प्रेरणादायी जिद्द (नाममुद्रा)

Bhagyashree nazire
Bhagyashree nazire

जयपूरच्या कडक उन्हात सुरू असलेल्या राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील महिलांच्या गोळाफेकीचा निकाल हा एक सुखद धक्का होता. महाराष्ट्राच्या भाग्यश्री माझिरे हिने त्यात सुवर्णपदक पटकावले. पॅराऑलिंपिकमधील रौप्यपदकविजेत्या दीपा मलिकच्या रिओतील कामगिरीपेक्षा सरस कामगिरी तिने नोंदविली. या विजयानंतर तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला, तेव्हा तिने काढलेले उद्‌गार प्रेरणादायी होते. जिद्दी वृत्ती माणसाला कशी पुढे नेते, याचेच ते उदाहरण. "रिओतील संधी हुकली खरी; पण त्याच वेळी अधिक सरस कामगिरी करण्याचा निर्धार केला. गेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदके होती. आता दोन सुवर्ण जिंकली आहेत, तिसरेही मिळवणार याची खात्री आहे', भाग्यश्री सांगत होती. 
पॅरालिसिस झाल्याने भाग्यश्रीचे पाय कमजोर झाले आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिला व्हीलचेअरवरून स्टुलावर ठेवावे लागते. पण कधीही नशिबाला दोष देत न बसता ती नेहमी पुढे काय करायचे, यावर लक्ष केंद्रित करते. लहानपणी तिच्या पाठीला मोठा फोड झाला होता. तो वाढत गेला. त्याच्यावर उपचार करताना पॅरालिसिस झाला. उपचारासाठी घरच्यांपासून दूर जावे लागले. ती मूळची पुण्याची. तेथून कोल्हापूरच्या डॉ. नसीमा हुरजूक यांच्या संस्थेत दाखल झाली. आता करवीरची झाली आहे. शिक्षणही येथे, आणि नियमित सरावही. 
डॉ. नसीमा हुरजूक यांच्यामुळे भाग्यश्रीला मैदानात पराक्रम गाजविण्याची प्रेरणा मिळाली. त्याही राष्ट्रीय खेळाडूच आहेत. ""त्यांनीच आम्हाला मैदानावर नेले, तिथे खेळ दाखवून कोणाला काय खेळायचे, हे विचारले. मला ऍथलेटिक्‍समधील या थ्रो इव्हेंट आवडल्या. मग काय थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेकीच्या स्पर्धेचा सराव सुरू झाला. गोळाफेकीत शनिवारी गोल्ड जिंकले, भालाफेकीत रविवारी जिंकले, आता सोमवारी थाळीफेक आहे,'' असे सांगतानाच तिसऱ्या सुवर्णपदकाची तयारी असल्याचाच आत्मविश्वास तिच्या बोलण्यातून जाणवतो. 
भाग्यश्रीची स्पर्धा खरे तर हुकणार होती, याचे कारण तिची परीक्षा होती; सुदैवाने स्पर्धा लांबणीवर पडली आणि तिला भाग घेता आला. दिव्यांग नसलेल्या खेळाडूंची स्पर्धा असेल, तर परीक्षा नंतर द्यायची सवलत मिळते, मग भाग्यश्रीसारख्या गुणवान खेळाडूंना ती सवलत का नाही? परीक्षा संपताच विमानाने जयपूरला आणि जेमेतेम सव्वा-दीड तासात ती स्पर्धेसाठी उतरली. तरीही मोठे यश मिळविले. हरियाना सरकार राष्ट्रीय पदक मिळविणाऱ्यांना घसघशीत बक्षीस देते. महाराष्ट्रातही असे प्रोत्साहन मिळायला हवे, असे भाग्यश्रीच्या यशाच्या निमित्ताने सुचवावेसे वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com