते. शहा यांनी त्यांचे निवडणुकीचे व्यवस्थापन कौशल्य हेरले होते. यंदा मुलायमसिंह व अखिलेश या यादव पिता-पुत्रांमधील वाद माध्यमांच्या केंद्रस्थानी होता. वाहिन्यांचे बहुतांश फुटेज त्यावर खर्च होत असल्याने पूर्वार्धात भाजप बचावात्मक "मोड'मध्ये असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहा यांना बन्सल आठवले. जयपूरहून बन्सल यांनी थेट लखनौ गाठले अन्‌ सूत्रे हाती घेतली. 
"अभाविप'चे सचिव म्हणून कारकीर्दीला प्रारंभ करणारे बन्सल सध्या भाजपचे संघटन सचिव आहेत. त्यांच्या धोरणांवर प्रारंभी पक्षातील एक मोठा गट नाराज होता. हेकेखोर, उद्धट अशी टीका त्यांच्यावर झाली. मात्र, पक्षाध्यक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सतत खणखणणारा व पॉवर बॅंकेला जोडलेला मोबाईल, विविध वाहिन्यांवर लक्ष ठेवून प्रचाराची दिशा, प्रवक्‍त्याच्या प्रतिक्रिया ठरवणे, आयपॅडवरून सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय राहणे आणि अपडेट्‌स व अभ्यासातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच अन्य नेत्यांच्या सभांचे नियोजन करणे, सभेतील भाषणांना मुद्दे पुरवणे, ही कामे करणारा हा पडद्यामागचा "इलेक्‍शन मॅनेजर' भाजपसाठी 2019 च्या निवडणुकीत काय कमाल करतो, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com