अखेर गच्छंती! (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत जे काही घोळ घातले, त्यात प्र-कुलगुरूंची नियुक्‍ती न करणे, हा एक महत्त्वाचा विषय होता. हे पद जुलै 2015 पासून रिकामे होते. त्या पदावर पटेल यांची झालेली नियुक्‍ती ही अनेक अर्थाने महत्त्वाची आहे

मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या निकालांचा पुरता घोळ घालून झाल्यावर अखेर कुलगुरू संजय देशमुख रजेवर गेले आहेत. खरे तर हे विधान चुकीचेच असून, त्याची दुरुस्ती "देशमुख यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे,' अशीच करायला हवी. कुलपती आणि राज्यपाल विद्यासागर राव यांनी ज्या तातडीने देशमुख यांच्या कार्याचा अतिरिक्‍त भार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे सोपवला आणि त्याचवेळी "व्हीजेटीआय'चे संचालक धीरेन पटेल यांची प्र-कुलगुरू म्हणून हंगामी नियुक्‍ती केली, ते बघता देशमुख यांच्या हकालपट्टीच्या दिशेने उचललेलीच ही पावले आहेत, हे स्पष्ट आहे.

देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत जे काही घोळ घातले, त्यात प्र-कुलगुरूंची नियुक्‍ती न करणे, हा एक महत्त्वाचा विषय होता. हे पद जुलै 2015 पासून रिकामे होते. त्या पदावर पटेल यांची झालेली नियुक्‍ती ही अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षा आणि संगणकविषयक अभ्यास या विषयातील पटेल हे तज्ज्ञ आहेत आणि त्यांना नेमताना नेमक्‍या याच बाबीचा विचार झालेला दिसतो. यंदा विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे "ऑनलाइन' मूल्यांकन करण्याचा धाडसी निर्णय कोणत्याही पूर्वतयारीविना देशमुख यांनी घेतला. त्यामुळे जवळपास अर्धा ऑगस्ट उलटून गेला तरी हजारो विद्यार्थी अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आता आपल्या संगणकविषयक ज्ञानाचा वापर करून पटेल उर्वरित निकाल तातडीने आणि कोणत्याही चुकाविना लावण्याला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा आहे.
मुंबई विद्यापीठाच्या काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले, त्यातही मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी गेला महिनाभर गाजत आहेत. दस्तुरखुद्द कुलपतींनी निकालाला होणाऱ्या अक्षम्य विलंबाची दखल घेऊन देशमुख यांना निकालांसाठी 31 जुलै ही मुदत दिली होती. ती पाळली जाणे अशक्‍यच होते. त्यानंतर कुलपतींनी ती मुदत पाच दिवसांनी वाढवणे, हे खरे तर हास्यास्पदच होते. माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुलपतींना लिहिलेल्या खुल्या पत्रात यासंबंधातील अनेक विसंगती ठळकपणे दाखविल्या होत्या. त्यानंतर अखेर देशमुख यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्याचे पाऊल उचलले गेले आहे. मात्र, त्यालाही नको इतका विलंब झाला आहे. त्यामुळे आता शिंदे व पटेल यांच्याकडे हंगामी तत्त्वावर मुंबईसारख्या सुप्रतिष्ठित विद्यापीठाचा कारभार सोपवण्याऐवजी या विद्यापीठात कर्तबगार आणि व्यासंगी कुलगुरू तातडीने नेमायला हवा.

Web Title: sanjay deshmukh mumbai university